कोपरी पुलावरील वाहतुक शनिवारी मध्यरात्री बंद

    21-May-2021
Total Views |

kopari_1  H x W



ठाणे,दि.२१ (प्रतिनिधी)
: ठाणे-मुंबई शहराला जोडणाऱ्या पुर्वद्रुतगती महामार्गावरील कोपरी पुलाचे काम एमएमआरडीएच्या माध्यमातून सुरू आहे. या पुलाजवळ ज्ञानसाधना महाविद्यालयाकडे जाण्यासाठी जुना पादचारी पुल अस्तित्वात आहे. उड्डाणपुलास अडथळा ठरणाऱ्या या पुलाचे तोडकाम शनिवारी मध्यरात्री पासून ते रविवारी पहाटे पर्यंत चालणार आहे.शनिवारी २२ मे रोजी मध्यरात्री ११ वाजल्यापासून ते रविवारी २३ मे रोजी पहाटे ६ वाजेपर्यंत सहा तास हा मार्ग बंद ठेवण्यात येणार आहे. मोठ्या क्रेनच्या सहाय्याने हे काम चालणार असल्याने या मार्गावरून होणारी मुंबई-ठाणे दरम्यानची संपुर्ण वाहतुक बंद ठेवावी लागणार आहे. नागरिकांच्या सोईसाठी ठाणे शहर वाहतुक पोलीसांकडून या भागातील वाहतुक पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे वाहन चालकांनी वाहतुक पोलीसांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी केले आहे.


या दरम्यान नाशिक-मुंबई महामार्गाने ठाणे शहरातून मुंबईकडे जाणाऱ्या जड-अवजड वाहनांना खारेगांव टोलनाका येथे प्रवेश बंद असून ही वाहने खारेगांव टोलनाका येथून डावीकडे वळण घेऊन गॅमन चौक- पारसिक रेतीबंदर-मुंब्रा बायपास-शिळफाटा उजवीकडे वळण घेऊन महापे मार्गे रबाळे-ऐरोली ब्रिजवरून मुंबई पुर्वद्रुतगती मार्गावर जातील. तर घोडबंदर मार्गाने ठाणे शहरातून जाणाऱ्या अवजड वाहनांना माजीवडा ब्रीजवर उजवे वळण घेण्यास व गोल्डन क्रॉस माजीवाडा ब्रीज खाली प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने तत्वज्ञान सिग्नल पुढे माजीवाडा ब्रिजवरून खारेगांव टोलनाका येथून मुंब्राबायपास मार्गे ऐरोलीतून मुंबई दिशेकडे जातील.हलक्या वाहनांसाठी ठाणे-बेलापूर रस्त्याचा पर्याय आहे.नाशिक व घोडबंदर रोडने येणाऱ्या सर्व हलक्या वाहनांना नौपाडा सेवा रस्त्याने तुळजाभवानी मंदिर समोरून कोपरी ब्रिजकडे जाण्यास बंदी घालण्यात आली आहे.तसेच तिन हात नाका येथून डावीकडे वळण घेऊन एलबीएस मार्गाने मॉडेला चेक नाका मार्गे मुंबईकडे जाता येणार आहे. याशिवाय हलकी वाहने कोपरी ब्रिज सर्कल, बाराबंगला फॉरेस्ट ऑफिसकडून आनंदनगर चेकनाका येथून मुंबईकडे जातील.