ठाणे : "तीन विविध घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशीचा ससेमिरा मागे लागल्याने गेले दोन महिने शिवसेना आमदार प्रताप सरनाईक गायब आहेत. काय झाले? कोणी किडनॅप केले? याची भिती मतदारांना वाटत आहे. तेव्हा, त्यांना शोधण्यासाठी कार्यवाही करावी," असा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. बुधवारी भाजप नेते किरिट सोमय्या, ठाणे भाजप जिल्हाध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर आणि भाजप गटनेते मनोहर डुंबरे आदीच्या शिष्टमंडळाने नुतन पोलीस आयुक्त जयजीत सिंह यांची भेट घेऊन साकडे घातले.
ठाण्यातील ओवळा-माजिवड्याचे शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्यावर ईडीने (अंमलबजावणी संचलनालय ) छापा टाकल्यानंतर त्यांच्यावर चौकशीची टांगती तलवार कायम आहे. त्यामुळे,गेल्या दोन महिन्यांपासुन आमदार सरनाईक गायब असल्याच्या चर्चाना पेव फुटले आहे. नुकतेच ओवळा-माजिवडा मतदार संघातील मतदारांनी "कोरोना न होताही आमदार क्वारंटाईन" अशा आशयाचे फलक जागोजागी लावल्याने आमदार सरनाईक चर्चेत आले. या पार्श्वभूमीवर बुधवारी किरिट सोमय्या यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्तांची भेट घेतली. तसेच, आमदार सरनाईक हरवले आहेत. त्यांचे काय झाले? कोणी किडनॅप केले? याची भिती मतदारांना वाटत आहे. तेव्हा, आमदार सरनाईक यांचा शोध घेण्यासाठी कार्यवाही करावी, अशी अधिकृत तक्रार पोलीस आयुक्तांकडे केल्याची माहिती सोमय्या यांनी दिली.
गुन्हेगारांना लपवण्याचे काम मुख्यमंत्री करतात : किरिट सोमय्या
घोटाळ्याप्रकरणी आमदार प्रताप सरनाईक यांची ईडी चौकशी सुरु आहे. तसेच, ठाण्यातील अनधिकृत इमारत प्रकरणी ११ कोटींचा दंड ठोठावण्यात आला आहे. याबाबत ठाणे मनपा आयुक्तांनी जप्तीचे आदेश देणे गरजेचे होते. परंतु,राजकिय दबावामुळे कारवाई केली जात नाही, असा आरोप किरिट सोमय्या यानी केला. एकप्रकारे गुन्हेगारांना लपवण्याचे काम मुख्यमंत्री उद्धव ठाकरे करीत आहेत, असा घणाघातही सोमय्या यांनी केला.