केंद्रीय गृहमंत्रालयाची अधिसूचना जारी
नवी दिल्ली, विशेष प्रतिनिधी : केंद्र सरकारने अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश येथून भारतात आलेल्या बिगरमुस्लिम शरणार्थींना भारतीय नागरिकत्व प्रदान करण्यासाठी अर्ज मागविले आहेत. गुजरात, राजस्थान, छत्तीसगढ, हरियाणा आणि पंजाब या पाच राज्यांतील १३ जिल्ह्यांमध्ये राहणाऱ्या शरणार्थींना हा लाभ मिळणार आहे.
केंद्रीय गृहमंत्रालयाने २८ मे रोजी गॅझेट नोटिफीकेशन जारी केले आहे. त्यानुसार, अफगाणिस्तान, पाकिस्तान आणि बांग्लादेश येथून भारतात आश्रय घेतलेल्या धार्मिक अल्पसंख्यांक समुदायाच्या म्हणजे हिंदू, शिख, जैन, बौद्ध, पारशी आणि ख्रिश्चन व्यक्तींना भारतीय नागरिकत्व देण्याचा निर्णय घेतला आहे. गुजरातमधील मोरबी, पाटण आणि वडोदरा, छत्तीसगढमधील दुर्ग आणि बलोदबाजार, राजस्थानातील जालौर, उदयपूर, पाली, बाडमेर आणि सिरोही, हरयाणातील फरिदाबाद आणि पंजाबमधील जालंधर या १३ जिल्ह्यांमध्ये आश्रय घेतलेल्या शरणार्थींना भारतीय नागरिकत्वासाठी अर्ज करायचा आहे. संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी त्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
केंद्र सरकारने हा निर्णय नागरिकत्व कायदा, १९५५ च्या कलम १६ द्वारे प्राप्त पदत्त अधिकारांचा आणि कायद्यात २००९ करण्यात आलेल्या नव्या नियमांचा वापर करून केंद्र सरकारने कलम ५ अंतर्गत हा निर्णय घेतला आहे. दरम्यान, सुधारित नागरिकत्व कायद्याची नियमावली अद्याप तयार करण्यात आलेली नाही.