‘कोरोना’ प्रसाराची कहाणी

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2021   
Total Views |

corona_1  H x W
 
 

‘कोरोना’ विषाणू मानवनिर्मितच? : भाग ३

 
 
कोरोनाचे मूळ हे वुहानमध्येच होते, याचा ऊहापोह गेल्या दोन भागांमध्ये आपण केला. या विषाणूच्या प्रसाराला जबाबदार कोण याचीही माहितीही मागील भागांमध्ये जाणून घेतली. आजच्या भागात महामारीच्या काळात चीनचा निर्माण झालेला दबदबा आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बलाढ्य मानल्या जाणार्‍या फार्मा कंपन्यांनी महामारीचा कसा फायदा घेतला, याबद्दलची माहिती या लेखातून घेणार आहोत.
 
 
अतिशय प्रतिष्ठित मानल्या जाणार्‍या ‘मेडिकल जर्नल’ असलेल्या ‘द लॅन्सेट’मध्ये एखादी बाब प्रसिद्ध झाली की, तिला जगमान्यता मिळते. अशा या ख्यातनाम ‘द लॅन्सेट’ जर्नलने स्वतःचीच प्रतिमा धुळीस मिळवण्याचा चंग तर बांधला नाही ना, असा प्रश्न पडावा. आपल्या महाराष्ट्रातील डॉ. हिम्मतराव बावस्कर यांचा लेख ज्यावेळी या जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला, तेव्हा या मराठी माणसाबद्दल जगात ख्याती पसरली होती. पण, आता मात्र तसे वाटत नाही. कारण, डॉ. पीटर डेस्झॅक यांनी लिहिलेल्या लेखात कोरोना विषाणू हा नैसर्गिक असल्याचे सांगण्यात आले होते आणि अशा शंकेला वाव देणारे लेख त्या काळात प्रसिद्ध करण्यात आले.
 
 
 
दुसरी मोठी बाब म्हणजे, ‘हायड्रोक्सिक्लोरोक्विन’ (एचसीएन) हे कोरोनावरील औषध काही रुग्णांवर प्रभावी ठरत होते. अगदी अमेरिकेनेही या औषधाची मागणी केली होती. काही निर्बंध अटीशर्तींनंतर भारताने ही मागणी पुरवलीही होती. अमेरिकेचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही त्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानत भारत-अमेरिकेच्या मैत्रीचे दाखले दिले होते. नंतर लगेचच याच जर्नलने हे औषध कोरोनावर प्रभावी नसल्याचे प्रसिद्ध केले. भारताने याबद्दलचा आधार जर्नलकडून मागवलाही. परंतु, मूळ लेख लिहिणार्‍या व्यक्तीकडे या बाबतीत कुठचाही डेटा उपलब्ध नसल्याचे ‘द लॅन्सेट’ने उत्तर दिले आणि दिलगिरी व्यक्त केली. म्हणूनच अपप्रचार करण्यासाठी, भारताची प्रतिमा मलीन करण्यासाठी ‘लॅन्सेट’चा वापर केला जातो की काय, अशी शंका आता उपस्थित होऊ लागली आहे.
 
 
‘बिल आणि मिलिंडा गेट्स फाऊंडेशन’च्या मोठ्या गुंतवणुका या चार लसीकरण कंपन्यांमध्ये पूर्वीपासूनच आहेत. ‘फायझर’ ही त्यापैकी एक महत्त्वाची कंपनी. ‘फायझर’चा भारतातील लसीकरणाच्या बाजारपेठेवर कायम डोळा आहे. भारतातील ७० टक्के लसीकरणासाठी लोकसंख्या पाहता, ९० कोटी व्यक्तींना लस विकता येईल. त्यात दोन मात्रा म्हणजे १८० कोटी लसींची विक्री एकट्या भारतातच करता येईल. भारतात लस विकण्याला केंद्राने परवानगी देण्यासाठी केवळ एकच अट ठेवली की, भारतीय वंशाच्या व्यक्तींवर या लसीची चाचणी व्हावी. त्यानंतरच पुढील परवानगी देण्यात येईल. जर काही दुष्परिणाम जाणवले, तर कंपनी जबाबदार असेल, असेही सरकारने म्हटले होते. कारण, अमेरिकेत ‘फायझर’च्या लसींमुळे रक्तात गुठळ्या होण्याचे प्रमाण वाढले होते. ‘फायझर’ने दोन्ही अटींना साफ नकार दिला. जसे आहे तशीच लस घ्यावी लागेल, असे ‘फायझर’ने ठामपणे सांगितले. त्यामुळे भारताने ‘फायझर’ला लसविक्रीसाठीही नकार दिला.
 
 
अमेरिकेतील फार्मा कंपन्यांचा डोळा हा याच लसीकरणाच्या बाजारपेठांवर आहे. कारण, कोरोना आणि ‘लॉकडाऊन’च्या काळात दुसर्‍या कुठल्याच उत्पादनाला इतकी प्रचंड मागणी नाही. जगात साथीचे रोग आले की, औषधे महाग करायची आणि त्यातून नफा कमवायचा, असला उद्योग करणार्‍या या बलाढ्य कंपन्यांच्या बाबतीत कोरोनाकाळातही ही बाब काही नवीन नाही. भारत ‘फायझर’ कंपनीची लस घेत नाही म्हटल्यावर लसी तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल रोखण्याचे राजकारण अमेरिकेने सुरू केले आणि तेही याच ‘फार्मा लॉबी’च्या दबावाखाली. बिल गेट्स यांनीही लसीचे पेटंट विकण्याचा आग्रह धरला होता. त्यानंतर भारताने प्रतिदबाव दबाव टाकून कच्चा माल अमेरिकेकडून मिळवून घेतला. आंतरराष्ट्रीय स्तरावर फार्मा कंपन्यांचा दबदबा किती असेल, हे यावरून लक्षात यावे.
 
 
आता थोडं चीनकडे वळूयात. चीनमध्ये सुरुवातीला कोरोनाचे सात रुग्ण आढळले होते. तेव्हा डॉ. ली. वेन ली याँग या वुहानच्या डॉक्टरकडे गेले. या सात जणांना ‘कोविड’ आहे, ही माहिती डॉक्टरने ‘वी-चॅट’वर (व्हॉट्स अ‍ॅपसारखे अ‍ॅप) दिली होती. मात्र, चीन सरकारने खबरदारी घेत ही माहिती डिलीट करून टाकली. तरीही हा प्रकार जगभर समजला होता. डॉक्टरवर कारवाई करत त्याला अटकही करण्यात आली होती. या प्रकारावरून जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी चीनमध्ये जीवंत प्राण्यांची खाण्यासाठी विक्री होते, त्या वुहानच्या वेट मार्केटहून हा कोरोना पसरला, असा प्रचार-प्रसार केला. या मार्केटमध्ये वटवाघळांचीही विक्री होते. वुहान शहरात कडक ‘लॉकडाऊन’ जाहीर केले. हजारो लोक मृत्यमुखी पडले. परंतु, चीनने ही माहिती दाबून टाकली.
 
 
 
पुढे कोरोनाचा इशारा देणार्‍या डॉ. याँग यांचाही कोरोनामुळेच मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. इतके होऊनही वुहानमध्ये चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिंनपिंग पाहणीसाठी आले होते. तेव्हाही त्यांनी मास्क घातला नव्हता. पण, तरीही त्यांना कोरोनाची लागण झाली नाही. चीनमध्ये या विषाणूचा प्रयोग वुहानच्याच नागरिकांवर यशस्वी ठरला. त्यांना त्या विषाणूवर लसही मिळाली, अर्थात नंतर. शी जिंनपिंग यांनीही तशी लस घेतली असावी म्हणूनच ते बिनधास्त विनामास्क फिरत होते, असे म्हणायलाही वाव आहे. अमेरिकेने दिलेल्या निधीतून चीनने कोरोना विषाणूचे शस्त्र तयार केले, तेच चीनने अमेरिकेसह संपूर्ण जगावर उलटवले.
 
 
 
त्यावेळेस चीनमध्ये ‘लूनर न्यू ईयर’ हा राष्ट्रीय सण साजरा केला जात होता. चीनच्या बहुतांश नागरिकांनी वुहानहून विविध प्रांतात आणि जगभरातील विविध देशांमध्ये त्यावेळी प्रवासही केला. मात्र, त्याच वेळी बीजिंगहून जाणारी विमाने बंद करण्यात आली होती. मात्र, वुहानमधून इतर ठिकाणी जाणारी विमानसेवा सुरळीत सुरू होती. भारत, अमेरिका, युरोप, ऑस्ट्रेलिया या सर्व ठिकाणी चिनी नागरिक गेले आणि जाताना कोरोना विषाणूचे ‘न्यू ईयर गिफ्ट’ अवघ्या जगाला देऊन गेले. वुहानमध्ये कोरोना टेस्ट झाली होतीच. आता इतर देशांच्या नागरिकांवर या विषाणूची चाचणी यशस्वी होते का, हेच चीनला पाहायचे होते की काय, अशीही शंका उपस्थित होते.
 
 
दुसरे या प्रकरणातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे जॉर्ज सोरोस. या अमेरिकेतील कोट्यधीशाच्या जिथे जिथे गुंतवणुकी आहेत, त्या त्या ठिकाणी काहीतरी गडबड सुरू असते, असा आजवरचा इतिहास सांगतो. तर या सोरोसचीही गुंतवणूक वुहानच्या प्रयोगशाळेत आहे. सोरोस यांची कंपनी असलेल्या ‘ब्लॅक-रॉक’ची ‘मायक्रोसॉफ्ट’मध्येही गुंतवणूक आहे. हे सगळे एकमेकांशी निगडित आहेतच. इतके मोठे गुंतवणूकदार असल्याने जगातल्या कुठल्याही प्रसिद्धी माध्यमांनी त्यांच्याविरोधात बोलण्याची हिंमत केलेली नाही. ही माध्यमे कुणाला घाबरतात, अशा महत्त्वाच्या मुद्द्यांवर आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चा का होत नाही, हादेखील प्रश्न आहे. कोरोना महामारीच्या आडून एक मोठे कारस्थान तर शिजत नाही ना, अशा एका शंकेला वाव आहे. मात्र, याबद्दल काहीही ठोस पुरावे नसल्याने त्याबद्दल आवाज उठताना कुणी दिसत नाही.
 
 
 
डॉ. बॉईड हे ‘एड्स’च्या विषाणूवर संशोधन करणारे विषाणूतज्ज्ञ आहेत. पॅरिसमध्ये एप्रिल २०२०मध्ये त्यांनी कोरोना विषाणू हा नैसर्गिक नसून ‘एड्स’च्या विषाणूवर प्रक्रिया करून हा विषाणू तयार करण्यात आल्याचा दावा केला होता. याचे एकत्रित पुरावे तपासायला गेलो तर ते मिळणे मात्र कठीण आहे. कारण, एका विषाणूतून दुसर्‍या विषाणूची निर्मिती करणे, ही बाब पूर्वी ओळखता येत होती. मात्र, आता तंत्रज्ञान इतके अद्ययावत झाले आहे की, जुन्या विषाणूतून नवे विषाणू तयार करतानाचे पुरावे सहसा मागे सोडले जात नाही. मागील भागात आपण जाणून घेतल्याप्रमाणे जर हा विषाणू वटवाघळांद्वारे माणसांमध्ये पसरला असता, तर त्या विषाणूने त्या प्रजातींवरही हल्ला केला असता. मात्र, विशेषतः वटवाघळांवर कोरोनाच्या या विषाणूचा काहीही परिणाम होत नाही. तो माणसांसाठीच बनवण्यात आल्याचा हादेखील एक भक्कम पुरावा आहे.
 
 
चिनी संरक्षण विभागाच्या जर्नलमध्ये २०१५ मध्ये लिहून ठेवण्यात आले आहे की, आता लढाईसाठी दारूगोळा नव्हे, तर जैविक युद्धाची शस्त्रे लागणार आहेत. जैविक युद्धाची तयारी आपण करायला हवी. चिनी लोक पुढील ५० वर्षांचे नियोजन आधीच करून ठेवतात, असे म्हटले जाते. चीनच्या तत्त्वज्ञानातच, तसा उल्लेख आहे. डॉ. डेस्झॅकनेही आम्हाला कोरोनासारखेच १००हून अधिक विषाणू सापडल्याचा दावा केला होता. याचाच अर्थ, कोरोनाच्या कटकारस्थानाची तयारी आधीपासूनच तर केली नव्हती ना, अशीही शंका चीनबद्दल उपस्थित होते. अमेरिकेचेच तंत्रज्ञान आणि निधी वापरायचा आणि वेळ पडली तर अमेरिकेविरोधातच हे शस्त्र वापरायचे, हा चीनचा मानस गेल्या वर्षीच दिसून आला होता. ट्रम्प यांचा पराभव या सर्व घडामोडीला नवे वळण देणारा आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडन ही परिस्थिती कशी हाताळणार, भारत या आंतरराष्ट्रीय राजकारणाला कसे उत्तर देणार, याबद्दल आपण पुढील भागात जाणून घेऊयात...
 
- चंद्रशेखर नेने
(शब्दांकन : तेजस परब)
 
 
@@AUTHORINFO_V1@@