मुंबई : "सध्याची परिस्थिती पाहता पॉझिटिव्ह रेट जास्त आहे, त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी १५ दिवसांनी वाढवण्याचा विचार सुरु आहे. तसेच, गर्दीचे सर्व कार्यक्रम बंदच राहणार आहेत," असे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी शुक्रवारी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले आहे. "म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर मोफत उपचार करण्यासाठी महात्मा फुले जन आरोग्य योजना लागू करण्यात आली आहे. त्यामुळे या योजनेअंतर्गत रुग्णांनी उपचार घ्यावेत. त्यासाठी सरकारने राज्यभरात १३१ रुग्णालये निश्चित केली आहेत. त्यामध्ये या आजारावर मोफत उपचार करण्यात येत आहेत," असेही आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
"म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शनचा तुटवडा आहे. त्यामुळे खासगी रुग्णालयात ते वेळेवर मिळत नाहीत. या इंजेक्शनचे नियंत्रण केंद्र सरकारकडे आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राच्या वाट्याला जेवढे इंजेक्शन देते, त्याचे रुग्णांच्या संख्येनुसार वाटप केले जाते. इंजेक्शन्स उपलब्ध होण्यात अडचणी येत असल्याने रुग्णांच्या नातेवाईकांना मानसिक त्रास होत आहे," असेही टोपे म्हणाले. त्याचबरेबर केंद्रीय पर्यावरण मंत्री नितीन गडकरी यांनी वर्ध्यात म्युकरमायकोसिसच्या इंजेक्शन्सचे उत्पादन सुरू केल्याने त्यांचे अभिनंदन केले.
"लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले असले तरी यात केंद्राने हस्तक्षेप करण्याची गरज आहे, हा विषय केंद्राच्या अखत्यारीत आहे. लसीकरणाला लागणारा निधी आम्ही तयार करून ठेवला आहे. एका चेकने सर्व रक्कम द्यायला आम्ही तयार आहोत. आता फक्त केंद्राने लस द्यायला हवी," असेही टोपे म्हणाले. पुढे त्यांनी सांगितल की, "लहान मुलांच्या लसीकरणाबाबत देशात अजून कोणतेही धोरण ठरलेले नाही. मात्र, तिसऱ्या लाटेत लहान मुलांना अधिक धोका असल्याचे सांगितले जात आहे,"