समाजात नवयुवकांमध्ये राष्ट्रनिष्ठा जागृत करण्यासाठी समरस प्रयत्न करणारे नाशिकचे नाना बच्छाव यांच्याविषयी...
“प्रवाहाच्या विरोधात जाऊन समाजभान बाळगत राष्ट्राचे कल्याण चिंतणार्या पूजनीय डॉ. केशव बळीराम हेडगेवारांच्या विचारांचा माझ्यावर खूप प्रभाव आहे. त्या विचारांमुळेच नेहमीच मला नवीन स्फूर्ती येते. समाजबांधव आपले आहेत, त्यांचे दुःख दूर करण्यासाठी आपल्या परीने कार्य करण्याची शक्ती मला हे विचार देतात,” असे बाबाजी त्र्यंबक बच्छाव उर्फ नाना बच्छाव यांचे म्हणणे. ‘समरसता गतविधी पश्चिम महाराष्ट्र मंडळ’ सदस्य असलेले नाना बच्छाव नाशिकच्या समाजजीवनातले एक जाणते नाव.
कोरोनाचा कहर महाराष्ट्रात गेल्या वर्षी सुरू झाला. अशा वेळी नाना स्वस्थ बसले नाहीत. रा. स्व. संघाचे अमोल पाठबळ होतेच. कोरोनाकाळात रक्ताचा तुटवडा सर्वत्र जाणवत होता. अशा काळात नानांनी रक्तदान करण्यासाठी युवकांना प्रोत्साहित केले. कोरोनाकाळात ‘प्लाझ्मा’दानाची संकल्पना पुढे आली. ‘प्लाझ्मा’दान करून कोरोना रुग्णांचे प्राण वाचवण्यास मदत होते, असे निदान झाले. जिथे रक्त द्यायला लोक पुढे येत नव्हते, तिथे ‘प्लाझ्मा’दान करायला कोण पुढे येणार? पण, नानांनी असा विचार न करता ‘प्लाझ्मा’दाना संदर्भात लोकजागृती केली. लोकांशी संपर्क करून ‘प्लाझ्मा’ दान करण्याविषयी जागृती केली. त्यांच्या या जनजागृतीने काही लोकांनी ‘प्लाझ्मा’दानही केले. एकूणच, नानांनी त्यांच्या समाजकार्यातून विविध समाजातील युवकांमध्ये देशासाठी कार्य करण्यासाठीची प्रेरणा जागृत केली आहे. अर्थात, याचे सगळे श्रेय ते रा. स्व. संघालाच देतात.
नानांच्या पूर्वायुष्याचा मागोवा घेण्याचा प्रयत्न केला, तर माळी समाजाचे त्र्यंबक बच्छाव आणि नादरबाई बच्छाव यांना पाच अपत्ये. त्यापैकी एक बाबाजी उर्फ नाना. बच्छाव कुटुंब मूळचे सटाण्यातल्या जुनी शेंमळी गावचे. त्र्यंबक हे पोलीस खात्यात जमादार, तर आई नादरबाई गृहिणी. आपल्या मुलांवर चांगले संस्कार व्हावेत यासाठी नादरबाई खूप प्रयत्न करत. नादरबाई या शेजारणींना एकत्र करून पंढरपूरच्या वारीला जायच्या. लहान वयातही नानांच्या मनात विचार आला, किती प्रेमळ आहेत सगळे. जणूकाही सगळे एका घरातलेच. समाज म्हणजे एक मोठे कुटुंबच, ही भावना नानांच्या मनात दृढ झाली. नाना तेव्हा दहा वर्षांचे होते. त्यावेळी शेजारची बाई अचानक पेटलेल्या अवस्थेत घराबाहेर आली. स्वयंपाक करतानाच स्टोव्हने पेट घेतला आणि त्या बाईचा पदर जळू लागला. ही गर्दी जमली. एक क्षण कुणाला कळलेच नाही काय करायचे. नानांनी मात्र त्या महिलेला आगीच्या ज्वाळांनी वेढलेले पाहून तत्काळ स्वतःची चादर पाण्यात भिजवली आणि त्या महिलेच्या अंगाला गुंडाळली. काही सेकंदातच आग विझली. ती महिला वाचली. नानांच्या धैर्य आणि प्रसंगावधानाचे सगळ्या गावाने कौतुक केले. संध्याकाळी त्र्यंबक कामावरून आले ते नानांना म्हणाले, “असेच दुसर्यांच्या दुःखात धावून जात जा.” वडिलांचा आनंद आणि प्रेरणादायी शब्द नानांच्या आयुष्याचे सार बनले. पुढे नानांनी मग ‘मॅकेनिकल ड्राफ्समन’चा कोर्स ‘आयटीआय’मधून केला. त्याच काळात कला शाखेचे महाविद्यालयीन शिक्षण सुरू केले. नाशिकमध्ये एका खासगी कंपनीत काम करू लागले. या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करता करता ते आता सेवानिवृत्त झाले आहेत.
असो. नव्वदच्या दशकात त्यांनी ‘महात्मा जोतिबा फुले’ नावाचे मंडळ स्थापन केले. माळी समाजाच्या संघटन आणि विकासासाठी काम सुरू केले. आपल्या कामाने परिसरात, समाजात ते चांगलेच लोकप्रिय झाले. त्यावेळी छगन भुजबळ यांचाही उमेदीचा काळ होता. नाना यांनाही वाटले की, आपणही राजकारणात जावे. ‘समाजाचा माणूस’ म्हणून नानांचा भुजबळ यांच्याशी सातत्याचा संपर्क-संवाद होताच. पण, भुजबळ यांनी नानांना तिकीट नाकारले. राजकारणाची अशी कडू चव चाखल्यावर त्यांनी राजकीय महत्त्वाकांक्षेला कायमचा रामराम ठोकला. सामाजिक कार्यातच स्वतःला गुंतवून घेतले. १९९७ साली नाशिकमध्ये रा. स्व. संघाने एक योगशिबीर आयोजित केले होते. त्या शिबिरात नाना सहभागी झाले. त्या क्षणापासून ते आजपर्यंत ते संघमय जीवन जगत आहेत. कुशाभाऊ ठाकरे, दामुअण्णा दाते यांच्या प्रत्यक्ष बौद्धिक सहवासाचा अनुभव नानांना लाभला आहे. संघाच्या शाखेत नानांनी कुशाभाऊ ठाकरेंचे बौद्धिक ऐकले. ‘संगोष्टी’ म्हणजे संघाच्या गोष्टी त्यांनी सांगितल्या. समाजाचे, देशाचे भले व्हावे म्हणून संघाच्या मुशीतून तयार होणारे सेवाव्रती, त्यांचा त्याग, संघर्ष ऐकून नानांच्या विचारांमध्ये आमुलाग्र बदल झाले. नाना आपल्या आयुष्याचा पट उलगडताना, “पत्नी जिजाबाई यांचे योगदान माझ्या संसरात मोठे आहे,” असे सांगतात. तसेच, “यापुढेही रा. स्व. संघाच्या देशनिष्ठ आणि समाजशील विचारांचा वारसा नवपिढीमध्ये रुजवावा, यासाठी काम करणार,” असे नाना बच्छाव यांचे म्हणणे आहे. नाना बच्छाव आता केवळ माळी समाजाचे नव्हे, किंवा संघाचेच नव्हे, तर सगळ्या मदतीस तत्पर असलेले नाना म्हणून सगळ्या नाशिकचे नाना आहेत.