'तुम्हाला खुले पत्र लिहीतोय चेहरेही पाहून घ्या' म्हणत थेट इशारा
नागपूर : दोन दिवसांपूर्वीच नक्षलवाद्यांनी मराठा समाजाला पत्र लिहून मतलबी राजकारण्यांपासून सावध रहा, असा सल्ला दिला होता. त्यावर राजकारण सुरू असताना आता मराठा समाजाकडून सुद्धा नक्षलवाद्यांना खुल पत्र लिहिण्यात आले आहे. मराठा समाजाला नक्षलवाद्यांचा फुकटचा सल्ला नको, म्हणत मराठा युवा संघाने नक्षलवाद्यांना कठोर शब्दात उत्तर दिले आहे.
आमच्या रक्तामध्येच शौर्यआम्ही देशाच्या संविधानाला मानणारे आहोत. आमच्या रक्तामध्ये शौर्य आहे. लढवय्या बाणा आहे. मात्र शस्त्र केव्हा उचलायचे, कोणा विरोधात उचलायचे, कोणत्या परिस्थितीत उचलायचे हेही आम्हाला माहीत आहे. त्यामुळे नक्षलवाद्यांनी आम्हाला सशस्त्र लढ्याचा अनावश्यक सल्ला देऊ नये. सोबतच आम्ही तुमचा उघड विरोध करतोय. तुम्ही आमचे चेहरेही पाहून घ्या आणि जे करायचे आहे ते करून घ्या, असा सूचक इशाराही या पत्रातून नक्षलवाद्यांना देण्यात आला आहे.
नक्षलवाद्यांनो तुमचा सल्ला आमच्यासाठी अनावश्यक आहे. आधी तुम्ही तुमचे शस्त्र खाली ठेवा. देशाच्या कायद्याला मानायला शिका आणि त्यानंतर आम्हाला आरक्षणासाठी लढा कसा द्यावा या संदर्भात सल्ले द्या" तेव्हा कदाचित आम्ही तुमच्या सल्ल्यावर विचार करू असे आवाहन देखील मराठा समाजाकडून नक्षलवाद्यांना करण्यात आले आहे.