ज्ञानरूपी ‘सुधाकर’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    26-May-2021   
Total Views |

Sudhakar Fadke_1 &nb
 
 
 
‘गतेऽपि वयसि ग्राह्या विद्या सर्वात्मना बुधैः’ अर्थात...वय झाले तरी, माणसाने मन लावून ज्ञान मिळवावे. याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे ठाण्यातील डॉ. सुधाकर विष्णू फडके. त्यांच्या कारकिर्दीविषयी...
 
 
‘रिटायर्ड बट नॉट टायर्ड...’ हे वैशिष्ट्य उतारवयात ७४व्या वर्षीही सिद्ध करणारे ठाण्यातील कळवा येथील डॉ. सुधाकर फडके यांना ‘ज्ञानरूपी सुधाकर’ (समुद्र) म्हटल्यास वावगे ठरणार नाही. ‘लॉकडाऊन’काळातही त्यांनी पत्रकारितेचे प्रथम वर्ष पूर्ण केले आहे. नोकरी, संसार, कुटुंब आणि लेखनाचा हव्यास याची सुयोग्य सांगड घालून विविध शैक्षणिक क्षितिजे पादाक्रांत करणारे डॉ. फडके यांचा आठवणींचा संग्रहदेखील अफलातून आहे.
 
 
 
दि. १२ ऑगस्ट, १९४७ साली रायगड जिल्ह्यातील नागोठणे गावात जन्मलेले फडके यांचे नववीपर्यंतचे शिक्षण गावीच झाले. लहान वयात वडिलांचे छत्र हरपल्याने शिक्षणासाठी ठाण्यात आले. १९६१ साली दहावीत प्रवेश घेत १९६३ साली मॅट्रिक झाले. लागलीच त्यांनी नोकरी पत्करली. जेमतेम पाच-सहा वर्षे उलटली आणि त्यांना नाट्यक्षेत्राची असलेली प्रचंड ओढ त्यांना शांत बसू देईना. त्यांनी ‘मुंबई मराठी ग्रंथ कला मंडळ’ येथे नाव नोंदवले. तिथे त्या काळचे नावाजलेले रंगकर्मी मार्गदर्शन करण्यासाठी येत. त्यांच्याकडून डॉ. फडके यांनी नेपथ्य, रंगभूषा, प्रकाशयोजना आदींचे प्रशिक्षण घेत अभिनयाचेही धडे गिरवले. त्यातून नाट्यक्षेत्राविषयी असलेली रुची अधिक जागृत झाली. मजल-दरमजल करत १९७० ते ७२च्या कालावधीत डॉ. फडके यांनी नाट्य समीक्षण करण्यास प्रारंभ केला. त्यामुळे विविध विषय हाताळणारी नाटके पाहण्याची संधी त्यांना मिळाल्याने अनेक रंगकर्मींच्या मुलाखतीही त्यांनी एका मासिकासाठी घेतल्या. ७०हून अधिक रंगकर्मी व कलाकारांचे भावविश्व शब्दबद्ध केल्याचे डॉ. फडके सांगतात. १५ वर्षे नाट्य समीक्षण करीत असतानाच १९८० साली ‘बीए’ आणि १९८३ला ‘एमए’ची पदवी मिळवली. १९८५ला त्यांनी ’पीएचडी’ला प्रवेश घेतला. पण, दोन वर्षांतच ‘पीएचडी’चा नाद सोडला. नोकरी करताना ‘गुणवंत कामगार’ असा गौरव प्राप्त केल्यानंतर त्यांच्यातील लेखनाची ऊर्मी त्यांना शांत बसू देत नव्हती. १९८९ साली ‘इंद्रधनु’ या दिवाळी अंकाचे उपसंपादकपद भूषवताना ‘ठाणे जिल्हा पत्रकार संघा’चेही ते सदस्य बनले. पत्रकारितेला पूरक म्हणून ‘एसएनडीटी’मधून त्यांनी पत्रकारितेचा कोर्स पूर्ण केला. १९९९ साली मोडी लिपीचाही कोर्स पूर्ण केल्यानंतर २००१ साली खासगी नोकरीतून स्वेच्छा निवृत्ती पत्करली. तरीही शिकण्याची हौस असल्याने वर्षभरातच ‘बी.लिब.’चा कोर्स पूर्ण करून २००४ मध्ये पुन्हा एकदा मुंबई विद्यापीठात ‘पीएचडी’साठी प्रवेश घेतला. नाट्यक्षेत्राच्या असलेल्या आवडीमुळे डॉ. सुधाकर फडके यांनी मराठीतील समस्याप्रधान नाटकांचा चिकित्सक अभ्यास (१९६०-२०००) हा विषय घेऊन स्वहस्ताक्षरात ६०० पानांचा प्रबंध लिहून काढला अन् अखेर तब्बल ११ वर्षांनी २०१५ला त्यांची या विषयातील ‘पीएचडी’ पूर्ण झाली. तेव्हा, डॉ. फडके यांचं वय होतं ६९ वर्षे. वयाच्या ७३व्या वर्षी कोरोनाच्या ‘लॉकडाऊन’काळात पत्रकारितेच्या तीन वर्षाच्या डिग्री कोर्ससाठी अ‍ॅडमिशन घेऊन प्रथमवर्ष यशस्वीपणे पूर्ण केले. मात्र, ‘ऑनलाईन’ शिक्षणपद्धतीत रुची नसल्यामुळे त्यांचा शैक्षणिक वारू सध्या अडल्याचे ते आवर्जून नमूद करतात.
 
 
 
छायाचित्रणाचे प्रशिक्षण घेतलेले असल्याने नाटक, सिनेमा, फोटोग्राफीमध्ये प्रावीण्य मिळवले. याच कालावधीत नाट्य समीक्षण करताना त्यांनी नाट्यक्षेत्राशी निगडित अनेक मौल्यवान आठवणी साठवण्यास प्रारंभ केला. मात्र, हा संग्रह करण्याचे त्यांनी ठरवलेले नसताना आपोआप तो होत गेला. आज त्यांच्या संग्रही अनेक दिग्गज रंगकर्मींच्या मुलाखती, रंगकर्मींचे फोटो, त्या काळातील नाट्यप्रवेशातील फोटो, जुन्या नाट्य स्मरणिका, नाटकाची तिकिटे तर आहेतच; पण अनेक मान्यवरांनी डॉ. फडके यांना लिहिलेली पत्रेदेखील त्यांच्या बटव्यात सापडतात. आजपर्यंत त्यांनी बडोदा, पुणे, मुंबई येथे संपन्न झालेली अनेक स्तरांवरील नाट्य संमेलने पाहिली असल्याने उत्तम लोकसंग्रह आणि त्यातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्याने हा दुर्मीळ संग्रह ठरवून केला नसून, आपोआप होत गेल्याचे फडके सांगतात.
 
 
पदव्युत्तर शिक्षणासाठी जेव्हा फडके यांनी मुंबईच्या कीर्ती महाविद्यालयात प्रवेश मिळविला, तेथे ‘भारतरत्न’ सचिन तेंडुलकर यांचे वडील प्रा. रमेश तेंडुलकर यांच्याशी त्यांचा परिचय झाला. गुरू-शिष्याचे हे नाते त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक मोठा ठेवा असल्याचे फडके सांगतात. एक दिवस आजोळी गेलेल्या आपल्या मुलाचे फोटो काढण्यासाठी फडके यांना प्रा. तेंडुलकरांनी डोंबिवलीला नेले आणि अवघा पाच महिन्यांचा तान्हुला सचिन तेंडुलकर फडकेंच्या कॅमेर्‍यात कैद झाला. भविष्यात त्याने क्रिकेटविश्वावर केलेले राज्य आणि त्याच्या चाहत्यांची वाढत्या गर्दीत अनेक जण असले तरी कुटुंबातील लहानगा सचिन पाहणारे फडके एकमेव होते. पुढे सचिनशी झालेल्या भेटीत ही छायाचित्रे त्याला देताना फडके आणि प्रत्यक्ष सचिन दोघेही भावुक झाल्याची दखल अनेक प्रसारमाध्यमांनीदेखील घेतली.
 
 
कलाक्षेत्रातील कामासह शिक्षण आणि छंद यांचा मेळ त्यांनी साधला. सध्या ते कळव्यातील ‘ज्येष्ठ नागरिक संघा’चे सेक्रेटरी, तसेच ठाण्यातील ज्येष्ठ नागरिक मध्यवर्ती संघटनेतही सक्रिय असून, ज्येष्ठ नागरिकांच्या मासिकाचे संपादक म्हणूनदेखील हातभार लावतात. ज्येष्ठांसाठी विविध उपक्रम राबविताना थकवा, आजार या सर्वांचा विसर पडत असल्याचे ते सांगतात. ज्येष्ठ नागरिक संघांच्या स्मरणिका संपादन, वृत्तपत्रीय लेखनही फडके यांच्या नावावर आहे. मुलाखती, वृत्तसंकलन, चित्रपटाचा इतिहास, सभा संमेलनांचे रिपोर्ट्स, नाट्यवृत्त इ. प्रकारचे लेखन त्यांनी केले आहे.
 
 
सुधाकररावांच्या पत्नी अलकाताई याही तेव्हा मंत्रालयात नोकरीला होत्या. त्यांना वाचनाची आणि अध्यात्माची आवड असल्याने त्यांची बहुमोल साथ डॉ. सुधाकररावांना छंद जोपासण्यास झाली. दोघांना एकत्रित वेळ मिळाला तर त्याचा उपयोग ते आध्यात्मिक सहलींसाठी करतात. दोन्ही मुलांना मराठी माध्यमातून शिकवूनदेखील दोन्ही मुले अमेरिकेत स्थिरस्थावर असल्याचे डॉ. सुधाकर अभिमानाने सांगतात. आपण एक पाऊल पुढे टाकलं, तर देव कोणाच्या तरी रूपाने मदत करतो. या हाताने केलेली मदत त्या हाताला कळता नये, अशा मताचे असलेल्या डॉ. सुधाकर यांनी कोरोना काळात अनेक आश्रम, संस्थांना यथाशक्ती मदत तसेच शैक्षणिक साहित्य पुरवले. त्याचबरोबर ‘निसर्ग’ वादळग्रस्तांनाही मदत दिल्याचे त्यांचे निकटवर्तीय सांगतात. “सध्या ‘कॉम्प्युटर’शी झालेली मैत्री, पत्नीचे सहकार्य, जोपासलेले ज्ञान आणि छंद यांमुळे वार्धक्यही आनंदात जात आहे,” असे अभिमानाने सांगणार्‍या डॉ. सुधाकर यांना आपल्याकडील ज्ञान व शिक्षणाचा समाजाला काही तरी उपयोग व्हावा, यासाठी उपक्रम राबवण्याची इच्छा आहे. त्यांच्या या समाजोपयोगी धडपडीसाठी दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मन:पूर्वक शुभेच्छा!
 
 
@@AUTHORINFO_V1@@