देशाटनाचा ध्यास

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    05-May-2021   
Total Views |

Rohan Gokhle_1  
 
 
 
देशाटनातून आरोग्य जनजागृती करणार्‍या ठाण्यातील युवा रोहन गोखले या दुचाकीस्वाराचा अविस्मरणीय जीवनप्रवास...
 
 
सुखवस्तू कुटुंबात जन्मलेल्या रोहन गोखले या धाडसी युवकाचे दुचाकीवरून देशभ्रमंती करण्याचे स्वप्न अखेर त्याने कोरोनाकाळातील ‘लॉकडाऊन’मध्ये पूर्ण केले. केवळ भ्रमंती न करता, देशभर कोरोनाबाबत घ्यावयाची दक्षता व उपाययोजनांच्या आरोग्यमंत्राचा प्रसारही त्याने केला. या देशभ्रमंतीसाठी रोहनने विमा कंपनीतील नोकरीचाही त्याग केला, हे विशेष!
 
 
ठाणे पूर्वेकडील टिळकनगरमधील मेघदूत सोसायटीत सेवानिवृत्त आई-वडील व लहान बहिणीसोबत राहणार्‍या रोहनचा जन्म ५ ऑक्टोबर, १९८३ साली झाला. रोहनला बालपणापासूनच सायकलिंग व दुचाकीचे आकर्षण. त्याचा कल हेरून पालकांनीही आढेवेढे न घेता, उलट प्रोत्साहनच दिले. तब्बल २२ वर्षे त्याच्या वडिलांनी दुचाकीवरून राज्यभर भ्रमण केले होते. हाच वारसा जपताना गेली दहा वर्षे त्याने दुचाकी रायडिंग करून अनेक प्रदेश पादाक्रांत केले आहेत.
 
 
‘बी.कॉम.पर्यंत शिकलेल्या रोहनला नेहमीच समाजासाठी आपण काही तरी केले पाहिजे, असे वाटत असे. आईनेही रोहनच्या या स्वप्नांना बळ दिल्याने दुचाकी रायडिंगच्या माध्यमातून त्याने आरोग्य प्रबोधनाचा वसा घेतला. नोकरीचा व्याप सांभाळून रायडिंगसाठी कूच करण्यात अडथळे उद्भवू लागले. त्यात त्याला वेध लागले होते दुचाकीवरून भारतभ्रमणाचे. मनाशी निश्चय पक्का केला होता. अखेर, दहा वर्षांची नोकरी सोडून रायडिंगवर निघायचे त्याने ठरवले. त्यानुसार कोरोनाच्या पहिल्या लाटेवेळच्या ‘लॉकडाऊन’ काळातील या संधीचा सदुपयोग करण्याचे त्याने ठरवले आणि दोन चाकांवरच्या या प्रवाशाची स्वारी देशाटनासाठी बाहेर पडली. तो दिवस होता ६ डिसेंबर, २०२०.
 
 
ठाणे येथून त्याने आपल्या प्रवासास सुरुवात केली. गुजरात, राजस्थान, हरियाणा, हिमाचल प्रदेश, उत्तर प्रदेश, सिक्कीम, मध्य प्रदेश, झारखंड, छत्तीसगड, ओरिशा, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळ आदी विविध भागांत त्याने दुचाकीवरून भ्रमण केले. अंदमानला जाण्यासाठी जी प्रक्रिया करायची होती, त्यासाठी एक महिना लागणार होता आणि लक्षद्विप येथे जाण्यासाठी क्रूझशिवाय पर्याय नव्हता म्हणून अंदमानला विमानाने, तर लक्षद्विपला क्रूझने भेटी दिल्या. प्रत्येक राज्याच्या राजधानीला तो भेटी देत होता. ज्या ज्या ठिकाणी रोहन गेला, तेथील प्रत्येक भारतीयाने त्याचे स्वागत केले. कोणी स्वतःच्या घरात राहण्यास सांगितले. कधी तो गुरुद्वारा, कधी हॉटेलमध्ये राहिला. त्रिपुराला असताना तो मंदिरातही राहिला.
 
 
राजस्थानात शिक्षण संस्थाचालक रुदाराम बिश्नोई व भास्कर कुटुंबाने साथ दिली. त्रिपुरा, आगारतळा येथे दुचाकीला अपघात झाला होता, तेव्हा तेथील दिव्येंदु नाथ या युवकाच्या कुटुंबाने मोलाची मदत केली. क्षतिग्रस्त झालेल्या दुचाकीलाही ठिकठाक करून दिले. केवळ ‘सोशल मीडिया’तील परिचयातून कर्नाटकातील दीपक कामथ यांनी राहण्याची सुविधा, तसेच मार्गदर्शनही केले. तामिळनाडूतील कोईम्बतूरचे शेतकरी बालाजी सुरेश हे स्वतः रायडर असल्याने रोहनच्या मदतीस धावले. दिल्लीतील डॉ. मणिभूषण यांनीही ईशान्य भारतात असताना मदतीचा हात दिल्याच्या आठवणी रोहन आवर्जून जागवतो. स्वतःची पदरमोड करून भारतभ्रमण करताना हिमवर्षाव, पर्वत ओलांडणे, चिखल, गळपट्टा, दगड, उंच डोंगर चढणे इत्यादीसह वास्तव्यासाठी होम स्टे, गुरुद्वारा, मंदिर, स्थानिक वनवासींची घरे, गावे, कॅम्प, तंबू, हॉटेल इत्यादींचा अनुभव घेतल्याचे रोहन सांगतो. प्रत्येक राज्याची जीवनशैली, त्यांची खाद्यसंस्कृती जाणून घेता आली. अरुणाचल प्रदेश येथे गेल्यावर तेथील वनवासी बांधवांनी त्यांच्या घरात राहण्याची सोय करून अगदी कुटुंबातील सदस्यांप्रमाणे पाहुणचार केला. भ्रमंतीसाठी निघताना मानसिक तयारीसह रोहनचा व्यायाम करण्याचा शिरस्ता कायम असल्याचे तो सांगतो.
 
 
रोहनने १४० दिवसांत भारतातील २८ राज्ये आणि सहा केंद्रशासित प्रदेशांना भेटी देत २५ हजार ५२५ किमीचा प्रवास करून भारतभ्रमण केले. लडाख आणि जम्मू-काश्मीरची वारी लसीकरणामुळे रखडली असली, तरी येत्या जूनअखेर तोही पल्ला पार पडेल, असा विश्वास रोहन व्यक्त करतो. विशेष म्हणजे, या संपूर्ण भ्रमंतीत रोहनने रस्ते सुरक्षेबरोबर कोरोनाचे नियम पाळण्याचा संदेश तेथील जनतेला दिला. मास्क परिधान करा, वेळोवेळी हात धुवा, यासह सामाजिक अंतर ठेवण्याचा आरोग्यमंत्र ठिकठिकाणी दिला. ६ डिसेंबर, २०२० रोजी सुरू केलेला प्रवास नुकताच २४ एप्रिल, २०२१ रोजी सायंकाळी पूर्ण झाला.
 
 
‘केल्याने देशाटन’ यातून अंगी बाणणारा आणखी एक गुण म्हणजे स्वावलंबन. शाळेत जाताना डबा-पाण्याची बाटली भरून देण्यापासून ते बुटाची लेस बांधण्यापर्यंत सगळंच आई-बाबा करतात. त्यामुळे, स्वतःची कामे स्वतः करण्याची सवय नसते. जेवण झाल्यावर आपले ताट उचलणे, अंथरूण-पांघरुणाची घडी घालणे, अशा अनेक गोष्टींची सवय नसलेल्या रोहनला या भटकंतीने आत्मनिर्भर बनवल्याचे तो सांगतो. समोर येईल ते खाण्याची सवय देशाटनामुळेच लागली. केवळ घरचेच पदार्थ खाण्याची सवय असल्यामुळे त्या त्या प्रदेशातील विविध पदार्थ व जिन्नसांची चवही यानिमित्ताने चाखता आल्याने घरात नको असलेले; पण शरीराला आवश्यक असे पदार्थ खाण्याची सवय अंगवळणी पडून गेल्याचे रोहन सांगतो. शिवाय एकटे फिरण्याची सवय होते. अनेक लोकांचा सहवास आपल्याला मिळतो. आपण पुस्तकातून विविध प्रदेश फक्त वाचलेले, ऐकलेले असतात. पण, प्रत्यक्ष त्यांचा अनुभव घेतलेला नसतो. त्या त्या भागातील भाषा, तेथील पेहराव, परंपरा, संस्कृती आणि राहणीमान अशी सर्वच अनुभूती आपल्याला मिळल्याचे सांगताना रोहन पुरस्कारांची बातही अभिमानाने सांगतो. २०१९ मध्ये मुंबई, दिल्ली, कोलकाता आणि चेन्नई या भारताच्या चारही कोपर्‍यात दुचाकीवर १८ दिवसांत फिरून या भागातील ५० ठिकाणांना भोज्जा केल्याने ‘इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये ‘गोल्डन क्वाड्रीलेटरल’मध्ये नाव कोरले.
 
 
आपल्या भारत देशात निसर्गासह नानाविध गोष्टी आहेत. त्यामुळे देशाटन म्हटल्यावर केवळ परदेशगमन हे आपण डोक्यातून काढून आपल्या भारतभूमीवरील भाग जरी फिरून आलो, तरी कितीतरी गोष्टींचा अनुभव आपल्याला सहज मिळेल. तेव्हा, या देशाटनामुळे, भटकंतीमुळे आपले जीवन अधिक समृद्ध आणि संपन्न होण्यास नक्की मदत होईल, असे मानणार्‍या रोहनचा भविष्यात दुचाकीवरून आंतराराष्ट्रीय रायडिंग करण्याचा मानस आहे. त्याच्या या महत्त्वाकांक्षेला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@