झेपत नाही ते करायला जायचे आणि तोंड फोडून घ्यायचे!

    25-May-2021
Total Views |

Tope _1  H x W:





मुंबई
: ग्लोबल टेंडरला आंतरराष्ट्रीय कंपन्या प्रतिसाद देत नसल्याने आता केंद्राने हस्तक्षेप करून राज्याला लस पुरवावी, अशी मागणी राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केली आहे. भारतातील राज्यांनी ग्लोबल टेंडर काढण्याची प्रक्रीया सुरू केली होती. भारतातील अनेक राज्य सरकारांनी लस मिळवण्यासाठी ‘फायझर’ आणि ‘मॉडर्ना’ यांच्याकडे संपर्क साधला होता. परंतु, केवळ केंद्र सरकारशीच व्यवहार करण्याचा निर्णय या कंपन्यांनी घेतला आहे.


 
सुरुवातीला मुंबई महापालिकेने ग्लोबल टेंडरसाठी पुढाकार घेतला होता. मात्र, प्रतिसाद न मिळाल्याने हा प्रस्तावही बारगळला होता. या प्रकरणी आता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी वक्तव्य केले आहे. केंद्राने लस आयात करून राज्याला पुरवावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
 


मात्र, भाजपकडून या मागणीवरूनही आरोग्यमंत्र्यांना टोला लगावण्यात आला आहे. "झेपत नाही ते करायला जायचे आणि तोंड फोडून घ्यायचे ही ठाकरे सरकारची तऱ्हा. केंद्राच्या सल्लामसलतीशिवाय लशींसाठी जागतिक टेंडर काढण्याचा प्रयत्न साफ फसलाय. अखेरीस आगाऊपणा गुंडाळून आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केंद्रालाच साकडे घालावे लागले आहे, अशी खोचक टीका मुंबई भाजपतर्फे करण्यात आली आहे.
 


दरम्यान, आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सोमवारी दिलेल्या माहितीनुसार, “ ‘फायझर’ असो वा ‘मॉडर्ना’, आम्ही सर्वांशी केंद्रस्तरावर समन्वय साधत आहोत. ते भारताला किती डोस देऊ शकतात हे त्यांच्या अतिरिक्त साठ्यावर अवलंबून आहे. ते केंद्र सरकारला सांगतील. त्यानंतर आम्ही राज्य सरकारांना पुरवठा करू किंवा समन्वय साधू.", असे ते म्हणाले आहेत.