‘इस्लामिक ब्रदरहूड’ हा म्हणे इस्लामचा आत्मा आहे. मग ‘बोको हराम’ आणि ‘इस्लामिक स्टेट इन वेस्ट अफ्रिकन प्रोव्हिन्स’ या दोन्ही संघटनेचे म्होरके, सदस्य हे सगळे मुस्लीमच आहेत. तरीही सत्तासंघर्षात ते एकमेकांशी रक्तरंजित क्रूर संघर्ष करत आहेत.
अबूबकार शेखाऊ मृत पावला किंवा तो गंभीर जखमी झाला असावा, अशी माहिती नायजेरियन आर्मीने दिली आहे. एका पत्रकारानेही स्पष्ट केले आहे की, त्याला खात्री आहे, नव्हे तो प्रत्यक्षदर्शी आहे. जेव्हा अबूबकारच्या ठिकाणावर हल्ला झाला, तेव्हा त्याने पाहिले आहे. अबूबकार कोण तर? ज्याच्या नावातच ‘हराम’ आहे अशा क्रूर ‘बोको हराम’ या दहशतवादी हिंस्र संघटनेचा म्होरक्या. ‘इस्लामिक स्टेट इन वेस्ट आफ्रिकन प्रोव्हिन्स’ या दहशतवादी संघटनेने वर्चस्वाच्या स्पर्धेतून ‘बोको हराम’ या संघटनेला लक्ष्य केले आहे. या टोळीयुद्धातूनच ‘इस्लामिक स्टेट इन वेस्ट आफ्रिकन प्रोव्हिन्स’ संघटनेने ‘बोको हराम’च्या अबूबकार शेखाऊ याच्यावर हल्ला केला. त्यात त्याचा खात्मा झाला, असे नायजेरियन सैन्याचे म्हणणे आहे.
‘इस्लामिक स्टेट इन वेस्ट आफ्रिकन प्रोव्हिन्स’ या दहशतवादी संघटनेला आता नायजेरिया आणि आफ्रिका खंडात त्यांचे हिंसक साम्राज्य उभे कारायचे आहे. त्यासाठी या संघटनेने आफ्रिका खंडामध्ये आधीच हिंसात्मक साम्राज्य उभे केलेल्या ‘बोको हराम’ला संपवण्याचा घाट घातला आहे. त्यासाठी संघटनेच्या नावात ‘इस्लामिक’ शब्द काळजीपूर्वक टाकला आहे. कारण, ‘इस्लामिक’ नाव असलेली संघटना इस्लामसाठी काम करते, असे प्रथमदर्शनी वाटावे हा त्यामागचा हेतू. तसेच जगभरातील मुस्लिमांना या संस्थेविषयी आत्मीयता वाटावी आणि संघटनेचे सदस्य वाढावे, हासुद्धा एक हेतू. नावातच या संघटनेने आपला हेतू स्पष्ट केला आहे की, या संघटनेला पश्चिम आफ्रिकी देशांमध्ये ‘इस्लामिक स्टेट’ निर्माण करायचे आहे. हे दहशतवादीही आपण पैंगबरांच्या शिकवणीनुसार कार्य करतो, असे म्हणतात. मग हे दहशतवादी करत असलेली क्रूर हिंसा, अत्याचार, असहाय गरीब महिलांवर, लहान मुलींवर बलात्कार हे कोणत्या धर्माचे पालन आहे? ‘इस्लामिक ब्रदरहूड’ हा म्हणे इस्लामचा आत्मा आहे. मग ‘बोको हराम’ आणि ‘इस्लामिक स्टेट इन वेस्ट अफ्रिकन प्रोव्हिन्स’ या दोन्ही संघटनेचे म्होरके, सदस्य हे सगळे मुस्लीमच आहेत. तरीही सत्तासंघर्षात ते एकमेकांशी रक्तरंजित क्रूर संघर्ष करत आहेत.
असो. तर मुद्द्यावर येऊ या, आफ्रिका खंडामध्ये ‘बोको हराम’ने दहशतवादी कृत्यांचा नंगा नाच चालवला होता. ‘बोको हराम’च्या दहशतीने तिथली राजसत्ताही डळमळली. एक प्रकारचे स्वतंत्र विकृत साम्राज्यच ‘बोको हराम’ने निर्माण केले. अर्थात, हे सगळे कशाच्या नावाने तर इस्लामचा शांतीधर्म जगभरात प्रसारित करण्यासाठी. या संघटनेचे खरे आणि पूर्ण नाव आहे ‘एहल अस-सुन्ना लिद-दावा वल-जिहाद’. याचा अर्थ आहे मोहम्मद पैंगबरांची शिकवण आणि इस्लामसाठी संघटन बनवणारी संघटना. नायजेरियामधील मॅदुगुरी शहरात या संघटनेचे प्रमुख कार्यालय होते. मात्र, ‘बोको हराम’चा अर्थ नायजेरियाच्या ‘होसा’ भाषेत वेगळाच होतो. ‘बोको हराम’चा अर्थ होतो पश्चिमी शिक्षण विचारधारा ‘हराम’ म्हणजे वर्जित आहे, तर ‘बोको हराम’ने नायजेरिया आणि आसपासच्या मुस्लीम देशांमध्ये आपले हातपाय पसरवले. ते करताना त्यांनी युवकांची दिशाभूल करण्यास सुरुवात केली की, पाश्चिमात्य विचार हे सैतान आहेत. तसेच इस्लामव्यतिरिक्त बाकी सगळेच मरण्यालायक आहेत. असे करणे म्हणजे धर्म आहे. ज्या-ज्या मुसलमानांनीही याला विरोध केला, त्यांना अत्यंत वाईट पद्धतीने ‘बोको हराम’ने मारून टाकले. शाळेत जाणार्या लहान-लहान चिमुरड्यांचे अपहरण केले. त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केला. १२-१२ वर्षांच्या मुलींना बलात्कारामुळे मुलांना जन्म द्यावा लागला, तर असे हे ‘बोको हराम’ माहिती नाही कोणत्या प्रकारचे इस्लामिक राज्य नायजेरियात आणण्याचा प्रयत्न करत होते. त्यांच्या दहशतवादामुळे नायजेरिया हा जगातील सर्वात अस्थिर, गरीब देश झाला. धंदा-व्यवसाय शिक्षण सगळेच ठप्प. संयुक्त राष्ट्राच्या मदतीने इथले सामान्य गोरगरीब जगले, वाचले. आता या ‘बोको हराम’चे हरामीपण कमी की काय, तर इथे आता ‘इस्लामिक स्टेट इन वेस्ट आफ्रिकन प्रोव्हिन्स’ या दहशतवादी संघटनेने पुन्हा इथे पूर्णतः इस्लामीकरणाचा बिगुल वाजवला आहे. तूर्तास अबूबकार शेखाऊ मेला, त्याच्यासारखे दहशतवादी लोक असेच अल्लाला प्यारे होवो हीच जगाची इच्छा, आमेन!