‘डेटा अ‍ॅनालिसीस’चा राजा

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    20-May-2021   
Total Views |

Vyankatesh Iyer_1 &n
 
 
लघु-मध्यम श्रेणीतील उद्योजकांना मार्गदर्शन करण्यासाठी त्या तरुणाने ‘डेटा’चे विश्लेषण करणारी संस्थाच स्थापिली. हा तरुण म्हणजे व्यंकटेश अय्यंगार. ’तत्त्वमसि आयएनसी’चा संचालक.
 
 
 
आजच्या काळात कोणत्याही उद्योग-व्यवसायासाठी एक शब्द परवलीचा ठरत आहे, तो शब्द म्हणजे ‘डेटा.’ विशेषत: भारतासारख्या महाकाय लोकसंख्या असणार्‍या देशामध्ये ‘डेटा’ हा सोन्यापेक्षा मौल्यवान बनत आहे. मात्र, त्याचे महत्त्व मोजक्याच उद्योजकांना माहीत आहे, ज्यांना ‘डेटा’चे महत्त्व कळले, त्यांचा उद्योग कोट्यवधी रुपयांची उलाढाल करत आहे. नेमकं हे त्याने जाणलं. जर आपला डेटा लघु-मध्यम श्रेणीतील उद्योजकांनी नीट वापरला, तर तेसुद्धा आपला व्यवसाय कोटींमध्ये सहज घेऊन जाऊ शकतात. या लघु-मध्यम श्रेणीतील उद्योजकांना या संदर्भातील मार्गदर्शन करण्यासाठी त्या तरुणाने ‘डेटा’चे विश्लेषण करणारी संस्थाच स्थापिली. हा तरुण म्हणजे वेंकटेश अय्यंगार. ’तत्त्वमसि आयएनसी’चा संचालक.
 
 
कन्नन अय्यंगार आणि विजया अय्यंगार हे घाटकोपर या मुंबईच्या उपनगरात राहणारं मध्यमवर्गीय तामिळ दाम्पत्य. मूळचे हे अय्यंगार कुटुंब तामिळनाडू मधील तंजावरचे. हे तेच तंजावर आहे जे शिवाजी महाराजांनी आपला धाकटा भाऊ व्यंकोजी आणि एकोजी यांना राज्य करण्यासाठी दिले होते. निव्वळ चौल आणि नायक राजघराण्यांनीच तामिळनाडूवर राज्य केले नव्हते, तर सतराव्या शतकात मराठ्यांनीदेखील आपला दबदबा निर्माण केला होता. आजदेखील याठिकाणी मराठी माणसे आढळतात. परंतु, आता त्यांची मायबोली ही तामिळ आहे, तर जन्मभूमी आणि कर्मभूमी तामिळनाडू आहे.
 
 
या अय्यंगार दाम्पत्यास एकूण दोन अपत्यं. वेंकटेशआणि पूर्णिमा. दाक्षिणात्यांमध्ये शिक्षणास अनन्यसाधारण महत्त्व असतं. कन्नन अय्यंगार हे स्वत: उच्चशिक्षित होते. मध्य रेल्वेमध्ये ते ‘सेक्शन इंजिनिअर’ म्हणून कार्यरत होते. घाटकोपर येथील ‘पुणे विद्यार्थी गृह’ या शैक्षणिक संस्थेमध्ये पहिली ते दहावीपर्यंत वेंकटेश शिकला. त्यानंतर ‘एसआयईएस’ महाविद्यालयातून त्याने भौतिकशास्त्रातील विज्ञानाची पदवी घेतली. पूर्णिमाने ‘मायक्रोबायोलॉजी’ या विषयासह विज्ञान शाखेच्या पदव्युत्तर पदवी परीक्षेत
सर्वोत्तम गुण प्राप्त केल्याने मुंबई विद्यापीठाने तिचा सन्मान केला होता. पदवी हातात आल्यावर व्यंकटेश एका इंग्रजी वृत्तपत्रात ‘सिस्टीम आणि सेल्स असिस्टंट’ म्हणून कामाला लागला. एक वर्षाचा विक्रीकलेचा अनुभव घेतल्यानंतर त्याने एमबीए करण्याचा निर्णय घेतला. मुंबई सेंट्रल येथील ‘बाबासाहेब गावडे इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज’मधून त्याने ‘विपणन’ या विषयातून दोन वर्षांचा ‘एमबीए’ हा पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रम पूर्ण केला.
 
 
त्यानंतर वेंकटेशने अनेक नोकर्‍या केल्या. ‘इंडिया इन्फोलाईन’मध्ये नऊ महिने विक्री विभागात नोकरी केल्यावर त्याला ‘कोकाकोला’सारख्या आंतरराष्ट्रीय कंपनीत काम करण्याची संधी मिळाली. तिथे साडेतीन वर्षे तो विपणन विभागात कार्यरत होता. या नोकरीमुळे मराठवाडा, खानदेश असा महाराष्ट्राचा ग्रामीण भाग वेंकटेशला अनुभवता आला. तिथे त्याने वापरलेल्या कल्पकतेमुळे ‘कोकाकोला’चा व्यवसाय वाढला. जत्रा-उरुस यामध्ये ‘कोकाकोला’ची विपणन अभिनव पद्धतीने केल्याने ‘कोकाकोला’सारखा आंतरराष्ट्रीय ब्रॅण्ड तळापर्यंत पोहोचला. “आपला माल ताठ मानेने विकता आला पाहिजे, कोणाचे लांगूलचालन करुन नव्हे,” ही आपल्या ‘बॉस’ची शिकवण वेंकटेशला आजसुद्धा आठवते.
 
 
यानंतर वेंकटेशने थेट दूरसंचार क्षेत्रात प्रवेश केला. ‘टाटा टेलिसर्व्हिसेस’मध्ये ‘सिनिअर मार्केटिंग एक्झिक्युटिव्ह’ म्हणून ‘ब्रॅण्ड्स अ‍ॅण्ड प्रमोशन’ विभागात एक वर्ष त्याने सेवा दिली. गुजरात राज्यात त्याची त्यासाठी नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर त्याला ‘एअरटेल’मध्ये नोकरीची संधी आली. ‘असिस्टंट प्रॉडक्ट मॅनेजर’ म्हणून त्याला बढती मिळाली. मुंबई आणि अहमदाबाद कार्यालय त्याच्या अखत्यारित होती. ‘व्हॅल्यू अ‍ॅडेड सर्व्हिस’ अर्थात ‘मूल्यवर्धित सेवा’ ही संकल्पना त्याने पश्चिम विभागात ‘एअरटेल’साठी विकसित केली. जवळपास दोन वर्षांच्या सेवेनंतर वेकंटेश ‘रिलायन्स कम्युनिकेशन’मध्ये ‘प्रॉडक्ट डेव्हलपमेंट लीड’ या पदावर रुजू झाला. ‘जीएसएम’ आणि ‘सीडीएमए’साठी ‘ब्लॅकबेरी’ सर्व्हिस आणि अ‍ॅप्लिकेशन त्याने ‘लॉन्च’ केले.
 
 
‘एअरटेल’नंतर ‘व्होडाफोन’साठी काम करण्याची संधी वेंकटेशला मिळाली. ही संधी त्याचं आयुष्य बदलवून टाकणारी ठरली. ‘व्होडाफोन’च्या ‘एसएमई बिझनेस’चा ‘मुख्य विपणन अधिकारी’ म्हणून तो काम करत होता. या नोकरीदरम्यान त्याला अनेक लघु-मध्यम उद्योजकांसोबत जवळून काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्यासमोरील आव्हाने, व्यावसायिक स्पर्धा, व्यवसाय कसा करतात, हे सारं काही त्याला अभ्यासता आले. वेंकटेशच्या भविष्यात उद्योजक होण्याची बीजे इथेच रोवली गेली. तब्बल साडेपाच वर्षे त्याने मुंबई, पंजाब, हिमाचल प्रदेश आणि जम्मू-काश्मीर या प्रांतासाठी काम केले. यानंतर वेंकटेश याने ‘सॅमसंग इलेक्ट्रॉनिक्स’मध्ये विभागीय विपणन व्यवस्थापक म्हणून जबाबदारी स्वीकारली. यावेळी गुजरात, मध्य प्रदेश आणि छत्तीसगढ या राज्यांची त्याच्याकडे जबाबदारी होती. दीड वर्षे त्याने ‘सॅमसंग’मध्ये व्यतीत केले.
 
 
दूरसंचार क्षेत्रानंतर काहीतरी आव्हानात्मक काम करता यावे यासाठी ‘एस्सेलवर्ल्ड’ची जबाबदारी त्याने स्वीकारली. विक्री-विपणनचे साहाय्यक महाव्यवस्थापक म्हणून त्यांनी एक वर्ष जबाबदारी सांभाळली. या नोकरीमुळे लघु-मध्यम उद्योग कसा मोठा होतो, याचा त्याला थेट अभ्यास करता आला. यानंतर ‘त्रेया वायरलेस प्रायव्हेट लिमिटेड’मध्ये महाव्यवस्थापक म्हणून त्याने काम केले.
 
 
दरम्यान, वेंकटेश याने शिक्षणाची कास सोडली नव्हती. ‘एस. पी. जैन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड रिसर्च’मधून ‘मार्केटिंग अ‍ॅनालिटिक्स, अ‍ॅनालिटिक्स’, ‘ए प्लस’ प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला. मुंबई विद्यापीठातून ‘एम.ए इन लीडरशिप सायन्स’ ही आणखी एक पदव्युत्तर पदवी मिळवली. ‘आयआयएम’ कोलकाता येथून ‘डेटा अ‍ॅनालिटिक्स’ प्रमाणपत्र अभ्यासक्रम पूर्ण केला.
एवढा सारा पाया मजबूत झाल्यानंतर उद्योगाची इमारत उभी करण्याची योग्य वेळ आल्याचे वेंकटेश याला जाणीव झाली. एप्रिल 2018 मध्ये त्यांनी ‘तत्त्वमसि कन्सल्टिंग’ नावाची व्यावसायिक संस्था सुरु केली. एखाद्या कंपनीचा, उद्योगाचा, व्यवसायाचा डेटा अभ्यासणे, त्याचे विश्लेषण करून त्यावर निश्चित उपाय सुचवून त्या व्यावसायिक संस्थेला आर्थिकदृष्ट्या वाढण्यास मदत करणे हे ‘तत्त्वमसि’चे उद्दिष्ट आहे. ‘गॅप अ‍ॅनालिसिस’, ‘डेटा ऑडिट’, ‘डेटा कन्सल्टिंग’, ‘रिसर्च’, प्रशिक्षण व कार्यशाळा आदी ‘तत्त्वमसि’च्या सेवा आहेत. ‘इस्रो’, ‘आयआयएम’सारख्या संस्थांना आपल्या ज्ञानाची सेवा दिलेले प्रा. चंद्रशेखर एस, ’स्टार्टअप’ विषयाचे तज्ज्ञ मानले जाणारे दीपक पांडे, ‘जमनालाल बजाज इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्ट्डीज’, मुंबई विद्यापीठच्या संचालिका डॉ. कविता लघाटेसारखी तज्ज्ञ मंडळी ‘तत्त्वमसि’च्या मार्गदर्शक मंडळावर कार्यरत आहेत. ‘आन्त्रप्रिन्युअरशिप डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया’, ‘त्रेया वायरलेस’, ‘जीएनआयएमएस बिझनेस स्कूल’, ‘सॅम प्रॉडक्ट्स’, ’डायागोल्ड क्रिएशन्स’सारख्या अनेक उद्योजकीय, शैक्षणिक व व्यवस्थापकीय संस्थांना ‘तत्त्वमसि’ने सेवा दिलेली आहे.
 
 
“आपल्या देशात ‘डेटा अ‍ॅनालिसिस’चे अजूनही हवे तसे महत्त्व पटलेले नाही. आपल्या उद्योगातील त्रुटी ओळखून त्यामध्ये सुधारणा करण्यासाठी योग्य आराखडा आखून योग्य नियोजनाद्वारे व्यवसाय वृद्धिंगत करण्याची क्षमता ‘डेटा अ‍ॅनालिसिस’मध्ये निश्चित आहे. येत्या काही वर्षांत या क्षेत्राला सोन्याचे दिवस निश्चित येतील,” असा आशावाद ‘तत्त्वमसि’चा संस्थापक वेंकटेश अय्यंगार व्यक्त करतो. येत्या काही वर्षांत ‘तत्त्वमसि’ कोट्यवधींची उलाढाल नक्की करेल, अशी त्याला अपेक्षा आहे. भारतातील लघु-मध्यम उद्योजकांना ‘डेटा अ‍ॅनालिसिस’ तंत्राचा वापर करुन देण्यासाठी वेंकटेश अय्यंगार प्रशिक्षण आणि कार्यशाळादेखील घेतात. पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करण्याचे दिवस आता सरले आहेत. कोरोनाने तर मानवाचे आयुष्यच बदलून टाकले. त्याला अत्याधुनिक तंत्राचा वापर करण्यास भाग पाडले आहे. ‘डेटा अ‍ॅनालिसिस’ या तंत्राचा असाच एक भाग आहे. कदाचित उद्योगाच्या विश्लेषणाचा भविष्यातील तो अविभाज्य घटक असेल.
@@AUTHORINFO_V1@@