लडाख : ईशान्येकडील सीमेवर आपली ताकद वाढविण्याच्या दृष्टीने भारताने प्रयत्न सुरू केले आहेत. भारतीय सैन्याला आता पँगाँग त्सो तलावात गस्त घालण्यासाठी म्हणून नव्या नौका मिळण्यास सुरुवात झाली आहे. ‘आयटीबीपी’कडून यांचा वापर करण्यात येणार असून पँगाँग त्सो तलावात आता भारताची ताकद आणखीनच वाढणार आहे. गतवर्षी, चीनसोबत निर्माण झालेल्या तणावाच्या परिस्थितीनंतर पँगाँग त्सो तलाव परिसरात गस्त घालण्यासाठी म्हणून २९ नव्या नौकांची मागणी करण्यात आली होती. यापैकी १२नौका गोवा शिपयार्ड, तर १७ नौकांचा करार एका खासगी शिपयार्ड कंपनीसोबत तयार करण्यात आला होता.
गोवा शिपयार्ड येथे तयार होणार्या नौकांमध्ये बोट्स मशीनगन, सर्व्हिलन्स गिअर आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यासोबतच खासगी शिपयार्डमध्ये ३५ फूट लांबीच्या बोटी तयार केल्या जात आहेत. याचा वापर सैनिकांची ने-आण करण्यासाठी होणार आहे. या नौकांमध्ये जवळपास १८ सैनिकांना एकाच वेळी प्रवास करता येणार आहे. नव्या नौका सध्या सैन्याच्या ताफ्यात येत असून, पुढील काही महिन्यांत संपूर्ण २९ नौका सैन्याला मिळतील असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.
सध्याच्या घडीला पँगाँग त्सो भागात गस्त घालण्यासाठी ज्या नौका वापरात आहेत त्या अतिशय लहान आकाराच्या आहेत. अनेकदा तर चीनच्या मोठ्या नौका भारताच्या या नौकांना टक्कर देत असल्याच्याही घटना घडल्या आहेत. काही वर्षांपूर्वी अशाच घटनेमध्ये भारताची एक नौका पलटल्याचीही माहिती होती. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव हा निर्णय घेण्यात आला आहे.