मेट्रो-३ च्या भुयारीकरणाचे ९६ टक्के काम पूर्ण
01-Jun-2021
Total Views | 73
\
मुंबई - 'कुलाबा-वांद्रे-सीप्झ' या मेट्रो-३ च्या निर्माण कार्यातील ३८ वे भुयार खणून पूर्ण झाले आहे. हुतात्मा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) दरम्यानचे भुयार खणून मंगळवारी 'टनेल बोअरिंग मशीन' (टीबीएम) जमिनीबाहेर पडले. या भुयाराचे काम पू्र्ण झाल्यामुळे प्रकल्पातील ९६ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
सध्या शहरामध्ये मेट्रो वाहिन्यांचे जाळे बांधण्याचे काम वेगाने सुरू आहे. सोमवारी मेट्रो-२ अ (दहिसर ते डी.एन.नगर) आणि मेट्रो-७ (दहिसर ते अंधेरी) या मार्गावरील मेट्रोच्या चाचणीला सुरुवात झाली. या पार्श्वभूमीवर मंगळवारी मेट्रो-३ मधील अजून एक भुयारीकरणाचा टप्पा पूर्ण झाला. हुतात्मा चौक ते सीएसएमटी हा अप-लाईन मार्गाचा ५५७ मी. भुयारीकरणाचा टप्पा १४९ दिवसात पूर्ण झाला. या भुयारीकरणामुळे कफ परडे ते सीएसएमटी या पॅकेज -१ मधील भुयारीकरण १०० टक्के पूर्ण झाले आहे. 'सूर्या-१'या रॉबिन्स बनावटीच्या ड्युएल-मोड हार्ड-रोक टीबीएम मशीनव्दारे हे भुयारीकरण पूर्ण करण्यात आले.
मंगळवारी पूर्ण झालेल्या भुयारीकरणाच्या टप्प्यामुळे मेट्रो-३च्या एकूण सात पैकी सहा पॅकेजचे १००% भुयारीकरण पूर्ण झाले आहे. ऐतिहासिक वारसा इमारती नजीक भुयारीकरण करणे हे या प्रकल्पातील अनेक आव्हानात्मक कामांपैकी एक होते. मात्र, आमच्या अभियंत्यांनी व कामगारांनी सर्व सुरक्षेविषयक दक्षता घेत हे काम कौशल्यपूर्ण पद्धत्तीने पूर्ण केले याचा मला आनंद वाटतो, असे मेट्रो-३ चे व्यवस्थापकीय संचालक रणजित सिंह देओल सांगितले. मेट्रो-३ प्रकल्पाचे आतापर्यत एकूण ५२ किमी म्हणजेच ९६ टक्के भुयारीकरण पूर्ण झाले आहे.
पॅकेज-१ च्या भुयारीकरणाचा तपशील:
१) कफ परेड ते विधान भवन (अप लाईन १२२८ मी, डाऊन लाईन १२५४ मी)
२) विधान भवन ते चर्चगेट अप लाईन ४९८ मी, डाऊन लाईन ४८१ मी)
३) चर्चगेट ते हुतात्मा चौक (अप लाईन ६५४ मी)
४) हुतात्मा चौक ते सीएसएमटीअप लाईन (अप लाईन ५५७ मी डाऊन लाईन ५६९मी)