संपूर्ण बांबू केंद्राची मुहूर्तमेढ रोवणा-या डॉ. सुनील देशपांडे यांचे निधन

    20-May-2021
Total Views |

deshpande_1  H




अमरावती :
मेळघाटच्या लवादा या लहानशा गावात संपूर्ण बांबू केंद्राची मुहूर्तमेढ रोवणा-या डॉ. सुनील देशपांडे यांचे बुधवारी रात्री नागपूर येथे निधन झाले. नागपूर येथील किंग्ज वे हॉस्पिटलमध्ये रात्री सव्वा अकराच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.


मेळघाटच्या संपूर्ण बांबू केंद्राचे संस्थापक डॉ. सुनील देशपांडे यांनी बुधवारी (ता.१९) रात्री शेवटचा श्वास घेतला.पर्यावरणाचे संतुलन राखून प्रत्येकाला प्राणवायू देणा-या वृक्षांचे महत्व सांगणा-या तसेच मेळघाटच्या आदिवासी बांधवांना रोजगार उपलब्ध करून देणा-या देशपांडे यांच्या निधनाने शोक व्यक्त करण्यात येत आहे.

अखिल भारतीय कारागीर पंचायतचे ते राष्ट्रीय संघटक होते. आदिवासीबहुल गावात वास्तव्य करून आपले संपूर्ण आयुष्य वेचणा-या सुनील देशपांडे यांना त्यांची पत्नी डॉ. निरूपमा यांनी दिलेली साथसुद्धा तेवढीच महत्त्वाची होती. १९९४ साली मेळघाटात दाखल झालेल्या डॉ. सुनील देशपांडे यांनी १९९७ साली संस्था रजिस्टर करून बांबूपासून विविध वस्तू तयार करण्यास सुरुवात केली.



मेळघाटच्या जंगलात आदिवासी बांधवांना रोजगाराचे साधन उपलब्ध व्हावे, यासाठी त्यांनी हे केंद्र सुरू केले. त्यासाठी आदिवासी बांधवांना प्रशिक्षण देण्याचे कार्यसुद्धा त्यांनी केले.सर्वच बाबींचा जर ब्रँड होऊ शकतो व ब्रँड उपक्रम होऊ शकतो तर बांबू त्याला अपवाद का? असे म्हणत सुरुवात केलेल्या बांबू राखीची दखल खुद्द प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनीही घेतली होती.



मेळघाटातील लवादा(जि. अमरावती) येथे परिश्रमातून उभ्या केलेल्या संपुर्ण बांबु केंद्राचे संस्थापक आणि कारिगर पंचायत संघटनेचे एक आधारस्तंभ सुनिल देशपांडे यांचे काल रात्री कोरोनामुळे अकाली निधन झाले!त्यांचे निधन ही मुख्यत्वे आदिवासी-वनवासी समाजाची खरोखरच खूप मोठी हानी आहे , अशी भावना भाजपचे ज्येष्ठ नेते डॉ. विनय सहस्रबुद्धे यांनी व्यक्त केली.