कपिल सिब्बल यांनी टोचले काँग्रेसश्रेष्ठींचे कान!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    14-Jun-2021   
Total Views |

Kapil Sibal_1  
 
 
 
कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाच्या आजच्या अवस्थेवर प्रकाश टाकतानाच यातून बाहेर पडायचे असेल तर काय करायला हवे, तेही सांगितले आहे. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. कपिल सिब्बल यांची ही मागणी पक्षश्रेष्ठी कितपत गांभीर्याने घेतील हाही प्रश्नच आहे. काँग्रेस पक्ष म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची पिढीजात जहागीर असल्याच्या थाटातच त्या पक्षाचे नेते वागत आले आहेत.
 
 
काँग्रेस पक्षाची अवस्था सध्या अत्यंत वाईट झाली असल्याचे आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी पक्षामध्ये मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्याची गरज असल्याचे काँग्रेसचे एक नेते आणि ख्यातनाम विधिज्ञ कपिल सिब्बल यांनी म्हटले आहे. कपिल सिब्बल हे एकेकाळी काँग्रेस पक्षश्रेष्ठींच्या अत्यंत निकटच्या वर्तुळात होते. पण, मध्यंतरी त्यांच्यासह काँग्रेस पक्षातील २३ जणांनी पक्षश्रेष्ठींना पत्र लिहून पक्षामध्ये सुधारणा करण्याची आवश्यकता असल्याचे कळविले होते. पक्षश्रेष्ठींविरुद्ध ब्र काढण्याची हिंमत दाखविण्याचे धाडस या २३ जणांच्या गटाने काही काळापूर्वी केले होते. पण, त्या पत्राची पक्षश्रेष्ठींनी दाखल घेतली नसल्याचेच दिसून आले. उलट ज्या २३ जणांनी हे पत्र लिहिले होते त्यांच्यावर पक्षश्रेष्ठींची खप्पामर्जी झाल्याचेच दिसून येत आहे. असे असले तरी कपिल सिब्बल यांनी पुन्हा पत्र लिहून काँग्रेसमध्ये व्यापक सुधारणा करण्याची गरज असल्याची जी मागणी केली आहे, ती कृती धाडसाचीच मानायला हवी! सध्या काँग्रेस पक्षाची अवस्था अत्यंत वाईट झाली आहे. हाताच्या बोटावर मोजता येईल एवढ्या राज्यांमध्ये काँग्रेसचे शासन. प. बंगालमध्ये नुकत्याच ज्या विधानसभा निवडणुका झाल्या, त्या निवडणुकीमध्ये जनतेने काँग्रेसची दखलही घेतली नाही. ज्या प. बंगालमध्ये एकेकाळी काँग्रेसचे शासन होते त्या प. बंगालमध्ये काँग्रेस पक्ष औषधालाही उरला नसल्याचेच या निवडणूक निकालांवरून दिसून आले.
 
 
 
काँग्रेस पक्षाची ज्या राज्यामध्ये सत्ता आहे, तेथे अंतर्गत गटबाजीमुळे पक्ष पोखरला जात असल्याचे दिसून येत आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्या गटातील वाद डोके वर काढतच असतो. पंजाबमध्ये मुख्यमंत्री अमरिंदरसिंह आणि नवज्योतसिंह सिद्धू यांच्यातील वादाच्या बातम्या जनतेच्या कानावर पडत असतातच. काँग्रेस पक्षाचे भवितव्य काय असेल हे ओळखून काँग्रेसचे नेते राजीव गांधी यांचे अत्यंत निकटचे मानले गेलेले त्यांचे सहकारी त्यांची साथ सोडून निघून चालले आहेत. मध्य प्रदेशमधील नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम ठोकून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. त्यानंतर अलीकडेच राहुल गांधी यांचे अन्य एक घनिष्ठ मित्र जितीन प्रसाद यांनी काँग्रेस पक्ष सोडून भाजपमध्ये प्रवेश केला. जे नेते राहुल गांधी यांची साथ सोडतील असे वाटत नव्हते, त्यांनी भाजपशिवाय पर्याय नसल्याचे लक्षात घेऊन काँग्रेसचा त्याग करून भाजपमध्ये प्रवेश केला आहे. एकीकडे काँग्रेस पक्षास अशी गळती लागली असताना, कपिल सिब्बल यांच्यासारख्या नेत्याने पक्षात व्यापक सुधारणा करण्याची गरज असल्याची जाहीर मागणी करून पक्षाची जनमानसातील प्रतिमा आणखी मलीन करण्यास हातभार लावला आहे.
 
 
 
कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षाच्या आजच्या अवस्थेवर प्रकाश टाकतानाच यातून बाहेर पडायचे असेल तर काय करायला हवे, तेही सांगितले आहे. पक्षाच्या संघटनात्मक निवडणुका त्वरित घेण्यात याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे. कपिल सिब्बल यांची ही मागणी पक्षश्रेष्ठी कितपत गांभीर्याने घेतील हाही प्रश्नच आहे. काँग्रेस पक्ष म्हणजे सोनिया गांधी, राहुल गांधी, प्रियांका गांधी यांची पिढीजात जहागीर असल्याच्या थाटातच त्या पक्षाचे नेते वागत आले आहेत. काँग्रेस पक्षाची सध्याची अवस्था पाहता देशपातळीवरील राजकारणामध्ये हा पक्ष आपले महत्त्व कसे काय राखून ठेवणार हाही प्रश्नच आहे. संयुक्त पुरोगामी आघाडीच्या अध्यक्ष असलेल्या सोनिया गांधी यांच्याऐवजी या आघाडीचे अध्यक्षपद राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याकडे सोपविण्यात यावे, अशा बातम्या काही काळापासून पेरल्या जात आहेतच. सोनिया गांधी यांच्याऐवजी शरद पवार यांच्याकडे संयुक्त पुरोगामी आघाडीची सूत्रे काँग्रेस पक्ष सोपवील? असे काही घडेल अशी शक्यता वाटत नाही.
 
 
अलीकडील निवडणुकांमध्ये भाजपला अपेक्षित यश न मिळाल्याने भाजपविरोधी पक्ष कानात वारे शिरलेल्या खोंडासारखे उधळल्यासारखे वागत आहेत. त्यातील प्रत्येक नेत्याला आता देशाची सूत्रे आपल्याकडेच यावीत, असे वाटत आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार तर त्या पदाकडे कधीपासूनचे डोळे लावून बसले आहेत. समजा पंतप्रधानपद मिळाले नाही तर राष्ट्रपतिपद तरी पदरात पडेल का, या दृष्टीने त्यांची मोर्चेबांधणी सुरू असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. पण, प. बंगालमधील विजयानंतर तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांनाही भाजपविरोधातील आघाडीचे नेतृत्व आपणच करावे, असे वाटू लागले आहे. आपल्याला जे जनसमर्थन मिळाले ते पाहता आपला प्रभाव देशातही उमटवू शकू, अशी स्वप्ने त्या आतापासूनच पाहू लागल्या आहेत. या रिंगणामध्ये अन्य विरोधी नेतेही आहेत. त्यातील काहींनी आपली मनीषा स्वतः किंवा आपली हुजरेगिरी करणार्‍यांमधून बोलूनही दाखविली आहे. काँग्रेस पक्षाची आजची अवस्था पाहता त्या पक्षाकडे संयुक्त पुरोगामी आघाडीचे नेतृत्व राहील का, हाही एक मोठा प्रश्न आहे.
 
 
कपिल सिब्बल यांनी काँग्रेस पक्षातील महत्त्वाच्या मुद्द्यास जाहीर वाचा फोडली आहे. पण, कपिल सिब्बल यांचे म्हणणे काँग्रेसश्रेष्ठी ऐकतील का, हा खरा प्रश्न आहे. कारण, काँग्रेसश्रेष्ठींना दुसर्‍या कोणी सल्ले दिलेले आवडत नाही. ते त्यांच्या स्वभावातच नाही. त्यामुळे सिब्बल यांच्या पत्ररूपाने केलेल्या सूचनांची काँग्रेसश्रेष्ठी किती दखल घेतील, हे त्यांच्याशिवाय कोणीच सांगू शकणार नाही!
 
 

अखिलेश यादव यांची निकृष्ट कामगिरी

 
 
समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री असलेले अखिलेश यादव हे लोकसभेचे खासदार आहेत. पण, उत्तर प्रदेशातून लोकसभेवर जे खासदार निवडून गेले त्यामध्ये अखिलेश यादव यांची कामगिरी अत्यंत निकृष्ट असल्याचे एका पाहणीत लक्षात आले आहे. अखिलेश यादव यांच्या लोकसभेतील कारकिर्दीचा अभ्यास करण्यासाठी १ जून, २०१९ ते १३ फेब्रुवारी, २०२१ या कालखंडाचा विचार करण्यात आला होता. या कालावधीत लोकसभेमध्ये अखिलेश यादव यांची उपस्थिती अवघी ३६ टक्के असल्याचे दिसून आले. समाजवादी पक्षाचा अध्यक्ष असलेला हा खासदार लोकसभेला किती महत्त्व देतो हे यावरून लक्षात येईल. तसेच आपल्याला असलेल्या अधिकाराचा वापर करून प्रश्न विचारण्याची जी सुविधा संसद सदस्यांना असते त्याचा वापरही त्यांनी केला नाही. अखिलेश यादव आणि नेत्या सोनिया गांधी यांनी या कालावधीत एकही प्रश्न विचारला नाही! लोकसभेतील अवघ्या चार चर्चांमध्ये अखिलेश यादव सहभागी झाले होते, तर सोनिया गांधी अवघ्या एका चर्चेत सहभागी झाल्या होत्या. संसद सदस्यास खासगी विधेयक मांडण्याची संधी असते. पण, अखिलेश यादव आणि सोनिया गांधी यांनी या संधीचा वापरच केला नाही. दोघांनीही एकही खासगी विधेयक मांडले नाही. देशातील दोन पक्षांचे दोन नेते लोकसभेला आणि त्या सभागृहाच्या कामकाजास किती महत्त्व देतात, त्याची थोडीशी कल्पना यावरून यावी!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@