लसीकरण की फसवीकरण?

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2021   
Total Views |

vaccine_1  H x
 
 
 
लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी हाऊसिंग सोसायट्यांना,कॉर्पोरेट कंपन्यांना त्यांच्या परिसरातच लसीकरणाची परवानगी देण्यात आली. पण, सध्या अशाच काही सोसायट्यांमध्ये लसीकरण करून घेतलेल्या रहिवाशांनी समाजमाध्यमांवर याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे सोसायट्यांमधून राबविल्या जाणार्‍या लसीकरणातून फसवीकरण तर होत नाही ना, अशी शंका व्यक्त होताना दिसते. सोसायट्यांमधील लसीकरण हे खासगी रुग्णालयांच्या साहाय्याने करण्याची परवानगी पालिकेतर्फे देण्यात आली. आधीच ‘ऑनलाईन स्लॉटबुकिंग’ होत नसलेल्या काही इमारतीतील रहिवाशांनीही पैसे मोजून लसीकरणाचा हा पर्याय स्वीकारला. कांदिवलीतील एका सोसायटीमध्ये लसीकरण कोकीलाबेन रुग्णालयातर्फे करण्यात आल्याचेही रहिवाशांना लसीकरणापूर्वी सांगितले गेले. परंतु, लसीकरणानंतर मिळालेल्या प्रमाणपत्रावर मात्र कोकीलाबेन रुग्णालयाऐवजी नानावटी तसेच विविध रुग्णालयांची नावे असल्याचा दावा त्या सोसायटीतील रहिवासी असलेल्या नेहा अल्शी यांनी ट्विटरवर केला आहे. नानावटी रुग्णालयाशी याबाबत रहिवाशांनी संपर्क साधल्यानंतर अशाप्रकारचे कुठलेही लसीकरण त्यांनी केले नसल्याचे उघडकीस आले. तसेच दुसरा धक्कादायक प्रकार म्हणजे, कांदिवलीतील या सोसायटीच्या एकूण ४०० जणांनी ‘कोव्हिशिल्ड’ची लस घेतली खरी. परंतु, ४०० पैकी एकाही व्यक्तीला लसीकरणानंतर कुठलाही साईडइफेक्ट न जाणवल्यामुळे आश्चर्य व्यक्त केले जात आहे. लसीचा साईडइफेक्ट सगळ्यांनाच जाणवतो असे नाही. परंतु, ४०० जणांपैकी एकाही व्यक्तीला लस घेतल्यानंतर त्रास न झाल्याने नेमकी आम्हाला मुदत संपलेली लस टोचली गेली की, लसीच्या नावाखाली ग्लुकोज दिले गेले, असा संतप्त सवालच रहिवाशांनी आता उपस्थित केला आहे. नेहा यांनी ट्विट करत मुंबई महानगरपालिका तसेच माध्यमांच्या निदर्शनासही ही बाब आणून दिल्याने आता यासंदर्भात प्रशासनाकडून कोणती पावले उचलली जातात, ते पाहावे लागेल आणि खरंच याबाबत काही गैरप्रकार झाला असेल, तर ही अतिशय गंभीर बाब म्हणावी लागेल. परंतु, अशा घटना घडू नये म्हणून सोसायट्यांनीही लसीकरण प्रक्रिया राबविण्यापूर्वी संबंधित रुग्णालयाकडून संपूर्ण माहिती घेऊनच निर्णय घेणे कधीही सोयीस्कर!
 
 

‘फॅमिली मॅन’च्या निमित्ताने...

 
 
‘फॅमिली मॅन’ या ‘अ‍ॅमेझॉन प्राईम’वरील वेबसीरिजवर सध्या सर्वत्र कौतुकवर्षाव होताना दिसतो. एक सामान्य दिसणारा घरगृहस्थीवाला मनुष्य कसा आपल्या कुटुंबापासून आपल्या सरकारी नोकरीतील कामाचे खरे स्वरुप लपवून देशाच्या गुप्तचर यंत्रणेत बेधडकपणे कार्यरत असतो, याचे अत्यंत कसदारपणे दोन सीझनमध्ये गुंफलेले हे कथानक. परंतु, या वेबसीरिजच्या निमित्ताने हल्ली पालकांचे आपल्या मुलांच्या आयुष्याकडे होणार्‍या एकूणच दुर्लक्षाविषयीही तितक्याच परखडपणे भाष्य केलेले दिसते. या कथानकात श्रीकांत तिवारी (मनोज वाजपेयी) या गुप्तचर यंत्रणेत काम करणार्‍या ‘फॅमिली मॅन’ची मुलगी धृतीला मुद्दाम प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे अपहरण केले जाते. उद्देश हाच की श्रीकांत तिवारीने दहशतवाद्यांच्या मिशनच्या आड येऊ नये. परंतु, वयात येणारी धृती, तिच्याकडे मिळालेल्या गर्भनिरोधकसदृश गोळ्या, लहान भावाकडून ‘तिचा बॉयफ्रेंड आहे’ हे वारंवार सांगितल्यानंतरही ती गोष्ट हसणार्‍यावारी नेण्याची दोन्ही पालकांची वृत्ती, असे बरेचसे प्रसंग पालक आणि मुलांच्या नातेसंबंधांविषयी बरेच काही सांगून जातात. ही कथा जरी काल्पनिक प्रसंगांनी गुंफलेली असली तरी यांसारखी कित्येक प्रकरणे आपल्या आसपास, बातम्यांमध्ये हल्ली सर्रास निदर्शनास येतात. प्रत्येक वेळी पालकांनी आपल्या पाल्यांशी मैत्रिपूर्ण संबंध ठेवावेत वगैरे सल्लेही दिले जातात. पालकही तसा नक्कीच प्रयत्न करताना दिसतात, नाही असे नाही. या कथानकातही त्याचा प्रत्यय येतोच. परंतु, तरीही मुलांच्या मनात पालकांप्रति असलेल्या भीतीपोटी त्यांची सत्यकथन करण्याची कधी हिंमतच होत नाही. धृतीचेही तिथेच चुकते आणि परिणामी ती खोट्या प्रेमाच्या, ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात अलगद गुरफटली जाते. आधीच्या काळात पालकत्व ही ज्याची-त्याची कौटुंबिक बाब समजली जात असली तरी हल्लीचे पालक याबाबतीत तितकेच जागृत, सजग झालेले दिसतात. पण, केवळ ही जागरूकता पुरेशी नसून मुलांना अगदी लहान वयापासूनच बर्‍या-वाईटाची ओळख करून देणे, त्यांच्याशी सर्व विषयांबद्दल अगदी मनमोकळेपणे चर्चा करणे, सुसंवाद साधणे, मोबाईलच्या अतिवापरापासून बळजबरीने नव्हे तर पुस्तके, कला, क्रीडा याच्या माध्यमातून परावृत्त करणे ही काळाची गरज आहे. म्हणूनच ‘फॅमिली मॅन’ने दिलेला हा धडा पालकांचेही डोळे खाडकन उघडणारा आहे, असे म्हटले तर वावगे ठरू नये.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@