धन्वंतरीचे सेवक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    25-May-2021   
Total Views |

Eknath Kulkarni_1 &n
 
 
नाशिक धन्वंतरीची सेवा करणारे वैद्य एकनाथ गणेश कुलकर्णी यांच्या कार्याविषयी...
 
 
 
भारतीय पुराणशास्त्रात वेदांना अनन्वित महत्त्व आहे. ‘आयुर्वेद’ हा त्यापैकीच एक. असे म्हणतात की, वैद्यकशास्त्रांच्या सर्व शाखांत पृथ्वीवर सर्वात आधी निर्माण झालेले शास्त्र म्हणजे ‘आयुर्वेद’ होय. मात्र, आजच्या आधुनिक युगात ‘आयुर्वेद’ उपचार पद्धतीचा वापर अगदी सहजपणे करताना फारसे नागरिक आढळत नाहीत. नाशिक येथील ‘आयुर्वेद सेवा संघ’मध्ये रुग्णसेवा बजावत धन्वंतरीची सेवा करणारे वैद्य एकनाथ गणेश कुलकर्णी यांच्या कार्यातून आयुर्वेद उपचार पद्धतीचे महत्त्व अनेकांना समजण्यास आणि त्याचा प्रसार व प्रचार होण्यास मदतच होत आहे. कुलकर्णी हे आयुर्वेदाचे चिकित्सक, प्रसारक, संघटक म्हणून खर्‍या अर्थाने सुपरिचित आहेत.
 
 
सोलापूर जिल्ह्यातील मेथवडे या ग्रामीण भागात जन्म व शिक्षण झालेले कुलकर्णी हे त्यांच्या कार्याने आयुर्वेदाचे उपासक म्हणून ओळखले जातात. ‘सेवा संघाची शान’ अशीच ओळख तेथील कर्मचारी कुलकर्णी यांची अगदी सहजपणे करून देतात. विठुरायाच्या नगरीत माध्यमिक शिक्षण झालेले डॉ. कुलकर्णी हे विठ्ठलाप्रमाणेच आपल्या कार्यात अचल आणि स्थायी आहेत. प्रतिभावान असलेल्या डॉ. कुलकर्णी यांना शालेय शिक्षणापश्चात एव्हाना विद्येचे माहेरघर खुणावू लागले होते. तेथे त्यांनी नूतन मराठी विद्यालयात प्रवेश घेतला. येथेही त्यांनी आपल्या आवडींना, छंदांना महत्त्व देत आंतरमहाविद्यालयीन नाट्य स्पर्धांमध्ये सहभागी होत अनेक पारितोषिके पटकावली. यानंतर कुलकर्णी यांनी पुण्यातील टिळक आयुर्वेद महाविद्यालयात प्रवेश घेतला. याच काळात त्यांनी आयुर्वेदाच्या शिक्षणाबरोबर संस्कृतचे धडेदेखील गिरविण्यास सुरुवात केली.
 
 
डॉ. कुलकर्णी यांनी आपले शिक्षण हे प्रा.स.रा. भट आणि अन्य शिष्यवृत्त्यांच्या द्वारे पार पाडले. पदव्युत्तर शिक्षणासाठी एकनाथ कुलकर्णी हे नाशिकला आले आणि कायमचे नाशिककर झाले. येथेच त्यांनी आयुर्वेदाचे पदव्युत्तर शिक्षण घेतले आणि धन्वंतरीच्या सेवेला खर्‍या अर्थाने सुरुवात केली. यानंतर त्यांनी अविरतपणे ‘आयुर्वेद सेवा संघा’ची ‘आरोग्यशाळा’, ‘औषधभवन’, ‘आयुर्वेद पत्रिका’, ‘आयुर्वेद महाविद्यालय’ आदी संस्थांमध्ये मोलाचे योगदान दिले. त्याचप्रमाणे त्यांनी कोल्हापूर येथील ‘यशवंत आयुर्वेद महाविद्यालय’ आणि रुग्णालय यांच्या उभारणीतदेखील महत्त्वाचे योगदान दिले आहे. आपल्या कार्याचे योगदान जे सर्वसामान्य नागरिकांच्या प्रति देता यावे, यासाठी डॉ. कुलकर्णी यांनी १९९२ साली नाशिक येथील जिल्हा परिषदेत ‘आयुर्वेद विस्तार अधिकारी’ या पदाचा कार्यभार स्वीकारला. या पदावर असताना त्यांनी साथींचे नियंत्रण, पल्स पोलिओ, हिवताप नियंत्रण, एड्स नियंत्रण, कुटुंब कल्याण, शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य, आयुर्वेद चिकित्सा शिबिरे यात सातत्याने सहभाग घेऊन उत्कृष्ट कार्य केले. १९९२ ते १९९७ या काळात जिल्हा परिषदेचे नवीन २२ आयुर्वेदिक दवाखाने उभे राहावेत, यासाठी डॉ. कुलकर्णी यांनी केलेले कार्य शब्दातीत आहे.
 
 
 
जिल्ह्यातील इतर नागरिक आणि वनवासी भागातील नागरिकांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठीदेखील डॉ. कुलकर्णी यांनी आरोग्यसेवा केली आहे. कार्याच्या परिघात गरजवंत नागरिक हे येत असतात. मात्र, त्या परिघाबाहेर असलेल्या नागरिकांच्या समूहाला तेथील स्थिती अवगत होणे आवश्यक असते. असे झाल्यास सामूहिक प्रयत्नातून मुख्य कार्यास चालना मिळत असते. याच भूमिकेतून डॉ. कुलकर्णी यांनी आरोग्य शिक्षणासाठी वेळोवेळी लेख, कविता, व्याख्याने यांवर भर दिला आहे. कुलकर्णी यांनी १९९७ सालापासून ‘आयुर्वेद संघा’च्या आयुर्वेद महाविद्यालयात ‘अधिव्याख्याता’ या पदावर काम करण्यास सुरुवात केली. पण, त्याचबरोबरीने त्यांनी आरोग्यशाळा रुग्णालयातील आत्यंतिक चिकित्सा विभागात वैद्यकीय अधिकारी म्हणून काम पाहिले. विद्यार्थिप्रिय शिक्षक आणि रुग्णप्रिय वैद्य म्हणून त्यांची ख्याती, आपले दिलासादायक बोलणे आणि समस्येपेक्षा उपायांवर भर देण्याची पद्धती यामुळे लवकरच पसरली.
 
 
कुलकर्णी यांनी एड्स, मूत्रपिंडाचे आजार यावरील, तसेच रोगप्रतिबंधक आयुर्वेदीय उपचार सर्वसामान्यांना कसे परवडतील, या विषयावर संशोधन केलेले आहे. तसेच त्यांनी वृद्धांचे आरोग्य या विषयावरही संशोधन केलेले आहे. सर्वांगीण कामगिरीकरिता त्यांना ‘खडीवाले वैद्य प्रतिष्ठान’चा ‘पूज्य पादाचार्य रचनात्मक कार्य पुरस्कार’ २००२ साली देण्यात आला. इंद्रिये, मन, शरीर आणि आत्मा यांचा संयोग म्हणजे आयुर्वेद. त्यामुळे ही उपचार पद्धतीही परिपूर्ण आणि रोगांचे समूळ उच्चाटन करणारी आहे. आजकाल रोग न होण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्यासाठी आयुर्वेद महत्त्वाचे आहे. आधुनिक औषधे महागडी असून ती सर्वांना परवडतील अशी नाहीत. आधुनिक उपचार पद्धतीत यंत्रांचा अधिक वापर होतो. तो एक प्रकारे ठीकदेखील आहे. मात्र यंत्रांच्या अतिवापरामुळे रुग्ण व डॉक्टर यांच्यात मानवी स्पर्श होत नाही. त्यामुळे रुग्ण व वैद्य हे नातेसंबंध दुरावले जात आहेत. रुग्ण, वैद्य, औषध व परिचारक हे उत्तम असतील तर चिकित्सा उत्तम होत असते, अशीच कुलकर्णी यांची धारणा आहे. कोरोनाच्या काळात आपल्या कार्याद्वारे आणि उपचार पद्धतीद्वारे अनेकांच्या मनात आत्मविश्वास जागृत करणार्‍या डॉ. कुलकर्णी यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
@@AUTHORINFO_V1@@