१७व्या शतकाच्या मध्यावर जन्मलेल्या आणि मृत्यू पावलेल्या लाझारूस यांना संत पोप आणि रोमन कॅथलिक चर्चने ‘संत’ म्हणून पदवी जाहीर केली आहे. लाझारूस नावावरून कोणीतरी पाश्चिमात्य व्यक्ती वाटेल. पण, छे! लाझारूस यांचे बाप्तिस्मा स्वीकारण्यापूर्वीचे नाव होते देवसहायनम पिल्ले यांचे. त्रावणकोर साम्राज्यातील उच्चभू्र कुटुंब. पिल्ले कुटुंब त्रावणकोर संस्थानाच्या राजाचे म्हणजे मार्थडा वर्माचे अतिशय जवळचे कुटुंब. राजाच्या आणि राज्याच्या कुलदेवतेच्या मंदिराची पूजाअर्चा आणि देखभाल करण्याचे काम या पिल्ले कुटुंबाकडे. देवीची पूजाअर्चा आणि पारंपरिक संस्कृती आणि रीतिभाती सांभाळणारे पिल्ले कुटुंब. या पिल्ले कुटुंबाचे वशंज म्हणजे देवसहायनम. तर या देवसहायनम यांना रोमन कॅथलिक चर्चने ‘संत’ उपाधी देण्याची घोषणा का केली असावी? तर रोमन कॅथलिक चर्चचे म्हणणे, देवसहायनम येशूच्या मार्गावर जीवन जगले. म्हणजे कसे जगले तर आपण ते पाहूया- देवसहायनम एका ख्रिस्ती व्यक्तीच्या संपर्कात येतात. ते ख्रिश्चन होतात. त्यांचे नाव देवसहायनम बदलून ‘लाझारूस’ ठेवण्यात येते. त्रावणकोर राजा त्यामुळे नाराज होतो. आपल्या धर्मप्रिय नागरिकाने धर्म का सोडावा? याचे त्यांना दुःख झाले. त्यातच देवसहायनमच्या धर्मपरिवर्तनाने त्याच्या घरचे, नातेवाईक, त्यांच्या घरचे नोकर-चाकर आणि कितीतरी जणांना नाइलाजाने ख्रिस्ती व्हावे लागले. देवीचे पुजारी ख्रिस्ती धर्म स्वीकारतात म्हणजे नक्की हा धर्म आपल्या देवाधर्मापेक्षा मोठा असला पाहिजे, असा गैरसमज राज्यात वाढला. त्यामुळे राज्यात एकच गोंधळ उडाला. त्यात देवसहायनम सोबत सातासमुद्रापलीकडील येशूचे नावकरी असतातच. वैतागून राजा देवसहायनमला मृत्युदंड ठोठोवतो. भारतीयांच्या मते हे देवसहायनमचे कार्य. पण, रोमन चर्चने या जीवनचरित्राला चांगलेच रंगवले. देवसहायनम मानवी समानता प्रस्थापित करत होता म्हणून अज्ञानी राजाने त्याला मारले, असे रोमन कॅथलिक चर्चचे म्हणणे. रोमन कॅथलिक चर्चनुसार तोच संत होऊ शकतो, ज्याने आयुष्यात दोन तरी चमत्कार करायला हवे. आता देवसहायनमचा चमत्कार सांगताना चर्च सांगते की, राजाने मृत्युदंड ठोठावल्यावर सैनिक देवसहायनमला दूर निर्जन टेकडीवर घेऊन गेले. त्याला तिथे बांधून ठेवले. प्यायला पाणी आणि खायला अन्न दिले नाही. मग देवसहायनमने दोन्ही हाताच्या कोपरांनी टेकडी खणली आणि तिथे लगेच पाणी लागले. तर दुसरा चमत्कार असा की, सैनिक देवसहायनमवर शस्त्राने हल्ला करू लागले. पण, ते शस्त्र देवसहायनमवर चाललेच नाही. मग सैनिकांची दया येऊन देवसहायनम त्या शस्त्राचे चुंबन घेतो आणि काय आश्चर्य, शस्त्राने देवसहायनम मृत्युमुखी पडला. तर या चमत्कारांसाठी देवसहायनमना चर्चची, ‘संत’ उपाधी मिळणार आहे. पण, तरीही या चमत्कारांना ‘थोतांड’ किंवा ‘अंधविश्वास’ मात्र अजिबात म्हणायचे नाही बरं का?
असो. ‘संत’ उपाधी जाहीर झाली, तेव्हा ‘लाझारूस’ असा उल्लेख न करता ‘देवसहायनम पिल्ले नायर यांना संत उपाधी दिली जाते,’ असे म्हटले गेले. यावर दक्षिण भारतातल्या दोन व्यक्तींनी रोमन चर्चला विचारणा केली की, देवसहायनम हे लाझारूस झाले. मग लाझारूस नाव वापरा. तसेच भारतीय घटनेत जातीपातीला स्थान नसल्याने भारतीय व्यक्तीचे नाव तुम्ही जातीशी जोडू शकत नाही. यावर काही विचारवंतांनी सांगितले की, बरोबर आहे, देवसहायनम ख्रिस्ती झाल्यावर त्याच्या पूर्वाश्रमीचा धर्म-जात लावणे योग्य नव्हे. ‘कॅथलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया’, दलित आणि मागासवर्गीय कार्यालयाचे सेक्रेटरी फादर झे. देवासागाय राज म्हणतात की, “आम्हाला आनंद झाला की, हिंदू धर्म सोडून ख्रिस्ती धर्म स्वीकारणार्या देवसहायनमला ‘संत’ उपाधी मिळाली.” तर आता देवासागाय यांच्यावरूनच वाटते की, देवासागाय हे फादर आहेत, ख्रिस्ती धर्माचे काम करतात, मग त्यांनी त्यांचे हिंदू पद्धतीचे नावच का कायम ठेवले. तर उत्तर सोपे आहे की, विदेशी नावापेक्षा भारतीय स्थानिक नावांना वस्तीत शिरताना बंधन येत नाहीत. फादर देवासागाय हे याचेच उदाहरण. ख्रिस्ती धर्मात जातीपाती नसतील, असे मानणार्यांना ख्रिस्ती धर्म समानता मानते, मग ‘कॅथलिक बिशप कॉन्फरन्स ऑफ इंडिया’च्या दलित आणि मागासवर्गींयांसाठीच्या कार्याबद्दल काय मत असेल? की, केवळ दलित आणि मागासवर्गीयांनाच टार्गेट केले आहे. लाझारूसच्या संतपदाने अनेकानेक प्रश्न उमटले आहेत.