‘केपीएमजी’च्या या ‘कोविडनंतरचे ‘एचआर’ व्यवस्थापन’ या आगळ्या-वेगळ्या व्यवस्थापन सर्वेक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, सर्वेक्षण देशांतर्गत २० प्रमुख व निवडक उद्योगांमधील ३१५ कंपन्यांमधील ‘एचआर’ व्यवस्थापन विषयक प्रतिसादांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे या अभ्यास सर्वेक्षणाला प्रासंगिक व्यापकता निश्चितपणे लाभली आहे.
‘कोविड-१९’ महामारीचा गेल्या वर्षी व यंदाही आर्थिक, व्यावसायिक पातळीवर सर्वच क्षेत्रांत तीव्र परिणाम जाणवला. व्यावसायिक संदर्भात कोरोनाचे जे परिणाम कंपनी स्तरावर झाले, त्याची अपरिहार्य परिणती कर्मचार्यांवरही झाली. परिणामी, रोजीरोटीसाठी आपले आरोग्य सांभाळून काम करण्याचे मोठे आव्हान कर्मचार्यांना पेलावे लागले. असे हे आव्हानपर काम कोरोनादरम्यान दीर्घकाळपर्यंत या उभयतांनी कसे आणि कशाप्रकारे केले, याचा ऊहापोह ‘केपीएमजी’ या विख्यात व्यवस्थापन सल्लागार कंपनीने आपल्या ‘भारतातील ‘कोविड-१९’ : ‘एचआर’ कारवाई आणि कामगिरी’ या व्यापक सर्वेक्षणातून केले आहे. हे सर्वेक्षण केवळ अभ्यासपूर्णच नव्हे, तर अनुकरणीयसुद्धा आहे. त्याविषयी सविस्तर जाणून घेऊया.
‘केपीएमजी’च्या या ‘कोविडनंतरचे ‘एचआर’ व्यवस्थापन’ या आगळ्या-वेगळ्या व्यवस्थापन सर्वेक्षणाचे प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे, सर्वेक्षण देशांतर्गत २० प्रमुख व निवडक उद्योगांमधील ३१५ कंपन्यांमधील ‘एचआर’ व्यवस्थापन विषयक प्रतिसादांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला. त्यामुळे या अभ्यास सर्वेक्षणाला प्रासंगिक व्यापकता निश्चितपणे लाभली आहे.
कोरोनाच्या प्रदीर्घ व परिणामकारक स्वरूपात व्यवसाय-व्यापारच नव्हे, तर कंपनीचे कामकाज करणार्या कर्मचार्यांच्या काम आणि आरोग्य या उभयतांवर कोरोनाकाळात अनपेक्षितपणे परिणाम झाले आहेत. या परिणामांची तीव्रता-दाहकता लक्षात घेऊन कंपनी-कर्मचारी व उभयतांच्या संयुक्त प्रयत्नांतून सद्यःस्थितीनुसार आवश्यक व संबंधित ‘एचआर’ व्यवस्थापन विषयांतर्गत अशा कर्मचार्यांचे आरोग्य, कर्मचारी-व्यवस्थापन संवाद, प्रचलित मानसिकता, कर्मचार्यांची निवड-नियुक्ती, वेतन व अनुषंगिक लाभ, कर्मचार्यांचे कामकाजविषयक विश्लेषण, कर्मचारी प्रशिक्षण व विकास इ. कोरोनाकाळात विशेषत्वाने जाणवलेल्या आव्हानपर पैलूंचे अभ्यासपूर्ण संकलन यानिमित्ताने संकलित-प्रकाशित करण्यात आले आहे. त्यामुळे कंपनी-कर्मचारी या उभयतांसाठी आगामी काळात ते मार्गदर्शकच नव्हे, तर पथदर्शी ठरणार आहे. ‘कोरोनादरम्यानचे ‘एचआर’ व्यवस्थापन’ या सर्वेक्षणाद्वारे आकडेवारीसह जे मुद्दे प्रकर्षाने व प्रामुख्याने पुढे आले आहेत, त्यांचा तपशील व आकडेवारीसह मागोवा पुढीलप्रमाणे मांडता येईल.
कोरोनाकाळातील कर्मचार्यांचे आरोग्य व व्यवस्थापनाचे योगदान
कोरोनामुळे प्रचलित बंधने-निर्बंधांच्या संदर्भात कंपनीअंतर्गत कर्मचार्यांच्या आरोग्यविषयक प्रश्नांवर त्वरित तोडगा शोधून त्यानुरूप कर्मचार्यांना घरूनच काम करणे शक्य व्हावे, यासाठी सर्वेक्षणात सहभागी अधिकांश म्हणजेच ६८ टक्के प्रतिसाद देणार्या कर्मचार्यांनी अल्पावधीत तयारी केली, तर ४८ टक्के व्यवस्थापनांनी आपल्या कर्मचार्यांना इंटरनेटसह ‘लॅपटॉप’ची सोय करून दिल्याचे अभ्यासात स्पष्ट झाले.
त्याचवेळी ‘केपीएमजी’च्या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या बहुसंख्य म्हणजेच ६२ टक्के कंपन्यांनी आपापल्या कर्मचार्यांच्या कामाच्या ठिकाणी गरजेनुरूप स्वस्तात सॅनिटायझेशनची सोय केली होती, हे विशेष. याशिवाय काही व्यवस्थापन-कंपन्यांनी कर्मचार्यांच्या आरोग्याची अधिक परिणामकारकपणे काळजी करण्यासाठी कर्मचार्यांची रोज ने-आण करणार्या वाहनांचे बाष्फीकरण, विशेष स्वच्छता यासारखी काळजी, त्यांचे कामाचे ठिकाण, भोजनगृह, निवासी वसाहती इ. ठिकाणी काळजी घेतली होती. याशिवाय कर्मचार्यांमधील रोगप्रतिकारकशक्ती अधिक वाढावी, यासाठी पूरक प्रयत्न म्हणून कोरोनादरम्यान कर्मचार्यांना पूरक पौष्टिक खाद्य देण्याचा उपक्रमही काही ठिकाणी स्वयंस्फूर्तपणे राबविण्यात आला होता, हे विशेष.
कर्मचार्यांची भरती-नियुक्ती
सर्वेक्षणात सहभागी झालेल्या उद्योग-कंपन्यांनुसार कोरोनाच्या परिणामी आलेले ‘लॉकडाऊन’ व निर्बंधामुळे त्यांच्या व्यवसायातील अस्थायी व कंत्राटी कर्मचार्यांवर मोठ्या प्रमाणात विपरीत परिणाम झाले व त्यांच्या संख्येत मोठी घट झाली. त्याच वेळी सर्वेक्षणातील ६६ टक्के कर्मचार्यांनी २०२०-२१ दरम्यानची कर्मचारीभरती सरसकट रद्दबादल केली, तर त्यापैकी ३३ टक्के कंपन्यांनी त्यांच्या कर्मचार्यांच्या वेतनमानात याचदरम्यान (कपात) केलेली आहे.
वेतनवाढ, आर्थिक फायदे व पदोन्नती
कोरोनादरम्यान ५० टक्के कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना वेतनवाढ दिली नाही, तर ३६ टक्के कंपन्यांनी कर्मचार्यांच्या वेतनवाढीत कपात करण्यास प्राधान्य दिलेले दिसून आले. हीच बाब २८ टक्के कर्मचार्यांना दिल्या जाणार्या प्रोत्साहन भत्त्यात कपात केली. मात्र, त्याचवेळी काही निवडक कंपन्यांनी कोरोनाच्या कारणाने कर्मचार्यांचा मोठा व वाढता खर्च उचलण्याची सकारात्मक भूमिका घेतल्याचे स्पष्ट झाले. कर्मचार्यांच्या वार्षिक पदोन्नतीच्या संदर्भातही सर्वेक्षणातील ५० टक्के कंपन्यांनी गेल्या वर्षी ‘जैसे थे’ भूमिका घेतली, तर त्याचवेळी ३३ टक्के कंपन्यांनी मर्यादित स्वरूपातच पदोन्नतीचा मार्ग चोखाळला.
कंपनी-कर्मचारी संवाद
कंपनीस्तरावर कर्मचार्यांशी नैमित्तिक व प्रासंगिक स्तरावर संवाद साधून त्यांची प्रचलित व्यावसायिक स्थिती, शासकीय नियम, कोरोनासंदर्भात घ्यावयाची विशेष काळजी, वैद्यकीय शंका निरसन, कौटुंबिक आजार विषयक समस्यांची सोडवणूक, यावर सर्वाधिक म्हणजेच ७६ टक्के कंपन्यांनी भर दिल्याचे आवर्जून नमूद करावे लागेल. प्रचलित नियमावली व मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून या कंपन्यांनी कर्मचारी संवाद प्रक्रियेसाठी आभासी संवाद साधन-माध्यम विशेष फायदेशीर असल्याचे दिसून आले. याशिवाय काही कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना आरोग्य विषयक सल्ला व मार्गदर्शन करण्यासाठी कंपनीतर्फे उपलब्ध असणार्या संगणकीय संवाद पद्धतीचा (वापर) मोठ्या प्रमाणात व परिणामकारकरीत्या केला आहे.
कर्मचारी प्रशिक्षण व विकास
‘कोविड’मुळे कर्मचार्यांची मर्यादित संख्या, त्यांची उपलब्धता, सामाजिक अंतर राखण्याची गरज व मुख्य म्हणजे कोरोनाकाळात कर्मचार्यांनी प्रदीर्घ काळपर्यंत घरूनच काम करण्यावर सरकारी स्तरावर व व्यवस्थापनातर्फे आवर्जून भर दिल्याने कंपनीअंतर्गत कर्मचारी प्रशिक्षण यावर मोठा व दीर्घकालीन खंड पडणे स्वाभाविकच होते. यावर तातडीने तोडगा काढून कंपन्यांनी आपल्या कर्मचार्यांना महत्त्वाच्या व निकडीच्या विषयात छोट्या-छोट्या सत्रांद्वारा व संगणकीय म्हणजेच ‘ऑनलाईन’ वेब, वेबिनार सत्रांचा अवलंब करून आपले कर्मचारी प्रशिक्षण प्रयत्न निरंतरपणे व कल्पक पद्धतीने कायम राखले व त्याचा कठीण काळात नेमका उपयोग करून घेतला, हे विशेष उल्लेखनीय आहे.
या आणि अशा अनेक मुद्द्यांवर ‘केपीएमजी’ने केलेले ‘कोविड-१९’च्या निमित्ताने कोरोनाकाळात कंपनीचे कामकाज व कर्मचार्यांचे आरोग्य-उपचार याविषयी आव्हानपर व संवेदनशील प्रश्नांवर कंपन्यांच्या ‘एचआर’ विभागातर्फे काय आणि कशी उपाययोजना केली गेली, त्याचा लाभ मिळवून देतानाच आपले कर्तव्य कसे कल्पकपणे पार पाडले, याचा मार्गदर्शक गोषवारा या सर्वेक्षणाद्वारे प्राप्त झाला आहे.
- दत्तात्रय आंबुलकर
(लेखक एचआर व व्यवस्थापन सल्लागार आहेत.)