मुंबई : नव्या दमाचा भारतीय संघ हा शिखर धवनच्या नेतृत्वाखाली श्रीलंका दौरा करणार आहे. यासाठी आता बीसीसीआयने भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडची निवड या संघाच्या प्रशिक्षक पदासाठी केली आहे. अध्यक्ष सौरव गांगुलीने अधिकृतरित्या ही घोषणा केली आहे. याआधी राहुल द्रविडने १९ वर्षांखालील भारतीय संघाचेदेखील प्रशिक्षक पद भूषवले होते. विशेष म्हणजे, राहुल द्रवि़डने १९९६मध्ये श्रीलंकेविरुद्धच एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते, आता तो श्रीलंकेविरुद्धच टीम इंडियासाठी मुख्य प्रशिक्षकाची भूमिका बजावणार आहे.
शिखर धवनच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ हा जुलै महिन्यात श्रीलंका दौरा करणार आहे. १३ ते २५ जुलै दरम्यान तीन एकदिवसीय आणि तीन टी-२० सामन्यांची मालिका होणार आहे. यापूर्वी संपूर्ण भारतीय संघ हा १४ दिवसांसाठी मुंबईत विलगिकरणात राहणर आहेत. एकीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर असताना दुसरीकडे शिखर धवन कर्णधार पद कसे भूषवतो, याकडे साऱ्यांचे लक्ष लागले आहे. तसेच, आता द्रविडची प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आल्याने भारतीय संघाचे श्रीलंकेमध्ये होणाऱ्या या मालिकांमध्ये उत्तम कामगिरीची अपेक्षा वाढली आहे.