नामदार ‘इनामदार’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-Jun-2021   
Total Views |

Inamdar_1  H x
 
 
रेडिमेड, मॅचिंग ब्लाऊज क्षेत्रात उत्तुंग नाव कमावलेला ब्रॅण्ड म्हणजे ‘एस. ए. इनामदार.’ इनामदारांच्या कन्या श्वेता इनामदार यांनी परिस्थितीचे चटके सोसत आणि ‘आयएएस’च्या स्वप्नांना तिलांजली देत, आज हा ब्रॅण्ड अफाट कष्ट उपसून अगदी सातासमुद्रापार पोहोचविला आहे. तेव्हा, या नामदार इनामदारांची ही यशस्वी उद्योगगाथा...
 
पुण्याच्या एस. ए. इनामदार अर्थात सुभाष अनंत इनामदार यांनी स्वत:चा व्यवसाय थाटण्यासाठी भारतीय वायुसेनेच्या सेवेतून स्वेच्छानिवृत्ती पत्करली आणि १९७९ साली पुण्याच्या शनिपार चौकात त्यांनी रेडिमेड ब्लाऊजेसचे छोटेखानी दुकानही थाटले. इनामदारांच्या पत्नी, आई यांचेदेखील याकामी त्यांना साहाय्य लाभले. इनामदारांची ज्येष्ठ कन्या श्वेता शाळेच्या सुट्ट्यांमध्ये वगैरे फावल्या वेळेत दुकानात जात असे. तिसरी-चौथीत असताना श्वेताने चक्क पाच रुपयाला पहिला ब्लाऊज विकल्याची आठवणही अगदी ताजी आहे. पण, आठवी-नववीपासूनच ‘आयएएस’ची स्वप्नं रंगवणार्‍या श्वेता यांना तसूभरही कल्पना नव्हती की, इनामदारांच्या या व्यवसायाची सर्वस्वी धुरा भविष्यात त्यांचीच जबाबदारी ठरेल. पण, नियतीचा क्रूर खेळ. दि. ६ जुलै, १९९२ रोजी सुभाष इनामदारांचे वयाच्या ४८व्या वर्षी अचानक निधन झाले. इनामदार कुटुंबीयांवर तर दु:खाचा डोंगर कोसळला. श्वेताच्या आईला हा धक्का सहन झाला नव्हता, बहीण लहान होती आणि मोठा भाऊ गतिमंद असल्याने असाहाय्य होता. त्यात ११ जुलैला श्वेता यांची दिल्लीला ‘आयएएस’ची प्रवेश परीक्षा असल्यामुळे अगदी जड अंत:करणाने अशा उद्विग्न परिस्थितीतही दुसर्‍याच दिवशी ७ जुलैला त्यांनी दिल्ली गाठायचे ठरविले. परंतु, त्यांना तरी कुठे कल्पना होती की, दिल्लीहून परीक्षा देऊन परतल्यानंतर जे काही आपण मागे सोडून गेलो होतो, ते सगळे एकाएकी असे उद्ध्वस्त झालेले असेल. श्वेता दिल्लीला असतानाच्या त्या एका आठवड्यात इनामदारांच्या वैभवाला ग्रहण लागले. ओळखीच्या-जवळच्या लोकांनीच घरातील अन्नधान्यापासून ते सोनेनाणेही लंपास केले. दुकानातही चोर्‍यामार्‍या झाल्या. महत्त्वाची कागदपत्रे गहाळ झाली. दुकान उघडण्यासाठी त्यांना आडकाठी करण्यात आली. बँकेने त्यांचे हक्काचे पैसे देण्यासही नकार दिला. ते म्हणतात ना, घर फिरले की घराचे वासेही फिरतात, तसाच हा सगळा वेदनादायी प्रकार. दिल्लीहून पुणे गाठल्यानंतर ही अनपेक्षित परिस्थिती पाहून श्वेताही एकाएकी खचून गेल्या. घरात अन्नाचा कण नाही आणि पैशांचीही चणचण. पण, या आभाळाएवढ्या संकटातून कुटुंबाला सावरण्याची सर्वस्वी जबाबदारी आता श्वेता यांच्याच खांद्यावर येऊन कोसळली होती. ‘आयएएस’ची प्रवेश परीक्षा त्या उत्तीर्णही झाल्या होत्या. परंतु, तो निकाल समजण्यापूर्वीच कौटुंबिक जबाबदार्‍यांचे भान बाळगत श्वेता यांनी ‘आयएएस’च्या स्वप्नाला तिलांजली दिली. घरातल्यांचे पोट भरण्यासाठी इनामदारांच्या व्यवसायाची सूत्रे वयाच्या अवघ्या विशीतच हाती घेतली. त्यामुळे विद्यार्थीदशेतून व्यवसायाचा कुठलाही पूर्वानुभव गाठीशी नसताना श्वेता इनामदार रातोरात उद्योजकाच्या भूमिकेत आल्या. परंतु, तरीही श्वेता यांनी कालौघात एसपी कॉलेजमधून ‘अर्थशास्त्र’ या विषयात पदव्युत्तर शिक्षण आणि नंतर ‘सिम्बॉयसीस’मधून ‘डिप्लोमा इन टॅक्सेशन’चे शिक्षण मात्र पूर्ण केले. परंतु, प्रारंभी दुकान चालवण्यापासून ते अगदी बँकेचे व्यवहार, कोर्टकचेर्‍या यांचे कसलेही ज्ञान गाठीशी नसताना त्यांनी ही जबाबादारी सक्षमपणे पेलली. अनुभवच त्यांचा एकलव्याप्रमाणे शिक्षक ठरला. श्वेता यांनी इनामदारांच्या ग्राहकांना पुन्हा आपलेसे केले. त्यांना दिवाळी, पाडव्याच्या विविध ‘ऑफर्स’ दिल्या. ग्राहकांच्या गरजा समजून घेतल्या. त्यांच्याशी सुसंवाद साधला. एकूणच आपल्या जिद्दीच्या, कर्तृत्वाच्या जोरावर त्यांनी आपले सर्वस्वच या व्यवसायासाठी समर्पित केले.
 
 
 
 
लग्नानंतर ठाण्यात स्थायिक झाल्यानंतरही त्यांनी काही काळ ठाणे-पुणे असा दररोज प्रवास केला. परंतु, सांसारिक जबाबदार्‍या आणि रोजची दगदग लक्षात घेता, १९९८ साली त्यांनी ‘एस. ए. इनामदार’ याच नावासह ठाण्यातही ‘रेडिमेड ब्लाऊजेस’चे शोरुम सुरु केले. त्यावेळीही आलेल्या आव्हानांचा श्वेता यांनी अगदी झोकून सामना केला आणि नव्या कारागिरांसह, नव्या डिझाईन्स, संकल्पनांसह अल्पावधीत ठाण्यातील ग्राहकांचाही विश्वास त्यांनी कमावला. या काळात त्यांच्या पतीचीही नोकरी गेली. पण, तरीही त्यांनी श्वेता यांना व्यवसायात पुरेपूर सहकार्य करत हातभार लावला. इनामदारांचा हा व्यवसाय श्वेता यांनी केवळ जीवंतच ठेवला नाही, तर नाविन्यपूर्ण प्रयोगांची उद्योगाला जोड देऊन तो अधिकाधिक विस्तारला. देशीविदेशी विविध ‘एक्झिबिशन्स’मध्ये त्या सहभागी झाल्या. पायाला भिंगरी लागल्याप्रमाणे नवे ते सर्व आत्मसात करण्यासाठी अख्खा भारत त्यांनी पालथा घातला. विविध प्रकारच्या ‘फॅब्रिक्स’ वापरुन ब्लाऊजेसमध्ये कलात्मकता दाखविली. त्यांचे स्केचिंग चांगले असल्यामुळे कटिंग, प्रोडक्शनमध्येही त्यांचा हळूहळू चांगलाच जम बसला. आज ‘एस. ए. इनामदार’ हा रेडिमेड ब्लाऊज क्षेत्रातला एक नामांकित ब्रॅण्ड असून विविध मालिकांमध्येही इनामदारांचे ब्लाऊजेस झळकत असल्याचे श्वेता अगदी अभिमानाने सांगतात. २०१० साली रेडिमेड ब्लाऊजेसची वाढती मागणी लक्षात घेता श्वेता यांनी मुंबईतील दादर येथे शोरुम सुरु केले. पुढे २०१९ साली त्यांनी थेट आंतरराष्ट्रीय भरारी घेत अमेरिकेत शोरुम सुरू करुन इनामदारांची पताका सातासमुद्रापार फडकावली. आज विविध सेलिब्रिटींबरोबरच नामवंत वकील, डॉक्टर, प्रशासकीय अधिकारी ते अगदी सर्वसामान्य महिलावर्गालाही त्यांच्या मनपसंतीचे ब्लाऊजेस इनामदारांकडे हमखास मिळतातच.
 
 
 
परंतु, गेल्या वर्षीपासून अवघ्या जगावर कोसळलेल्या कोरोना महामारीच्या संकटाचा श्वेता यांच्या उद्योगालाही फटका बसलाच. बँकांच्या ‘ईएमआय’पासून ते वीजबिलांपर्यंत सर्व खर्च करणे क्रमप्राप्त होते. त्यात या चारही शोरुम्समधील एकूण ३० महिला कर्मचार्‍यांच्या घरातील चूल पेटती ठेवण्याचीही मोठी जबाबदारी श्वेता यांच्यावर होती. पण, अशा परिस्थितीतही जिद्द आणि चिकाटीने ओतप्रोत भरलेल्या श्वेता अजिबात स्वस्थ बसल्या नाहीत. त्यांनी त्यांच्या घराच्या एका कोपर्‍यातच चक्क छानसे मिनी शोरुम थाटले. सोशल मीडिया, व्हिडिओ कॉलिंगवरुन ग्राहकांशी संपर्क केला. त्यांच्या संपूर्ण टीमलाही अशाच प्रकारे ‘वर्क फ्रॉम होम’मधून ब्लाऊजेस विक्रीचे त्यांनी धडे दिले. या ‘व्हर्च्युअल सेल’लाही ग्राहकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभल्याचे श्वेता सांगतात. तसेच उद्योजिका म्हणून आजवरच्या अनुभवांचे संचित आणि एकूणच संभाषण कौशल्याच्या जोरावर २००९ पासूनच त्यांनी ‘ऑनलाईन’ माध्यमांचा वापर करुन उद्योजकांना व्यवसाय प्रशिक्षणाचेही धडे दिले, ज्यातून प्राप्त उत्पन्नाचा त्यांना या संकटसमयी निश्चितच फायदा झाला. नुकतेच दुबईमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातही त्या ‘पॅनलिस्ट’ म्हणून सहभागी होत्या आणि त्यांच्या दहा मिनिटांच्या दमदार भाषणानंतर उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांच्या कडकडाटात त्यांचे कौतुकही केले. तसेच आजवर विविध नामांकित संस्थांच्या १४ पुरस्कारांनी श्वेता इनामदार यांना सन्मानितही करण्यात आले आहे. आपले हे व्यावसायिक यश ही आपल्या वडिलांना वाहिलेली श्रद्धांजलीच असल्याचे श्वेता भावनाविभोर होऊन प्रकर्षाने नमूद करतात. आज श्वेता यांची कन्याही त्यांच्या या व्यवसायात तितकाच रस घेऊन कार्यरत आहे.
 
 
 
पण, श्वेता यांच्याच शब्दांत सांगायचे तर त्यांच्यातील उद्योजिकेचा हा ‘जुनून’ अद्याप संपलेला नाही. आणखीन एका नव्या शोरुमच्या नव्या संकल्पनांसह श्वेता सज्ज आहेत. आमच्याशी व्यवयास करु पाहणार्‍या होलसेलर्सचे स्वागत असून ‘फ्रँचायझी’ही सुरु करण्यासाठी श्वेता अनुकूल आहेत. “एवढेच काय तर संधी मिळाली तर चंद्रावरही दुकान थाटायला आणि मृत्यूनंतर स्वर्गातील रंभा, मेनका, ऊर्वशी व देवींनाही ब्लाऊज विकायला मला आवडेल,” असे त्या अगदी आत्मविश्वासपूर्ण सांगतात. तेव्हा, अशा या नामदार इनामदार उद्योजिकेला दै. ‘मुंबई तरुण भारत’तर्फे पुढील प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@