विविध पवित्र नद्यांच्या पवित्र तीर्थाचा जलकुंभ भरताना प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, थोर शास्त्रज्ञ पद्मभूषण डॉ. विजय भटकर, देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासने, ज्येष्ठ कवयित्री आणि चरित्र लेखिका उर्मिलाताई कराड
’अंदमान हे तीर्थक्षेत्र आहे’ ही संकल्पना मांडून, अंदमानातील राजबंदी क्रांतिकारकांच्या असंख्य छायाचित्रांसह त्यांची माहिती देणारे ‘दिंडी काळपाण्याची’ हे पुस्तक चंद्रकांत शहासने यांनी लिहिले. ‘कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट’ परिवार गेल्या ४
० वर्षांपासून ‘भारतीय क्रांतिकारकांनी चेतविलेल्या बलिदानाच्या ज्योतीचा इतिहास’ विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य करीत आहे. या उपक्रमाअंतर्गत अंदमान येथे २०१० साली ‘पहिले स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन’, ‘कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट’च्या पुढाकाराने संपन्न झाले.
महाराष्ट्रात राष्ट्रभक्तीचे कार्य करणार्या ‘शिवसंग्राम प्रतिष्ठान’, ‘सावरकरप्रेमी मंडख’ अशा संस्थांनी यासाठी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. अंदमानच्या अर्थव्यवस्थेला गती देणारी ही घटना होती. यानंतर पुण्याच्या ‘शिवसंग्राम प्रतिष्ठान’ने ’अंदमान दर्शन’द्वारे एक लाख लोकांना अंदमानला नेण्याचा संकल्प जाहीर केला आणि अंदमानच्या पर्यटन क्षेत्रात स्वतःचे स्थान निर्माण केले.
चंद्रकांत शहासने व त्यांचा परिवार हा ‘कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट’च्या माध्यमातून अंदमानमध्ये विशेष कार्यक्रम आयोजन करण्यात नेहमीच पुढाकार घेत असतो. यातूनच २०११ साली ‘स्वातंत्र्यवीर सावरकर पदस्पर्श-शताब्दी सोहळा’ साजरा करण्यात आला. पितरांच्या आत्म्यास शांती मिळावी, यासाठी त्यांच्या नावे पाणी दिले जाते. हीच संकल्पना मनात घेऊन अंदमानात काळ्या पाण्याची शिक्षा भोगत असताना मृत्युमुखी पडलेल्या असंख्य ज्ञात-अज्ञात क्रांतिवीरांच्या आत्म्यास शांती लाभावी, यासाठी २०१८ साली पितृपंधरवड्यात, देशोदेशीच्या असंख्य नद्यांचे पाणी एकत्र करून ‘पहिली जलाभिषेक परिषद’ तेजाली शहासने यांच्या अध्यक्षतेखाली व उर्मिलाताई कराड यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली. या सर्व उपक्रमांबाबत चंद्रकांत शहासने यांना विचारले असता ते म्हणाले,
मातृभूमी ही शूरविरांची। अनेक बलिदानांची।
सेवा ही तर युगायुगांची। दीक्षा काळ्यापाण्याची।
१६० वर्षांपूर्वी अंदमानच्या भूमीवर भारतातील क्रांतिकारकांचे पहिले पाऊल पडले. १८५७च्या स्वातंत्र्यसमरातील क्रांतिवीरांना शिक्षा भोगण्यासाठी, नव्हे तर त्यांचा अनन्वित छळ करण्यासाठी इंग्रजांनी येथे आणले. ‘वॉकर’ नावाचा क्रूर अधिकारी राजबंद्यांना छळत असे. यासोबतच जंगली हल्ले, जखमा, मलेरियाचा त्रास, अशुद्ध पाणी, मानसिक स्वास्थ्य नाही, प्रेम नाही, अपुरे निकृष्ट अन्न, अंगावर फाटके अपुरे कपडे, काटेरी जंगल, झोपण्यास दलदलीची जागा, बारमाही पाऊस, कोणतीही सोय नाही, त्यामुळे अनेक प्रकारचे रोग आणि ते सोसणे एवढाच मार्ग. वैद्यकीय सुविधा हा शब्द उच्चारणेदेखील गुन्हा. हातापायात बेड्या, भुकेने व्याकूळ होणे आणि कारणाशिवाय फटके खाणे. हे सर्व अत्याचार देशप्रेमापोटी या राजबंद्यांनी सहन केले. हे स्वातंत्र्याच्या राजमहालाच्या पायाचे असे असंख्य चिरे, अनामिक हुतात्मे सन्मानास मुकले, बक्षिसे, पेन्शन याशिवाय मेले, यांच्यासाठी सांत्वनाचे शब्द कोणीच उच्चारले नाहीत. म्हणून आपण एक गोष्ट सहज करू शकतो ती म्हणजे या देशभक्तांच्या
स्मृतींचे जतन करण्याची धडपड!
समुद्र आणि वृक्ष यांनी सजलेल्या या अंदमान बेटावर देशभक्तांकडून मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करून घेण्यात आली. तेथे निवासस्थाने व सेल्यूलर कारागृह उभारण्यात आले. मुद्दाम नमूद करायचे तर जंगलाला हजारो वर्षे मानवी स्पर्श नव्हता. उंच, घनदाट झाडे, वेलींनी गच्च आच्छादिलेली होती. यांत किती प्रकारचे जीवजंतू असतील, याची कल्पनाही करता येणार नाही. अशा हजारो वर्षे जुन्या वृक्षावर घाव घातला की, शांतता भंग पावत असे नि वृक्षावर नि जंगलात वास्तव्य करणारे असंख्य हिंस्त्र पशुपक्षी, सर्प, विंचू, जळवा, मुंग्या, मधमाशा या देशभक्तांच्या रक्ताचा घास घेताना कुठेही कमतरता ठेवत नसत. संपूर्ण दलदल, खारी हवा आणि खारा समुद्र! कुठे जाणार हे देशभक्त? अनेकांना तडफडत प्राण सोडावे लागले. कोणी त्यांच्या तोंडात शेवटचे पाणी सोडले असेल? कोणी तुळशीपत्र-गंगाजल ठेवले असेल? कोणी अग्निसंस्कार केले असतील? छे छे! अशक्य! सारे सारे याच अंदमानच्या समुद्राच्या विशालतेत सामावले गेले. या मातीत आजही ती स्पंदने आहेत. तोच ‘वंदे मातरम्! भारतमाता की
जय!’चा घोष घुमताना दिसतोय!
या देशभक्तांच्या बलिदानातूनच आज आपण स्वतंत्र भारतात जगतो आहोत. अंदमानातील पहिली जलाभिषेक परिषद या देशभक्तांच्या ऋणातून मुक्त होण्याचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आपल्या पवित्र गंगा, ब्रह्मपुत्रा, कावेरी, झेलम, बियासपासून महाराष्ट्रातील गोदावरी, मुळा-मुठा, कोयनासह श्रीक्षेत्र आळंदी, देहू, पंढरपूर, गाणगापूर, पैठण, सज्जनगड, कोल्हापूर, तुळजापूर, सासवड, शिर्डी, नांदेड, त्र्यंबकेश्वर, अलाहाबाद, पिंपळनेर, अरणभेंडी, नरसोबाचीवाडी, शेगाव, अंबाजोगाई, तेरढोकी, कन्याकुमारी, रामेश्वरम, उडपी, कालडी, तिरुपती, जगन्नाथपुरी, भुवनेश्वर, बोधगया, सारनाथ, वैशाली, मंत्रालयम, मथुरा, अयोध्या, बद्रीनाथ, केदारनाथ, गंगोत्री, जमुनोत्री, अमृतसर, वैष्णोदेवी, हरिद्वार, ऋषिकेश, बुधवाडा, अजमेर, देऊळगाव, देवगिरी, वैजापूर, अक्कलकोट, तुर्की, लंडन, बाथ, मक्का-मदिना, जेरुसलेम, असिसी, जपान तसेच गावोगावच्या पर्यटकांनी असंख्य नद्यांचे पवित्र जल घेऊन, या देशभक्तांच्या नावे सेल्युलर तुरूंगासमोरील, इतिहासाचा मूक साक्षीदार असलेल्या अजरामर पिंपळ वृक्षाला जलाभिषेक करण्यात आला.
श्री क्षेत्र आळंदी येथे उभारण्यात आलेल्या विश्वधर्मी भागवत धर्म विश्वशांती पताका आणि सुवर्णजडित गरुड स्तंभासाठी जे पवित्र जल विश्वशांती केंद्राने आणले आले होते, ते प्रा. डॉ. विश्वनाथ कराड, ज्येष्ठ शास्त्रज्ञ पद्मभूषण विजय भटकर, उर्मिलाताई कराड यांच्या शुभहस्ते ‘कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्ट’कडे सुपूर्त करण्यात आले. यामुळे या सोहळ्यास अधिकच गांभीर्य प्राप्त झाले.
असंख्य क्रांतिकारकांच्या वेदना ज्या पिंपळाच्या पानांनी ऐकलेल्या आहेत, ज्या पिंपळवृक्षाच्या छायेखाली असंख्य क्रांतिकार विसावत असत, आजही तो पिंपळवृक्ष वाहत्या वार्याबरोबर राष्ट्रभक्तीची गाणी गाताना आपण अनुभवतो. याच पवित्र पिंपळ वृक्षाला अत्यंत भारावलेल्या साश्रुनयनांनी मंत्रघोषात असंख्य पवित्र नद्यांच्या जलाने अभिषेक करण्यात आला. सारा आसमंत ‘स्वातंत्र्यवीर सावरकर आणि क्रांतिकारक अमर रहे’च्या घोषणांनी दुमदुमून गेला. या क्रांतिकारकांच्या नावे जलाभिषेक करताना मंत्रोच्चार करण्यात आले. यावेळी देशभक्तकोशकार चंद्रकांत शहासनेरचित गीतांचे गायन सर्वांनी एकसूरात केले.
देशभक्तीच्या गळ्यांत फाशी,
पाठीवरती मार...
वीर स्मारके उदास पडती,
सदा तिथे अंधार...
देशासाठी लढत लढता,
पडले धारातीर्थी...
चला करू आरती त्यांची,
चला करू आरती...