गुणवत्तेचा ध्यासकर्ता

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2021   
Total Views |

Nikhil Kulkarni_1 &n
 
 
आपल्या अंगभूत गुणांना चिकाटीने यशात परिवर्तित केलेल्या नाशिक येथील निखिल कुलकर्णी याच्याविषयी...
 
 
जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या ठायी काही ना काही गुण हा असतोच. गरज असते ती तो गुण हेरून त्यावर कष्टाने संस्कार करण्याची. जिद्द, चिकाटी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ध्यास. या गुणांची जोपासना केल्यास आपल्यातील गुणवत्ता ही सहज सिद्ध करता येत असते. नाशिक येथील निखिल हेमंत कुलकर्णी या शालेय विद्यार्थ्याने आपल्यातील हीच गुणवत्ता सिद्ध करत सर्वांचेच लक्ष आपल्याकडे वेधून घेतले आहे. प्रतिष्ठित ‘रामानुजन’ ही फेलोशिप निखिलला मिळाली असून, अशी फेलोशिप मिळविणारा तो केवळ दहावा भारतीय विद्यार्थी ठरला आहे. त्याचे आईवडील दोघे इंजिनिअरिंग महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्या प्रोत्साहनामुळे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये निखिल उत्तम यश मिळवत आहे.
 
 
 
सिम्बायोसिस शाळेत निखिलने दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले. निखिलला त्याचे मार्गदर्शक व गुरू भा. स. भामरे यांच्यामुळे गणित व विज्ञान ‘ऑलिम्पियाड’बद्दल माहिती मिळाली. त्यांच्याकडूनच त्याला एका गणितीय रहिवासी शिबिराबद्दल समजले आणि तोच त्याच्या आयुष्यातील ‘टर्निंग पॉईंट’ म्हणता येईल. अतिशय विचारपूर्वक त्याने या शिबिरासाठी अर्ज केला. त्यात प्रथमच त्याला स्वतःच्या यशाचे वर्णन करावयाचे होते आणि ते त्याने उत्तम रीतीने केले. हे शिबीर म्हणजे ‘रेझिंग अ मॅथेमॅटिशिअन-ट्रेनिंग प्रोग्राम.’ यासाठी संपूर्ण भारतातून १०० मुले निवडली गेली, त्यात निखिलची निवड झाली. याच शिबिरात आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक संशोधकांशी सुसंवाद त्याला साधता आला. गणित म्हणजे आपण शाळेत जे करतो तेवढेच नसून, गणिताशी संलग्न अर्थशास्त्र, संख्याशास्त्र, ‘प्रोबॅबिलिटी’, ‘कॉम्बिनेटोरिक्स’, प्राचीन गणित संशोधन, गणित व संगीत यांचा संबंध यांसारख्या विषयांशी त्याची ओळख झाली. विशेष म्हणजे, शिबिरात सहभागी सर्व जण गणितप्रेमी असल्यामुळे दिवसरात्र अनेक सिद्धान्त व ते कसे सिद्ध करतात, कसे वापरतात याविषयी चर्चा घडत असे. या शिबिरानंतरही निखिलने त्याला आवडलेल्या विषयांची पुस्तके जमवून वाचन सुरु ठेवले. तसेच शिबिरातील मार्गदर्शक शिक्षक आणि सहभागी मित्रांशी फोन तसेच ईमेलद्वारे त्याचा संवाद चालूच होता. इयत्ता नववीत असताना त्याने त्याच्या मित्रांसोबत ‘द हाय वोल्टेज क्लब’ या विद्यार्थ्यांच्या क्लबची सुरुवात केली. त्याअंतर्गत, ‘लॉकडाऊन’च्या काळात या मुलांनी अनेक ‘वेबिनार’ आयोजित केले.
 
 
 
‘लॉकडाऊन’च्या काळात अनेक संशोधकांशी ईमेलद्वारे संपर्क करून विविध संशोधनाच्या विषयांचा त्याने अभ्यास केला. त्यातूनच त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर होणार्‍या गणितीय निवासी शिबिरांविषयी माहिती मिळाली. शाळा आणि स्पर्धा परीक्षा याव्यतिरिक्तही गणिताच्या खूप शाखा असून, त्यात त्याला ‘डिस्क्रिट मॅथेमॅटिक्स’ व ‘अल्गोरिदम डिझाईन’ यात रस निर्माण झाला. त्यासाठी त्याने ‘प्रिन्स्टन युनिव्हर्सिटी’मध्ये घेतल्या जाणार्‍या ‘प्रोग्राम इन अल्गोरिदमिक अ‍ॅण्ड कॉम्बिनेटोरियल थिंकिंग’ या कोर्ससाठी अर्ज केला. या कोर्ससाठी जगभरातून १२० मुलांची निवड झाली, त्यात निखिलचाही समावेश होता. हा कोर्स अमेरिकेतील प्रिन्स्टन येथे निवासी पद्धतीने घेतला जातो. परंतु, ‘कोविड’ महामारीमुळे तो ‘ऑनलाईन’ घेतला गेला. त्याची चिकाटी आणि अभ्यासू वृत्ती बघून त्याला याच कोर्सच्या पुढील वर्षभरासाठी शिष्यवृत्ती मिळाली आणि त्याने तो कोर्स यशस्वीरीत्या पूर्णही केला. त्यातील त्याची प्रगती बघून या वर्षीच्या ‘अ‍ॅडवान्सड प्रोग्राम’साठी त्याची निवड झाली. या सर्व उपक्रमांत ‘रेझिंग’ या ‘मॅथेमॅटिशिअन’ या संस्थेचे सहसंस्थापक व सेक्रेटरी विनय नायर यांचे बहुमूल्य मार्गदर्शन त्याला लाभले. त्यांच्या मार्गदर्शनानेच त्याने ‘स्पिरिट ऑफ रामानुजन फेलोशिप’साठी अर्ज केला आणि त्याला ही फेलोशिप प्रदान करण्यात आली.
 
 
 
थोर भारतीय गणितज्ञ रामानुजन यांच्या सन्मानार्थ, ‘स्पिरिट ऑफ रामानुजन (स्टेम) टॅलेंट इनिशिएटिव्ह’ द्वारे उदयोन्मुख अभियंते, गणितज्ञ आणि वैज्ञानिकांना आर्थिक अनुदान आणि मार्गदर्शनाच्या संधी उपलब्ध करून दिल्या जातात. या संस्थेतर्फे आंतरराष्ट्रीय संशोधकांना जगभरातील संशोधन कार्यक्रमांमध्ये सहभाग घेण्यासाठी किंवा स्वीकृत प्रायोजकांसह वैयक्तिक संशोधन करण्यासाठी शिष्यवृत्ती प्रदान केली जाते. गणितात आणि विज्ञानामध्ये उल्लेखनीय काम केलेल्या व संशोधनात रुची असणार्‍या जगभरातील ६० विद्यार्थ्यांना आजपर्यंत ही प्रतिष्ठित फेलोशिप प्रदान करण्यात आली आहे. निखिल हा त्याला मिळालेल्या स्कॉलरशिपचा वापर डॉ. राजीव गांधी यांच्यासोबत ‘रँडमाइज्ड अल्गोरिदम’ शिकण्यासाठी, तसेच त्यासंबंधी संशोधनासाठी वापरणार आहे. निखिलला गणित शिकवण्याचीही आवड आहे. त्याच्या इतर आवडींमध्ये खगोलशास्त्र, जैवतंत्रज्ञान, स्पर्धात्मक वादविवाद आणि लेखन यांचा समावेश आहे. ‘रेझिंग अ मॅथेमॅटिशिअन फाऊंडेशन’च्या काही कोर्सेससाठी तो ‘टिचिंग असिस्टंट’ म्हणून मदतदेखील करतो. त्याला येणार्‍या विषयावर तो अनेक मुलांना मार्गदर्शनही करतो. निखिलला त्याच्या पुढील वाटचालीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@