बंगाल हिंसाचारामधील आरोपींच्या मुसक्या आवळणार ! गृहमंत्रालयाची टीम कोलकात्यात

    06-May-2021
Total Views |

west bengal _1  


कोलकाता -
पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीच्या निकालाअंती सुरू असलेल्या हिंसाचाराच्या तपासासाठी केंद्रीय गृहमंत्रालय सरसावला आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून ४ सदस्यांची एक टीम गठीत करण्यात आली असून ही टीम कोलकात्याला पोहोचली आहे.
 
 
पश्चिम बंगालमध्ये सुरू असलेल्या हिंसाचाराबाबत कारवाई करण्यास केंद्रीय गृहमंत्रालयाने सुरुवात केली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने या हिंसाचाराबाबत राज्याकडून अहवाल मागविला होता. मात्र, अहवाल न पाठवल्यामुळे कडक शब्दात मंत्रालयाने राज्याला इशारा दिला होता. त्यानंतर आता मंत्रालयाने स्वत: ची फॅक्ट फाइंडिंग टीम राज्यात पाठविली आहे. २ मे रोजी तृणमूल काॅंग्रेसच्या विजयानंतर भाजपा कार्यकर्त्यांवर हल्ले सुरू झाले. तृणमुल काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी हे हल्ले केल्याचे आरोप आहेत.
 
 
केंद्रीय गृह मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव स्तरावरील अधिकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये ४ सदस्यीय टीम हिंसाचाराच्या घटना आणि बंगालमधील ताज्या परिस्थितीची चौकशी करेल. या टीममध्ये सीआरपीएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गुरुवारी ही टीम कोलकात्यामध्ये पोहोचली आहे. यापूर्वी केंद्रीय गृह मंत्रालयाने पश्चिम बंगालच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून म्हटले होते की, एचएमओला अहवाल न मिळाल्यास याचा फार गांभीर्याने विचार केला जाईल. राज्य सरकारकडूनही केंद्रीय टीमला सहकार्य करुन त्यांना आवश्यक माहिती पुरविणे अपेक्षित आहे. एनएचआरसी (राष्ट्रीय मानवाधिकार आयोग) आणि एनडब्ल्यूसी (नॅशनल कमिशन फॉर वुमन) यांनी यापूर्वी हिंसाचाराच्या घटनांवर कारवाईची तयारी दर्शविली आहे. एनएचआरसीने देखील एक तथ्य शोधून टीम तयार करून चौकशी करण्यास सांगितले आहे. एनडब्ल्यूसीने महिलांवरील हल्ल्यांचा अहवाल मागविला आहे.