कोल्हापुरातून मराठा मूक मोर्चाला सुरुवात ; सर्वपक्षीय पाठिंबा

    16-Jun-2021
Total Views |

maratha reservation _1&nb



मुंबई:
मराठा आरक्षणाच्या मागणीसह इतर मागण्यांसाठी संभाजी छत्रपती यांच्या नेतृत्वात राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून आज १६ जूनपासून मूक मोर्चाला सुरुवात करण्यात आली. या आंदोलनाला सर्वपक्षीय नेत्यांनी सहभाग नोंदविल्यामुळे कोल्हापूर शहरात मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या आंदोलनाला येणाऱ्या प्रत्येक समन्वयकाची नोंद कोल्हापूर पोलिसांनी ठेवली आहे. कोरोना संकटाचे सर्व नियम पाळून आंदोलन व्हावे, असे आवाहन देखील कोल्हापूर पोलिस दलाकडून करण्यात आले आहे.


सकाळी ११ वाजता छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीस्थळापासून या आंदोलनाला सुरुवात झाली. पहिल्या टप्प्यात पाच जिल्ह्यांमध्ये हे आंदोलन होणार असून कोल्हापुरातून या आंदोलनाची सुरुवात झाली. आंदोलनात सहभागी होणाऱ्यांनी मौन बाळगून तसेच कोरोनाच्या नियमांचे पालन करुन हे आंदोलन करायचे आहे. त्याचप्रमाणे कोरोनाचा संसर्ग वाढेल असे कोणतेही कृत्य करायचे नाही, अशा सूचनाही आंदोलकांना देण्यात आलेल्या आहेत. या आंदोलनासाठी स्वतः श्रीमंत शाहू महाराज, मालोजी महाराज, संभाजी राजे यांच्या पत्नी संयोजी राजे, पुत्र शहाजी राजे उपस्थित होते.


खासदार संभाजी छत्रपती राजेंच्या ५ प्रमुख मागण्या


१. सारथी संस्थेला सक्षम करण्यासाठी पावले उचलणे

२. आण्णासाहेब महामंडळाची स्थापना

३. प्रत्येक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजासाठी वसतीगृह उभारणे

४. ओबीसींप्रमाणे गरीब मराठा समाजाला शैक्षणिक सवलती मिळवून देणे

५. २,०८५ विद्यार्थी नोकऱ्यांच्या नियुक्त्यांसाठी अडकलेले आहेत त्यांचा मार्ग मोकळा करणे

या आंदोलनाला सुरूवात झाल्यानंतर प्रारंभी खासदार संभाजीराजे यांनी उपस्थिती समुदायाला आवाहन केले. आजचे आंदोलन मूक असून, फक्त लोकप्रतिनिधीच बोलतील. उपस्थितांपैकी कुणीही लोकप्रतिनिधींना उलट सवाल करू नये. लोकप्रतिनिधींना त्यांची भूमिका मांडू द्या. त्यांचे ऐकून घ्या, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी सुरूवातीला केले.

आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी उपस्थित नेते
 
भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील

वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर

काँग्रेस नेते आणि पालकमंत्री सतेज पाटील

आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ

शिवसेना खासदार धैर्यशील माने

खासदार संजय मंडलिक

जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे

आमदार प्रकाश आबिटकर
 
आमदार राजेश पाटील