ज्ञानगंगा अभयारण्यात दुर्मीळ पांढऱ्या बुलबुलचे दर्शन

    12-Jun-2021
Total Views |


durmil pakshi edited_1&nb


मुंबई
: बुलढाण्यातील ज्ञानगंगा अभयारण्यात दुर्मीळ अल्बिनो प्रकारच्या बुलबुल पक्ष्याचे दर्शन घडले आहे. या पक्ष्याचे छायाचित्र हौशी पक्षी निरीक्षकांनी टिपले आहे. त्यामुळे पक्ष्यांच्या १६५ प्रजातींची विविधता असणाऱ्या या अभयारण्याचा वैशिष्ट्यामध्ये भर पडली आहे.
 
 
 
ज्ञानगंगा अभयारण्यातील बोथा मार्गावर भ्रमंती करीत असताना पक्षीनिरीक्षक डॉ. गजेंद्र निकम यांना पांढऱ्या बुलबुल पक्ष्याचे दर्शन घडले. निकम हे नियमितपणे बुलढाणा शहर आणि लगतच्या परिसरात पक्षी निरीक्षण करत असतात. या निरीक्षणादरम्यान त्यांना बोथा मार्गावर वेगळा पक्षी दिसल्याने त्याचे छायाचित्र टिपले.
 
 
 
याची माहिती पक्षीमित्र अमोल सावंत यांना दिली. त्यावेळी सावंत यांनी हा पक्षी दुर्मीळ पांढरा बुलबुल असल्याचे त्यांना सांगितले. रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे सजीवांची त्वचा अशी पांढरी होती. याला अल्बिनिझम असे म्हणतात. हा प्रकार आंशिक स्वरुपातही असू शकतो. ज्ञानगंगेत आढळलेल्या पांढऱ्या बुलबुलचा अल्बिनिझम हा आंशिक स्वरुपाचा आहे.
 
 
 
आंशिक अल्बिनिझम कधीकधी वाढीच्या काळात रंगद्रव्याच्या कमतरतेमुळे उद्भवू शकतो. हे अल्बिनिझम हा अनुवांशिकही असू शकतो. यापूर्वी बर्‍याच पक्ष्यांच्या प्रजातींमध्ये अल्बनिझम आढळून आला आहे. यामध्ये प्रामुख्याने हाऊस क्रो, कॉमन किंगफिशर, रेड-वाँटेड बुलबुल ,मुकुट असलेल्या स्पॅरो-लार्क, ब्लू रॉक पिजन, जंगल बॅबलर्सचा समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच रत्नागिरीत देखील पांढरा कावळा आढळून आला होता. ज्ञानगंगा अभयारण्यातील पांढऱ्या बुलबुलच्या दर्शनाने अभयारण्याची श्रीमंती वाढल्याची प्रतिक्रिया बुलढाण्याचे वनपरिक्षेत्र अधिकारी मयुर सुरवसे यांनी दिली.