पाकिस्तानातील माध्यमांची गळचेपी आणि षंढ खान सरकार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

Total Views |

media 2_1  H x
 
 
 
सरकारविरोधात साधा ‘ब्र’ काढणार्‍या माध्यमांची आणि पत्रकारांची बेकायदेशीर पद्धतींचा वापर करुनच मुस्कटदाबी पाकिस्तानात सर्रास केली जाते. असे चित्र डोळ्यांसमोर असतानाही पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान मात्र पाकिस्तानी माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, असेच असत्य दावे पसरवण्यात धन्यता मानताना दिसतात.
 
 
 
पाकिस्तानात सैन्याविरोधात कोणत्याही प्रकारचे मतप्रदर्शन करणे हे तेथील माध्यमांसाठी दिवसेंदिवस अधिकच धोकादायक ठरताना दिसते. कारण, तसे करणार्‍या पत्रकारांना केवळ शारीरिक यातनाच नाही, तर बरेचदा आपले प्राणही गमवावे लागण्याच्या घटना घडल्या आहेत. नुकताच पाकिस्तानातील पत्रकार असद तूर यांच्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला. याविरोधात पाकिस्तानातील सुप्रसिद्ध पत्रकार हामिद मीर यांच्यासह अनेक पत्रकारांनी रस्त्यावर उतरून आपला आवाज बुलंद केला. त्यामुळे सध्या पाकिस्तानात माध्यमे विरुद्ध पाकिस्तानी सैन्य, ‘आयएसआय’ आणि खान सरकार असे संघर्षमय वातावरण पेटलेले दिसते. स्थानिक माध्यमे आणि वृत्तसंस्था ‘डीपीए’ने दिलेल्या माहितीनुसार, पाकिस्तानी पत्रकार आणि ब्लॉगर असद तूर यांच्या इस्लामाबादमधील राहत्या घरात रात्री घुसून त्यांना जबर मारहाण करण्यात आली आणि धमकीही देण्यात आली. हे सगळे कशासाठी तर असद तूर हे पाकिस्तानी सैन्याचे टीकाकार म्हणून ओळखले जातात आणि त्यांनी केलेली अशीच एक टीका जिव्हारी लागल्याने त्यांचे तोंड दाबण्यासाठी त्यांच्यावर हा भ्याड हल्ला सैन्याकडूनच करण्यात आला. ‘जियो टीव्ही’चे वरिष्ठ पत्रकार आणि ‘कॅपिटल टॉक’ नावाच्या कार्यक्रमाचे निवेदक हामिद मीर यांनीदेखील तूर यांच्यावरील या हल्ल्याची तीव्र शब्दांत निंदा केली आणि सैन्य तसेच ‘आयएसआय’च्या भूमिकेवरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. परिणामी, सैन्याच्या दबावाला बळी पडत ‘जियो टीव्ही’च्या व्यवस्थापनाने मीर यांचा हा ‘टॉक शो’च बंद पाडला.
 
 
मीर आणि ‘कॅपिटल टॉक’
 
 
‘जियो टीव्ही’मध्ये आपल्या करिअरच्या प्रारंभी २००२ सालापासूनच हामिद मीर ‘कॅपिटॉल टॉक’ या कार्यक्रमाचे निवेदक म्हणून कार्यरत आहेत. पाकिस्तानातील चालू घडामोडींवर भाष्य करणारा एक जुना कार्यक्रम म्हणून ‘कॅपिटल टॉक’ ओळखला जातो. पण, या कार्यक्रमापासून निवेदक म्हणून मीर यांना दूर केले जाण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. २००७ साली पाकिस्तान सरकारवर सातत्याने ताशेरे ओढल्यामुळे सैन्याच्या हुकूमशाही वृत्तीचे जनरल परवेझ मुशर्रफ यांनी या कार्यक्रमावर बंदी घातली होती. पुढे २००८ साली हा कार्यक्रम सुरु झाला खरा, पण निवेदक म्हणून हामिद मीर यांची जागा मुहम्मद मलिक यांना देण्यात आली. परंतु, पाकिस्तानातील २००८च्या केंद्रीय निवडणुकांनंतर सत्तांतर झाले आणि त्यानंतर मीर यांना ‘कॅपिटल टॉक’ची जबाबदारी पुन्हा सुपूर्द करण्यात आली.
 
सैन्य आणि ‘जियो टीव्ही’
 
पाकिस्तानी सैन्याबरोबर ‘जियो टीव्ही’चे संबंध कायमच तणावग्रस्त राहिले आहेत. नोव्हेंबर २०१२ मध्ये तर हामिद मीर यांच्या गाडीत अर्ध्या किलोग्रॅमचे स्फोटक आढळले होते. पण, बॉम्बशोधक पथकाकडून ते स्फोटक वेळीच निकामी केल्यामुळे केवळ दैव बलवत्तर म्हणून मीर त्यावेळी थोडक्यात बचावले. या फसलेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानी तालिबानने नंतर स्वीकारली खरी, पण यात तीळमात्रही शंका नाही की, तो हल्ला कोणाच्या आदेशान्वये रचण्यात आला होता.इतकेच नाही, तर एप्रिल २०१४ मध्येही हामिद मीर यांच्यावर अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला, ज्यामध्ये ते गंभीररीत्या जखमी झाले. उल्लेखनीय म्हणजे, या हल्ल्यापूर्वीच मीर यांनी त्यांच्या सहकार्‍यांना स्पष्टपणे सांगितले होते की, “जर माझ्यावर हल्ला झालाच, तर त्याची सर्वस्वी जबाबदारी ही ‘आयएसआय’ आणि त्याचे प्रमुख लेफ्टनंट जनरल जहीर-उल-इस्लाम यांची असेल.” पण, दोषींवर कारवाई करण्याऐवजी मीर यांनी जहीर यांच्यावर केलेले आरोप प्रसारित केल्यामुळे उलट ‘जियो टीव्ही’वरच कडक निर्बंध लादले गेले.
 
पण, पाकिस्तानात केवळ हामिद मीर यांच्यावरच नव्हे, तर इतरही काही पत्रकारांवर असेच बेछूट हल्ले केले गेले. सप्टेंबर २०१५ मध्ये ‘जियो टीव्ही’चे वरिष्ठ पत्रकार आफताब आलम यांची कराचीमधील त्यांच्या घराजवळच गोळी झाडून निर्घृणपणे हत्या करण्यात आली. पाकिस्तानच्या राजकारणातील सैन्याच्या भागीदारीविषयी टिकात्मक वार्तांकनासाठी आलम प्रसिद्ध होते. म्हणूनच पाकिस्तानी सैन्य आणि पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणा ‘आयएसआय’च्या विरोधाचा त्यांना वेळोवेळी सामना करावा लागला. आलम यांच्या हत्येनंतर पुढील काही दिवसांतच ‘जियो टीव्ही’ उपग्रहाचे इंजिनिअर अरशद अली जाफरी यांची तीन सशस्त्र बंदुकधारींनी गोळ्या घालून हत्या केली. पत्रकारांवरील हल्ल्याच्या याच क्रमात ‘जियो टीव्ही’चे मालक मीर शकीलुर रहमान यांना गेल्या वर्षी दशकभरापूर्वीच्या रिअल इस्टेट प्रकरणात करचुकवेगिरीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. पण, काही महिन्यांनंतर न्यायालयाच्या आदेशानंतर त्यांची तुरुंगातून सुटकाही करण्यात आली.
 
पाकिस्तानातील माध्यमे किती स्वतंत्र?
 
पाकिस्तानात सैन्य आणि सैन्याच्या छत्रछायेखाली संरक्षित इमरान खान सरकार विरोधात लिहिणे अथवा बोलणे हे जवळ जवळ दुरापास्त झाले आहे. खासकरून देशभरात कोरोना महामारीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर पत्रकारांवरील हल्ल्यांच्या घटनांमध्येही वाढ झालेली दिसते. गेल्या वर्षी जुलै महिन्यात पाकिस्तानी सरकार आणि सैन्याचे एक कडवे टीकाकार असलेल्या पत्रकार मतीउल्लाह जान यांचे अपहरण करण्यात आले. दुसरीकडे पत्रकार शाहेजब गिलानी यांच्यावर सायबर दहशतवाद, अभद्र भाषेचा प्रयोग, इलेक्ट्रॉनिक माध्यमातून दगाबाजी, मानहानी संबंधित कायद्यांन्वये आरोप करण्यात आले. परंतु, पुराव्यांअभावी हे प्रकरण न्यायालयाने रद्दबातल ठरविले. तसेच गेल्या वर्षी पत्रकार बिलाल फारुकी यांना देशातील शक्तिशाली सैन्याची बदनामी आणि धार्मिक असंतोष पसरवण्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती.
 
 
त्यामुळे वरील एकूणच घटनाक्रमावर नजर टाकली असता, एक गोष्ट प्रकर्षाने ध्यानात येते की, सरकारविरोधात साधा ‘ब्र’ काढणार्‍या माध्यमांची आणि पत्रकारांची बेकायदेशीर पद्धतींचा वापर करुनच मुस्कटदाबी पाकिस्तानात केली जाते. असे चित्र डोळ्यांसमोर असतानाही पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान मात्र पाकिस्तानी माध्यमांना पूर्ण स्वातंत्र्य आहे, असेच असत्य दावे पसरवण्यात धन्यता मानताना दिसतात. मे महिन्याच्या अखेरीस ‘बीबीसी’ वाहिन्याच्या ‘हार्डटॉक’ या कार्यक्रमात पाकिस्तानचे माहिती आणि सूचना प्रसारणमंत्री फवाद चौधरी यांची मुलाखत घेण्यात आली. त्या मुलाखतीतही पाकिस्तान आपल्या देशातील पत्रकारांची सुरक्षा करण्यात अयशस्वी ठरला आहे, हे कबूल करण्यास चौधरी यांनी स्पष्ट शब्दांत नकार दिला. उलट चौधरी ढळढळीतपणे खोटे बोलले की, पाकिस्तानमध्ये पत्रकारांना पूर्ण अभिव्यक्ती स्वातंत्र्यही दिली जाते आणि सुरक्षाही!
 
 
दुसरीकडे पाकिस्तानमधील स्थानिक पत्रकारांचे समूह जे देशातील पत्रकारांवरील हल्ल्यांची नोंद ठेवतात, त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मे २०२० ते एप्रिल २०२१ या कालावधीत पत्रकारांवर १४८ हल्ल्यांची नोंद करण्यात आली आहे. ऑक्टोबर २०२० मध्ये जाहीर करण्यात आलेल्या ‘ग्लोबल इम्प्युनिटी इंडेक्स’मध्येही अशीच भयावह परिस्थिती समोर आली आहे. ही आकडेवारी अशा देशांची माहिती देते, जिथे पत्रकारांची हल्ला करण्यात आली आहे, परंतु त्यांचे मारेकरी मात्र अद्याप मोकाट आहेत. अशी भीषण स्थिती असलेल्या देशांमध्ये पाकिस्तानचा जगभरातील देशांमध्ये नववा क्रमांक लागतो. सोमालिया, सीरिया, इराक, द.
 

सुदानसारखे युद्ध आणि राजकीय


अस्थिरतेने वेढलेले देश या क्रमवारीत पाकिस्तानपेक्षा पुढे आहेत. या अहवालात अशा तीन देशांचा स्पष्ट उल्लेख करण्यात आला आहे, ज्या देशांत भ्रष्टाचार, कमकुवत संस्था आणि पत्रकारांच्या हत्यांची चौकशी करण्याची राजकीय इच्छाशक्तीचीच कमी आहे आणि या यादीत पाकिस्तानचाही क्रमांक लागतो. पाकिस्तानबरोबर मॅक्सिको आणि फिलिपाईन्स या दोन देशांचाही या यादीत समावेश आहे. एका आकडेवारीनुसार, पाकिस्तानात मागील दहा वर्षांत १५ पत्रकारांची हत्या करण्यात आली, पण यापैकी एकाही हत्येच्या प्रकरणात हल्लेखोरांना कोणतीही शिक्षा झाली नाही. तसेच ‘कमिटी टू प्रोटेक्ट जर्नालिस्ट’च्या माहितीनुसार, १९९२ पासून आजतागायत पाकिस्तानात एकूण ६१ पत्रकारांना आपला जीव अशा हल्ल्यांमध्ये गमवावा लागला आहे.

 
खरंतर आज पाकिस्तान चहुबाजूंनी अराजकाच्या स्थितीत आकंठ बुडाला आहे. तथाकथित खान यांचे लोकशाही सरकार लाचारीच्या स्थितीत असून अंतर्गत आणि वैश्विक स्तरावर ढासळलेल्या प्रतिष्ठेने या देशाची परिस्थिती अधिकच विदारक केली आहे. सैन्य आणि कट्टरपंथी इस्लामिक संघटना पाकिस्तानात आजही तितक्याच शक्तिशाली आहेत. मुजाहिद्दीन युद्धकाळापासून सैन्य आणि या दहशतवादी संघटनांचे हे संबंध काहीसे कमजोर झाले असले तरी त्यांचे परस्पर संबंध अजूनही तितकेच सौहार्दाचे आहेत. आणि जे पत्रकार किंवा माध्यमसमूह सैन्य आणि दहशतवादी संघटनांच्या याच अंतर्गत, छुप्या संबंधांचे पितळ समाजासमोर उघडे पाडतात, त्यांनाच या शक्तींकडून लक्ष्य केले जाते.
 
(अनुवाद : विजय कुलकर्णी)
 
 
@@AUTHORINFO_V1@@