मुंबई : कोरोनाच्या लसीवरुन मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरोधात पोस्टर लावण्यात आले. पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना मोदीजी आमच्या मुलांची लस परदेशात का पाठवली? असा सवाल काँग्रेसकडून बॅनर बाजी करत विचारण्यात आला. काँग्रेस पक्षाने मुंबईत लावलेल्या पोस्टर्सवरून भाजप महाराष्ट्र उत्तर भारतीय मोर्चाचे अध्यक्ष संजय पांडे यांनी भारत कोरोना आणि काँग्रेस ह्या दोन व्हायरसशी दोन हात करतोय असे म्हणत काँग्रेसला फटकारले व पोस्टर्स लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पॅन्डामिक ॲक्टअंतर्गत गुन्ह्यांची नोंद करा अशी मागणी केली आहे.
संजय पांडे म्हणाले की, कोरोना वैश्विक महामारीशी संपुर्ण जग लढत आहे. अशामध्ये सर्व देश एकमेकांची मदत करीत आहेत. जेव्हा भारताला आवश्यकता पडली तेव्हा ऑक्सिजन असो, व्हेंटिलेटर असो, रेमडेसिविर इंजेक्शन असो, इतकंच काय तर व्हॅक्सीन सुध्दा इतर देशांनी भारताला मदत म्हणून दिलं. व्हॅक्सीनेशनचा कच्चा माल हा परदेशातून आयात करावा लागतो आणि इंटरनॅशनल एक्सपोर्ट ऑब्लीगेशनच्या अंतर्गत तो फिनिश प्रोडक्ट एक्सपोर्ट करणं हे अनिवार्य आहे. अशामध्ये भारताला कोरोना व्हायरसशी लढत असताना काँग्रेस नामक व्हायरसशी सुद्धा लढावं लागतं आहे. काँग्रेस पार्टी ने आज मुंबईभर व्हॅक्सीनेशनच्या संदर्भात एक भ्रम पसरविणारे पोस्टर्स लावली आहेत. त्या पोस्टर्सचा आम्ही निषेध करतो.
पुढे पांडे म्हणाले, काँग्रेस फक्त आणि फक्त भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय पातळीवर मलिन करण्याचा आणि भारतात भ्रम पसरविण्याचा असा हा प्रयत्न करत आहे. भारतीय जनता पार्टी महाविकास आघाडी सरकारला ही अपील करते की या पोस्टर्स लावणाऱ्यांवर कठोर कारवाई करा आणि त्यांच्यावर पॅन्डामिक ॲक्टअंतर्गत त्यांच्यावर गुन्हा नोंद करा.
पंतप्रधान मोदींविरोधात यापूर्वी दिल्लीत आणि आता मुंबईतही पोस्टरबाजी करण्यात आली आहे. मुंबईतील घाटकोपर भागात कोरोना लसींसंदर्भात टीका करणारी पोस्टरबाजी करण्यात आली आहे. आमच्या मुलांसाठी असणारी लस परदेशात का पाठवली, असा सवाल या पोस्टरमधून विचारण्यात आला आहे.गेल्या काही दिवसांपासून देशात करोना लसींचा तुटवडा जाणवत असून अनेक ठिकाणी लसीकरण केंद्रे बंद आहेत. तर अनेक जण लसीकरण केंद्रावर जाऊनही लस मिळत नसल्याने हैराण आहे. त्यामुळे विरोधकांनी केंद्र सरकारवर टीकेची झोड उठवली आहे. मुंबईत ठिकठिकाणी लागलेल्या पोस्टरमुळे राजकारण तापले आहे.
बॅनरबाजीप्रकरणी २१ ठिकाणी २५ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले होते. तर १७ जणांना अटक केली होती. हाच मुद्दा पकडत राहुल गांधी यांनी देखील केंद्र सरकारवर टीका केली होती.मुंबईत बॅनरबाजीवर महानगरपालिकेकडून कारवाई करण्यात आली आहे. जागोजागी लावण्यात आलेले बॅनर महानगरपालिकेकडून उतरवण्यात आले आहेत. बॅनर उतरवल्या वरून काही ठिकाणी काँग्रेस आणि पालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्ये वाद झाल्याचे समोर आले.मात्र दिल्लीमध्ये ज्याप्रमाणे पोस्टर लावणाऱ्यांवर गुन्हा नोंदवून कारवाई झाली, तशीच कारवाई मुंबईत ही होणार का हे पुढील काळात पाहणं गरजेचं ठरणार आहे.