‘अर्थ’बोध जीवनाचा...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    01-Jun-2021   
Total Views |

डॉ. आशुतोष रारावीकर_1&nbs


विचार व कार्य याद्वारे अनेकांना जीवनार्थ उलगडून दाखविणारे डॉ. आशुतोष रारावीकर यांच्याविषयी...


डॉ. आशुतोष रारावीकर हा सर्वार्थाने अर्थपूर्ण जीवन जगणारा आणि इतरांच्याही जीवनाला ‘अर्थ’ प्राप्त करून देणारा एक नामवंत अर्थशास्त्रज्ञ, लेखक, वक्ता, साहित्यकार, तत्वज्ञ, गायक आणि विचारवंत. राष्ट्रकल्याणाचा दृष्टिकोन ठेवून आर्थिक धोरणांमध्ये योगदान देणारा एक ज्ञानवंत. आर्थिक स्थिती उत्तम असणे म्हणजेच यशस्वी जीवन नाही, तर आयुष्याला अर्थ प्राप्त होणे म्हणजे जीवन होय. ‘अर्थ’ या शब्दात जितका भावार्थ आहे, तितकाच नियोजनाचादेखील भाग आहे. भारताच्या आर्थिक चलन-वलनात ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’चे महत्त्व अनन्यसाधारण आहे. येथेच संचालकपदावर कार्यरत असणारे डॉ. आशुतोष रारावीकर यांनी आपल्या कार्यातून आणि विचारशक्तीच्या माध्यमातून अर्थपूर्ण आणि बोधात्मक जीवनाचा आदर्श उभा केला आहे. विचार, विश्लेषण व संशोधन याद्वारे भारताच्या आर्थिक धोरणांमध्ये योगदान देणे हे त्यांच्या सध्याच्या कार्याचे स्वरूप.
‘भारतातील एक प्रख्यात अर्थतज्ज्ञ’ अशीच त्यांची ओळख आहे.

१९९५ पासून त्यांनी रिझर्व्ह बँकेत विविध पदांवर काम केले आहे. त्यांनी दिल्ली येथे भारत सरकारच्या अर्थमंत्रालयातही संचालक म्हणून कार्यभार सांभाळला आहे. तसेच संचालक म्हणून ‘डिपॉझिट इन्शुरन्स अ‍ॅण्ड क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन’मध्ये काम केले आहे. नामवंत अर्थशास्त्रज्ञ डॉ. यशवंत रारावीकर हे त्यांचे वडील आणि विख्यात संस्कृततज्ज्ञ डॉ. अरुणा रारावीकर या त्यांच्या आई. नाशिकमध्ये जन्मलेल्या डॉ. रारावीकर यांची शैक्षणिक पार्श्वभूमी समृद्ध आहे. बारावीत ते संपूर्ण बोर्डात पहिले आले व सुवर्णपदकाचे मानकरी ठरले. संस्कृत व मानसशास्त्रातही ते सर्वप्रथम आले. त्यांना सरकारची प्रतिष्ठेची ‘टॉपर्स स्कॉलरशिप’ व इतर अनेक शिष्यवृत्त्याही प्राप्त झाल्या. ‘एमबीए’ व विद्यावाचस्पती असणार्‍या रारावीकरांना विद्यापीठ अनुदान आयोगाने ‘रिसर्च फेलोशिप’ प्रदान केली. तसेच बँकिंग क्षेत्रातील ‘सीएआयआयबी’ व अध्यापन क्षेत्रातील ‘नेट’ हे किताब त्यांना प्राप्त झाले. त्यांना अमेरिकेच्या प्रख्यात ‘सीएफए इन्स्टिट्यूट’ने ‘इन्व्हेस्टमेंट फाऊंडेशन सर्टिफिकेट’ प्रदान केले. तसेच अमेरिकेतील ‘आयएमएफ’ने ‘हार्वर्ड’ व ‘एमआयटी’सह त्यांना ‘फायनान्शियल प्रोग्रॅमिंग’ व पॉलिसीमधील सर्टिफिकेट प्रदान केले आहे.


ते अनेक पुरस्कारांचे मानकरी आहेत. यात सर्वोत्कृष्ट आर्थिक लेखनासाठीचा ‘अमर्त्य सेन पुरस्कार’, अर्थशास्त्रातील अतुलनीय योगदानाबद्दल ‘डॉ. रामचंद्र पारनेरकर अर्थशास्त्र पुरस्कार’, ‘बँकिंग उत्कृष्टता पुरस्कार’, ‘रंगत-संगत प्रतिष्ठान’चा ‘काव्यप्रतिभा पुरस्कार’, ‘चैत्रगौरव पुरस्कार’, भारत सरकारच्या अन्न मंत्रालयाचे अन्नधान्य समस्येवरील शोधनिबंधासाठीचे राष्ट्रीय पातळीवरील पारितोषिक, तसेच आर्थिक लेखनासाठी इतर राष्ट्रीय पारितोषिके इत्यादींचा समावेश आहे. त्यांची ४०पेक्षा अधिक लेखनसंपदा आहे. त्यांचे ‘फिस्कल डेफिसिट अ‍ॅण्ड इन्फ्लेशन इन इंडिया : अ स्टडी इन नेक्सस’ हा ग्रंथ आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रसारित आहे. त्यांचे ‘यशपुष्प’ हे अत्यंत लोकप्रिय पुस्तक मराठी साहित्याचा मानबिंदू ठरला आहे. सध्याच्या नैराश्यपूर्ण काळात जीवनाची आशा जागृत करण्याचं आणि ती प्रत्यक्षात उतरवण्याचं काम ते करत आहे. यातले सर्व विचार जीवन मार्गदर्शक आहेत. ते ‘मुंबई स्कूल ऑफ इकोनॉमिक्स’ व ‘पब्लिक पॉलिसी’ संस्थेच्या संचालक मंडळाचे सदस्य आहेत. शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी महाराष्ट्र शासन शैक्षणिक समिती, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठ, पुणे विद्यापीठ यांच्या सल्लागार मंडळ व इतर समित्यांमध्ये सदस्य म्हणून काम पाहिले आहे व अभ्यासक्रमांची रचना व अभ्याससाहित्याचे लेखनही केले आहे.

डॉ. रारावीकरांनी गेल्या तीन दशकांमध्ये अनेक महत्त्वपूर्ण आर्थिक विषयांवर काम, संशोधन आणि लेखन करून मोठे योगदान दिले आहे. यात वित्तीय तूट व महागाई, दारिद्य्र, शासकीय देशांतर्गत व परदेशी कर्ज नियोजन, व्यापारी कर्जे, डिपॉझिट इन्शुरन्स, मौद्रिक धोरण, आंतरराष्ट्रीय संस्था व व्यापार, सेंट्रल बँकिंग, व्यापारी व सहकारी बँकिंग, अर्थसंकल्प, वित्तीय बाजार, औद्योगिक उत्पादकता, अन्न सुरक्षा, कृषी व्यापार व कर्जबाजारीपणा, परकीय गुंतवणूक, परकीय चलन विनिमय दर, जेंडर बजेटिंग, आर्थिक प्रशासन, व्यक्तिगत गुंतवणूक, उत्पादन व पुरवठा साखळी, ग्रामीण अर्थव्यवस्था, अभिलेख व्यवस्थापन, राष्ट्रीय उत्पन्न व विकास, आर्थिक इतिहास इत्यादींचा समावेश आहे. तसेच ‘रिझर्व्ह बँक’ आणि भारत सरकारच्या ‘इकोनॉमिक सर्व्हे’ यांसारख्या आंतरराष्ट्रीय प्रकाशनांमध्ये त्यांचे योगदान राहिले आहे. वाणी आणि लेखणी याद्वारे सोप्या शब्दांत आर्थिक साक्षरता घडवून ज्ञानगंगेचं पवित्र जल त्यांनी अनेक रोपट्यांपर्यंत पोहोचवले आहे. विविध देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदा व चर्चांमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.

समृद्ध आणि सरस्वतीचे वरदान लाभलेल्या कुटुंबात जन्मलेल्या डॉ. रारावीकर यांनी स्वकर्तृत्वाने हाच वारसा उत्तमरीत्या पुढे नेला आहे. अर्थशास्त्रासारखा किचकट विषय आणि त्याचे मानवी जीवनातील मोल सर्वसामान्यांना समजावे यासाठी डॉ. रारावीकर यांचे लेखन व व्याख्याने हे अनेकांसाठी मैलाचा दगड ठरत आहे. आध्यात्मिक योगसाधनेवर जीवनाची उभारणी आणि ध्येयप्राप्तीसाठी अखंड तपश्चर्या हे त्यांच्या यशाचं रहस्य. ते अत्यंत प्रभावी व श्रोत्यांना मंत्रमुग्ध करणारे वक्ते आहेत. त्यांचा अनेक माध्यमांमध्ये गौरव झाला आहे. डॉ. रारावीकर हे जीवनाचा अर्थ आपल्या कार्यातून अनेकांसमोर उलगडून दाखवत आहेत. त्यांच्या आगामी कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!

@@AUTHORINFO_V1@@