बाबाराव सावरकर आणि अंदमान पर्व

    27-May-2021
Total Views |

XBFGCJGHM_1  H
 
सेल्युलर जेलमधला अमानुष छळ सोसणे असह्य होऊन इंदूभूषण रॉय या तरुण क्रांतिकारकाने आत्महत्या केली, तर उल्हासकर दत्त या अतिशय बुद्धिमान तरूण क्रांतिकारकाचे मानसिक संतुलन बिघडले. अशा अनेक घटनांनी बाबारावांचे मन विषण्ण होत असे. या बंदीवानांची आठवण येऊन ते भावुक होत असत. त्यांच्याही मनात आत्महत्येचे विचार आले. पण, पुन्हा मनावरची मरगळ झटकून आपला हा शिणलेला देहच एक दिवस देशभक्तीची मशाल पेटवणार आहे, असा विचार करून ते आपले मनोबल वाढवत असत.
 
१९१० रोजी बाबाराव सावरकरांना ’महाराजा’ बोटीतून अंदमानला आणण्यात आले. त्यात सेल्युलर जेल म्हणजे साक्षात मृत्यूच्या दाढेत जाण्यासारखेच होते. तेथील अतिशय क्रूर असलेला आयरीश जेलर बारी हा कैद्यांना दुसरा यमच वाटायचा. बाबारावांना एका जन्मठेपेची म्हणजेच २५ वर्षांची काळ्या पाण्याची शिक्षा झाली होती. बाबारावांना प्रारंभी एकलकोंड्या कोठडीत ठेवण्यात आले. राजकीय बंदीवानासाठी असलेल्या तुरुंगाच्या इमारतीतच ही कोठडी होती. या राजबंद्यांना सक्तमजुरीचे काम करावे लागे.
 
काही दिवसांतच बाबारावांना नारळाच्या सोडणांचा छिलका कुटण्याचे आणि त्यापासून दोर तयार करण्याचे काम देण्यात आले. ते करता करता त्यांचे हात सोलून निघायचे आणि रक्तबंबाळ व्हायचे. तासन्तास एकाच जागी बसून काम केल्याने त्यांना पाठदुखी सुरू झाली. पुढे हा त्रास बळावला. पण, तरीही बाबाराव आपले काम पूर्ण करण्याचा कसोशीने प्रयत्न करत. त्यामुळे इतर राजबंद्यांच्या मनात त्यांच्याविषयी आदर आणि सहानुभूती निर्माण होऊन ते जमेल तशी गुप्तपणे मदत करू लागले. पण, बारीला हे कळल्यावर पुन्हा संकट नको, म्हणून बाबाराव ही मदत नम्रपणे नाकारायचे.
 
ही शिक्षा पुढील काही काळ चालली. पण, ही तर फक्त सुरुवात होती! कोलकात्याहून आलेल्या पोलीस अधिकार्‍याने सर्व राजकीय बंदीवानांना एकत्र येऊ न देता अजून क्रूर वागणूक देण्याचे आदेश बारीला दिले. त्याने राजबंद्यांना वेगवेगळ्या खोलीत बंद केले. त्यांना असह्य शारीरिक व मानसिक छळ सोसावा लागे. त्यांना तेलाच्या घाण्याला जुंपण्यात यायचे. त्याला ’कोलू’ म्हणत असत. त्या घाण्याच्या मध्यभागी नारळाचे तुकडे ठेवलेले असत. सकाळी लवकर उठवून राजबंद्यांना अतिशय क्रूरपणे बैलांप्रमाणे या कोलूला जुंपले जायचे.
कोलूचा दांडा गोल फिरवून त्या नारळाचे तेल काढावे लागायचे. हा कोलू फिरवताना इतकी प्रचंड शक्ती लागायची की, त्या कठोर श्रमांनी अट्टलातले अट्टल आणि निर्ढावलेले कैदीही पिळून निघाल्यासारखे पार थकून जायचे. बाबारावांनी पूर्ण ताकदीनिशी कोलू फिरवण्याचा प्रयत्न करूनही कोलू थोडासाच सरकला. पूर्णपणे थकून गेलेल्या बाबारावांनी अक्षरशः त्या कोलूला लटकून कशीबशी एक फेरी पूर्ण केली. सकाळी १० वाजता या कैद्यांना तिथेच जेवण दिले जायचे. जेवायला ते खाली बसू लागताच कारागृहाचा रक्षक ओरडून, फटके देऊन त्यांना उभेच राहायला सांगायचा. उखळीत खोबरे पडून या घाण्याची अत्यंत जड झालेली दांडी क्षणाचीही उसंत न घेता,राजबंद्यांना तासन्तास अखंड फिरवत राहावी लागे.
कारण, दिवसाकाठी तेलाचा ठरावीक हप्ता पूर्ण करुन द्यायचा असे. संध्याकाळपर्यंत हा हप्ता पूर्ण न केल्यास मारहाण आणि भयंकर शिक्षा होई. बाबारावांनी आपले ताट तसेच बाजूला ठेवून पुन्हा स्वतःला कोलूला जुंपून घेतले. ते करता करताच कसेबसे चार घास खाल्ले. त्यांचे पूर्ण अंग ठणकत होते. घसा कोरडा पडला होता. त्यांना देण्यात आलेल्या लहानशा मडक्यातले पाणी संपले होते. पुन्हा पाणी मागताच रक्षक त्यांच्यावर खेकसला. या कैद्यांना फक्त दोन लहान मडके भरून तितकेच पाणी दिले जायचे. त्याच्यावर एक थेंबही मिळायचा नाही. बाबाराव भुकेले, तहानलेले आणि अतिशय थकले होते. त्यांच्या पायात चमका येत होत्या, छातीत कळा येऊन डोके गरगरायला लागले होते.

XBFGCJGHM_1  H
पण, क्षणाचीही उसंत न देता निर्दयपणे त्यांच्याकडून संध्याकाळी ५ वाजेपर्यंत कोलू फिरवून घेण्यात आला. रोज बंदीवानांकडून तब्बल ३० पौंड तेल काढून घेतले जाई. ते पूर्ण करणे बाबारावांना शक्य झाले नाही. काम पूर्ण न केल्यास वेताच्या छडीचे फटके देण्याची धमकी बारीने दिली. बाबाराव आपल्या कोठडीत गेले आणि अक्षरशः अर्धमेले होऊन जमिनीवरच्या कपड्याच्या तुकड्यावर पहुडले. बारी तुरुंगाचे नियम धाब्यावर बसवत कैद्यांना रात्री ९ वाजेपर्यंत कोलूला जुंपून तेलाचा हप्ता पूर्ण करून घ्यायचा. असा क्रूर धिंगाणा त्याने चालवला होता.
ही सक्तमजुरी रोजचीच झाली होती. आधीच आजारी असलेल्या बाबारावांच्या यातनांमध्ये भर पडून त्यांना अर्धशिशीचा त्रास सुरू झाला. त्या वेदना असह्य होऊन ते कोठडीच्या भिंतींवर डोके आपटू लागत. कपाळ रक्तबंबाळ होऊन जाई. त्यांनी डोकेदुखीची तक्रार करूनही त्याकडे कारागृहाचे अधिकारी दुर्लक्ष करत. क्वचित कधी तपासणीचा प्रसंग आलाच तर तेथील वैद्य ’हे आजारीपणाचे ढोंग करत आहेत’ असे जाहीर करून मोकळे व्हायचे आणि बारीला तर कसलीच दया माहीत नव्हती. तीव्र अर्धशिशीचा त्रास होत असूनही बाबारावांकडून तो सक्तीने कोलू फिरवून घ्यायचा. 
कोलूचे काम दोन महिन्यांसाठी आणि पुढचा एक महिना काथ्या कुटण्याचे काम हा नियम होता. कोलू ओढण्याचे ते भयंकर काम संपून कधी काथ्या कुटण्याचे काम मिळतेय, असे कैद्यांना होई. पण, बाबारावांना ही सवलतसुद्धा दिली गेली नाही. कैद्यांना देण्यात येणारे अन्नही अतिशय निकृष्ट दर्जाचे, अर्धे जळलेले, अर्धे कच्चे, कृमी-कीटक आढळणारे असे होते. संसर्गजन्य रोगांनी ग्रासलेले आचारी हा स्वयंपाक करत. त्यांचा घाम अन्नात मिसळत असे. कांजीमध्ये केरोसिन मिसळलेले असे. पाणीही अतिशय अशुद्ध आणि दुर्गंधीयुक्त होते.

XBFGCJGHM_1  H
 
 
अशा अन्नाच्या सेवनामुळे कोलूचे एक सत्र पूर्ण करतानाच बाबारावांना तीव्र अतिसाराचा त्रास व्हायला लागला. हा आजार बळावून मलविसर्जनावेळी श्लेष्मा आणि रक्त वाहू लागले. हे सारे कमी की काय, त्यांना नैसर्गिक-विधीसाठी शौचकुपाचा वापर करण्यास बंदी घातली गेली. एकदा जेवणाचे ताट आत सरकवले की पुढचे कितीतरी तास त्यांच्या कोठडीचे दार उघडले जात नसे. पहिल्याच घासाला पोटात प्रचंड कळा यायला सुरुवात व्हायची. बाबाराव मलावरोध करण्याचा खूप प्रयत्न करायचे. पण, कधीकधी ते अशक्य होऊन त्यांना तिथेच मलविसर्जन करावे लागे. लघवीसाठी कोठडीत एक अतिशय लहानसे मडके ठेवलेले असे. ते भरले की, बाबारावांना जबरदस्तीने कोठडीच्या भिंतींवर मूत्रविसर्जन करण्यास सांगितले जाई. त्याच दुर्गंधीत पुढे तासन्तास काम करावे लागे. रात्रीही न संपणार्‍या वाटू लागत.
रात्री बंद झालेली कोठडी सकाळीच उघडत असे. पोटातल्या कळा आणि मलावरोध रात्री असह्य होऊन पोट फुटेल की काय, अशी बाबारावांची भयंकर अवस्था व्हायची. अशावेळी त्यांचे सुसंस्कृत आणि पवित्र मन शरमेने संकोचून जायचे. पण, ते काहीच करू शकत नव्हते. सेल्युलर जेलमध्ये बंदिवानांना पशूंपेक्षाही हीन वागणूक दिली जायची. जखमांवर मीठ चोळल्याप्रमाणे त्यांचा अपमान करण्यासाठी बाबारावांना बारीसमोर उभे करून कोठडीच्या भिंती खराब केल्याबद्दल जाब विचारला जायचा. मग जमादार आपल्या दंडुक्याने त्यांना मारहाण करायचा. कधीकधी तर बारी त्यांना संपूर्ण दिवसभर कोलू ओढण्याची शिक्षा द्यायचा. काही काळाने या सार्‍या दुर्गंधीची बाबारावांनी सवय करून घेतली. 
खड्या-बेडीची शिक्षाही त्यांना नेहमी भोगावी लागे. हातातल्या बेड्या भिंतीवरच्या खुंटीत अडकवून त्याच अवस्थेत तिष्ठत उभे राहावे लागायचे. चार-पाच तास चालणार्‍या या शिक्षेच्या वेळी बाबारावांच्या पोटात प्रचंड कळा येऊन तशा उभ्या अवस्थेतच त्यांना रक्तमय अतिसार होऊ लागे. आसपास माशा जमा होऊन ती दुर्गंधी नकोशी व्हायची. पण, शिक्षेतून उसंत मिळत नसे.
राजबंद्यांना मिळणार्‍या क्रूर वागणूकीविरूद्ध पुकारलेल्या संपांमध्ये बाबारावांनी सक्रिय सहभाग घेतला. अशा ’बंडखोर’ कैद्यांना वेगळे करून उभ्या दंडबेडीची शिक्षा आणि १२ दिवस फक्त कांजी खायला दिली जायची. अपुर्‍या अन्नाने शक्ती क्षीण होऊनही जर ते ठाम राहिले तर त्यांचे खच्चीकरण करण्यासाठी त्यांच्या घशात जबरदस्तीने कोयनेलचे घोटच्या घोट ओतत असत किंवा कडक रेचक पाजत असत. या औषधांच्या सेवनाने राजबंद्यांचे प्रचंड हाल झाले. पण, तरीही ते अढळ राहिले. शेवटी बारीने नमते घेऊन कोलूऐवजी हलकी कामे देऊन राजबंद्यांनाही कारागृहाबाहेर जाऊन काम करण्याची परवानगी दिली. अर्थात, ही परवानगी बाबारावांना मात्र मिळाली नाही.
एकदा एका इमारतीच्या पायरीवर दिसलेल्या सापाला मारण्यासाठी बाबाराव धावले. एकाच्या हातातील काठीने त्या सापाला फटकारले. इतर कैद्यांनी मिळून त्या सापाला मारले. हे बारीला कळताच बाकीच्या कैद्यांचे प्राण वाचवल्याबद्दल बाबारावांचे अभिनंदन करण्याऐवजी नियम मोडल्याबद्दल त्याने बाबारावांना सात दिवसांच्या खड्या बेडीची शिक्षा दिली!
सेल्युलर जेलमधला अमानुष छळ सोसणे असह्य होऊन इंदूभूषण रॉय या तरुण क्रांतिकारकाने आत्महत्या केली, तर उल्हासकर दत्त या अतिशय बुद्धिमान तरूण क्रांतिकारकाचे मानसिक संतुलन बिघडले. अशा अनेक घटनांनी बाबारावांचे मन विषण्ण होत असे. या बंदीवानांची आठवण येऊन ते भावुक होत असत. त्यांच्याही मनात आत्महत्येचे विचार आले. पण, पुन्हा मनावरची मरगळ झटकून आपला हा शिणलेला देहच एक दिवस देशभक्तीची मशाल पेटवणार आहे, असा विचार करून ते आपले मनोबल वाढवत असत.
बाबाराव हे धार्मिक वृत्तीचे आणि तत्त्वचिंतनात रुची असणारे होते. त्यामुळे समविचारी कैद्यांची ते भूतकाळ, भविष्यकाळ, ईश्वरी अस्तित्व, अद्वैताचा सिद्धांत, योगसाधना, ओंकाराची उपासना यांवर आपल्या कोठडीतूनच चर्चा करत असत. शारीरिक वेदना विसरून बाबारावांचे मन स्वामी रामतीर्थ आणि विवेकानंदांची शिकवण आठवण्यात रमून जाई.
कैद्यांना देण्यात येणार्‍या अन्नाच्या वाटपाच्या वेळी धर्मांतरासारखे प्रकार घडून आणले जायचे. त्याविरुद्ध तात्यारावांनी पुकारलेल्या बंडामध्ये बाबारावही सहभागी झाले. आता धर्मांतर घडवणे अवघड झाल्यामुळे तेथील काही मुसलमान कैदी आणि अधिकारी संतप्त झाले. एके दिवशी बाबाराव स्नान करून परतत असताना एका मुसलमान गुंडाने त्यांच्या डोक्यात मडक्याचा जोरदार प्रहार केला. त्यांच्या डोक्यातून रक्त वाहून ते जमिनीवर कोसळले. या कृत्याबद्दल त्या गुंडाला बारीची शाबासकी मिळाली! तात्यारावांना विषप्रयोग करून मारण्याचा कट ज्यात लिहिलेला होता, तो कागद बाबारावांच्या हाती लागला. अशा परिस्थितीत न घाबरता मोठ्या धैर्याने आणि चातुर्याने बाबारावांनी तात्यारावांवरचे हे संकट दूर केले.
१९१५ पर्यंत बाबाराव कष्टमय कामे करत असत. पण, त्यानंतर त्यांची प्रकृती अतिशय ढासळली. अर्धशिशी आणि अतिसार या जुन्या आजारांनी पुन्हा डोके वर काढले. अतिसारावर त्यांना कधीही योग्य उपचार मिळाले नाहीत. निकृष्ट अन्नामुळे पचनसंस्था बिघडून काहीच पचेनासे झाले, अगदी दूधही! पूर्वी सुदृढ असणारे बाबाराव आता अगदीच कृश होऊन त्यांचे वजन १९१८ मध्ये १०६ पौंडापर्यंत घसरले होते. पित्ताशयात होणार्‍या वेदना इतक्या तीव्र होत्या की त्यांना अक्षरशः जमिनीला घासत कसेबसे तुरुंगाच्या रूग्णालयात जावे लागायचे. पुन्हा तिथले वैद्य त्यांच्यावर आजारीपणाचे ढोंग करत असल्याचा आरोप करायचे.
अपमानित होऊन ते तसेच आपल्या कोठडीत परत यायचे. खोकल्याची उबळ इतकी प्रचंड की खोकून खोकून प्राण कंठाशी यायचे. १९१९च्यादरम्यान झालेल्या तपासणीत बाबारावांना क्षयरोगाचे निदान झाले. पण, अतिसार,१००-१०२ सेल्सियस ताप, कफाचा त्रास होऊनही बाबारावांना सक्तमजुरीची शिक्षा भोगावी लागली. रूग्णालयात उपचार मिळाले नाहीत. तात्यारावांशी बोलताना बाबारावांना खूप खोकला यायचा. अर्धा-अर्धा तास दम लागून श्वास घ्यायला त्रास होई. आपल्या थोरल्या बंधूंची ही अवस्था बघून हतबल होण्याशिवाय आणि त्यांची या तुरुंगातून जीवंतपणी मुक्तता होईल ना, याविषयी चिंता करण्यापलीकडे तात्याराव काहीही करू शकत नव्हते.
अखेर सर्व कैद्यांना भावपूर्ण निरोप देऊन सावरकर बंधू अंदमानातून २ मे, १९२१ या दिवशी स्वदेशी यायला निघाले. प्रवासाच्या चौथ्या टप्प्यात त्यांना भारतीय किनार्‍याचे दर्शन झाले. तात्याराव उद्गारले, “बाबा, तो पाहा-भारत! ते पाहा त्याचे नीलसिंधूजलधौत चरणतल!” देशभक्तीने थरारलेल्या त्या दोघांनी मातृभूमीला वंदन केले. त्यांच्या तोंडून शब्द बाहेर पडले, “स्वातंत्र्यलक्ष्मी की जय! वंदे मातरम्!!” इतके अतोनात छळ सोसूनही त्यांचे देशप्रेम मात्र तसेच होते-अविचल!
 
 
- मधुरा घोलप
९६६५९८६२८९ /९४०५१६१८५१