सध्याची देशातील तसेच देशाबाहेरील कोरोना महामारीच्या संकटाची परिस्थिती आणि एकूणच अतिशय निराशेचे वातावरण असताना, चहुबाजूंनी घोर भ्रष्टाचार, अनीतीचे राजकारण आणि एकंदरच अत्यंत मानसिक खच्चीकरणाची परिस्थिती असताना, मनात स्वातंत्रवीर सावरकर यांच्या काळ्या पाण्याची अंदमानातील शिक्षा या घटनेला २ मे, २०२१ रोजी १०० वर्षे पूर्ण झाली. या विचारासरशी मनात आलं की, एवढी मोठी अमानवी शिक्षा ५० वर्षांची दोन जन्मठेपेची कठोर शिक्षा ऐकूनच त्यांची काय अवस्था झाली असेल, याची कल्पनाही करवत नाही.
सावरकरांचे मन नेहमी ‘प्रतिकुल तेच बहुधा घडेल’ असे चिंतीत असे आणि या प्रतिकुलतेला तोंड देण्याची सिद्धता करीत, असे कदाचित फाशी जाण्याची मनाची सिद्धता करून ठेवली असताना, ही तिसरी नवीनच आणि त्याहूनही भयाण वाटणारी शिक्षा उभी ठाकली, पण शिक्षेची तीव्रतम कल्पना केल्यामुळे कदाचित सुसह्य वाटली. त्यापूर्वीच शिक्षेच्या २५ वर्षांच्या कालावधीत काय काय करायचे, याचे नियोजनही करून ठेवले होते.
वरील नियमाने हानी न होता प्रतिकूल घडले असता त्याची कल्पना आधीच केल्याने मनाची एक प्रकारे उत्तम सिद्धता होते आणि जर आयुष्यात अनुकूल घडले, तर आनंद द्विगुणित होतो. याउलट अनुकूलाची अपेक्षा ठेवून तसे घडले नाही, तर निराशेच्या खोल गर्तेत सापडण्याची शक्यता असते. हे हलाहल अशा पद्धतीने सावरकरांनी पचविल्यामुळेच ५० वर्षांच्या काळ्या पाण्याच्या शिक्षेवर जेलरने डिवचले तेव्हा या नृसिंहाने गर्जून विचारले, “५० वर्षे? ५० वर्षे ब्रिटिश राज्य तरी टिकेल का?” आणि खरोखर त्यांचा दुर्दम्य आत्मविश्वास सार्थ ठरला. त्यांच्या शिक्षेआधीच ब्रिटिश साम्राज्य कोसळले.
अंदमान येथील एकूणच छळछावणी इतकी क्रूर आणि अमानवी यातनांनी वेढलेली होती की, एकूणच शारीरिक आणि मानसिक परीक्षा पाहणारी होती. नुसत्या कल्पनेनेही सहन होणार नाही, अशी थोडीथोडकी नाही, तर तब्बल १० वर्षे या महापुरुषाने येथे काढली. आणि एखाद्याचे मन किती कणखर असावे आणि राष्ट्रप्रेमाने आयुष्य किती भारीत असावे, तर जिथे रोजचा कोलू फिरवताना ‘नको त्या मरणयातना, यापेक्षा मरण बरे’ असे वाटत असताना, या नरपुुंगवनाने या कारागारात काव्यनिर्मिती केली. बंदीवान असलेल्या तरीही स्वतंत्र विनायकापुढे भिंत स्वत:हून चालत आणि बहुधा ज्ञानेश्वरांनंतर, या विनायकापुढेच भिंत स्वत:हून चालत आणि अंदमानभूमीत अजरामर काव्यशिल्पे जन्मास आली.
युगपुरुष कसे असतात, तर अत्यंत प्रतिकूल परिस्थिती असली, तरी त्यातूनही कुठला ना कुठला मार्ग काढून समाजप्रबोधनाचे कार्य करत राहणे ज्यांना जमते ते युगपुरुष! अंदमानात पोहोचल्यावर सावरकरांना जे जाणवले ते म्हणजे त्या काळ्या पाण्यावरही हिंदूंना बाटविण्याचे कार्य तेेथेे मुस्लीम गुंड या ना त्या प्रकारे करत होते आणि त्याहूनही आश्चर्य म्हणजे, या गोष्टीस विरोध तर सोडाच, प्रसंगी हिंदूच साहाय्य करत असत. या परिस्थितीमुळे सावरकरांना अतीव दु:ख झाले आणि त्यांनी राष्ट्रकार्यी ‘शुद्धी व्रत’ हाती घेतले.
अंदमानात प्रथमपासून धर्मांध आणि पापपरायण पठाण, बलुची इ. मुसलमानी बंदीवानातील वॉर्डन वगैरे अधिकारी नेमलेले असत आणि राजकीय बंदीवान जास्त हिंदू असल्याने या जागांवर मुसलमानांना नेमण्याचा कट्टर परिपाठ पाडलेला होता. हे लोक हिंदूंना सक्त शिक्षेच्या कामाला घालून, दंडाचा धाक घालून, खोटे-खरे खटले एकसारखे उभारून त्रास देत आणि ‘या ससेमिर्यातून सुटायचे तर मुसलमान व्हा,’ असे स्पष्टपणे सांगून आधीच जेरीस आलेल्या हिंदूंना धर्मभ्रष्ट होण्यास भाग पाडत. केवळ मुसलमानांच्या पंक्तीस बसवून धर्मांतर झाल्याचे घोषित करत आणि खेदाची गोष्ट म्हणजे इतर हिंदूंना याचे काहीच वाटत नसे. उलट एकदा बाटलेल्या हिंदूस परत इच्छा असली, तरी इतर हिंदूच धर्मबदलासाठी विरोध करीत आणि मुस्लिमांचे कार्य सिद्धीस जाई.
सावरकरांनी या गोष्टीस विरोध करण्यास सुरुवात केली. त्यांच्या प्रभावामुळे एकदा बाटलेल्या, पण परत यायची इच्छा असलेल्या कोवळ्या वयाच्या हिंदूंना थोडे साहाय्य मिळू लागले. त्यांच्या या कामाला जेव्हा सनातनींनी विरोध करणे, तसेच तेथील पर्यवेक्षकाने जेव्हा विचारले, “या बिघडलेल्या गुंड, दरोडेखोर लोकांना पुन्हा हिंदू करून काय उपयोग?” तेव्हा सावरकरांनी दिलेले उत्तर आजही तितकेच विचार करायला लावणारे आहे. त्यांचे उत्तर होते, “जे पतित त्यांच्यात तारणाची आवश्यक्ता विशेष आहे. जरी असला तरी हिंदू चोर हा मुसलमान चोराहून हिंदू संस्कृतीस कमी हानिकारक आहे. तो चोरी करील, पण म्हणून देऊळ फोडणार नाही, वेद जाळणार नाही, त्याने चोरी सोडली, तर उत्तमच, पण नाही, तर हिंदू न राहणे हे त्या पापाहून शतपट घोर असे राष्ट्रीय पाप आहे. कारण, हे चोर जरी मुसलमान झाले, तरी त्यांची पुढची पिढी चोरच होईल, असे थोडेच आहे. मात्र, ती कट्टर हिंदूद्वेषी मुसलमान निघेल, हे मात्र अवश्य.”
सावरकरांच्या या सडतोड आणि परखड विचारांमुळे हिंदूंच्या शुद्धीस अनुकूलता निर्माण झाली आणि हिंदूंना मुसलमान करणे तर सोडाच, पण बळाने बाटवलेल्या हिंदूंना शुद्ध करून घेणे आरंभले. यावेळी सावरकरांनी अंदमानातील बंदीवानांना आणि तेथील सर्वांना ‘हिंदू’ या शब्दाचा खरा अर्थ सांगायला सुरुवात केली. हिंदू धर्म हे नाव कोणत्या विशिष्ट धर्माचे वा पंथाचे नाव नसून, या अनेक धर्म व पंथांची भारतभूमी ही पितृभूमी नि पुण्यभूमी आहे. ते सारे हिंदू सावरकरांनी ‘हिंदू’ या शब्दाची ही ऐतिहासिक आणि सार्वत्रिक व्याख्या आपल्या मनाशी ठरवली होती.
सावरकरांचे शुद्धीकरणाचे हे विचार हिंदू समाजासाठी संजिवक आणि तरणोपाय ठरणारे आहेत. काळाच्या कसोटीवर वारंवार घासून ते सिद्धही झालेले आहेत. सावरकरांनी हे शुद्धीकार्य पुढे रत्नागिरी आणि येरवडा कारागृहातही असेच सुरू ठेवले आणि ‘विटाळ’ नावाच्या अन्न आणि जलाने विटाळ होऊन धर्म भ्रष्ट होणे यासारख्या वेडगळ समजुती मोडीस काढल्या. ज्या सावरकरांना स्मृतीच्या खोल गर्तेत ढकलण्यासाठी ब्रिटिशांनी काळ्या पाण्याच्या शिक्षेसाठी अंदमानला पाठवले, तेच अंदमान सावरकरांनी स्वकर्तृत्वाच्या प्रकाशामुळे जगाच्या नजरेत आणून अनेकांसाठी ‘अंदमानचे प्रकाशमान’ झाले.
- केतन जोगळेकर