बदलते नियम आणि गोंधळ

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    19-May-2021   
Total Views |

Corona_1  H x W
 
कोरोना महामारीशी संबंधित औषधे, लसी, उपचार पद्धती यांच्या बदलत्या नियमांमुळे जनसामान्यांमध्ये एकप्रकारे गोंधळाचे वातावरण आहे. त्यातच सोशल मीडियावरून फिरणार्‍या संदेशांनी या गोंधळात अधिकच भर टाकलेली दिसते. महामारीच्या प्रारंभी काळात असा संभ्रम आणि शास्त्रज्ञांची हतबलता जनसामान्यांनीही ग्राह्य धरली. कारण, कोरोनाचा विषाणू आणि एकूणच महामारीचे स्वरूप हे जनसामान्यांबरोबर वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांसाठीही तितकेच नवीन होते. परंतु, कोरोनावर या एका वर्षात केवळ भारतातच नाही, तर जागतिक पातळीवर अगदी वेगाने संशोधन झाले आणि ते आजही सुरूच आहे. दर आठवड्याला कोरोनावरील नवनवीन औषधे आणि उपचार पद्धतींची घोषणाही होते. पण, हे सगळे करताना ज्या औषधोपचार पद्धतींचा वापर आजवर गेला केला, ते एकाएकी चुकीचे होते, असे सांगितल्याने सामान्यांच्या मनातही प्रश्नचिन्ह उपस्थित झाल्याशिवाय राहत नाही. कोरोनाच्या पहिल्या लाटेच्या वेळी असा प्रकार ‘हायड्रॉक्सिक्लोरोक्विन’च्या गोळ्यांबाबत झाला. कालांतराने त्या गोळ्या तितक्याशा प्रभावी नाहीत म्हणून बाजूला पडल्या, तर नुकतेच ‘प्लाझ्मा थेरपी’ परिणामकारक नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांनी सांगितल्याने त्याला एकाएकी बासनात गुंडाळण्याचा निर्णय झाला. पण, यामुळे हाच प्रश्न उपस्थित होतो की, सुरुवातीला ‘प्लाझ्मा थेरपी’ परिणामकारक असल्याचे आणि तसे सिद्ध झाल्याचे सांगितल्यानंतरही आता हा निर्णय का? आपल्या कोरोनाबाधित रुग्णाला ‘प्लाझ्मा’ मिळावा म्हणून त्यांच्या नातेवाइकांना किती रुग्णालयांचे, इतर कोरोनातून बर्‍या झालेल्या रुग्णांचे उंबरे झिजवावे लागले, त्याचे काय? ‘प्लाझ्मा’दान करा म्हणून ज्यांनी सामाजिक अभियान राबविले, ‘प्लाझ्मा’ मिळवण्यासाठी जी धडपड केली ते सगळे कशासाठी? म्हणजे एकाएकी आपण आपल्या रुग्णासाठी अवलंबलेली उपचार पद्धतीच अयोग्य होती, हे कळल्यानंतर सामान्यांना चिंता भेडसावणे साहजिकच. तशीच गत सध्या लसींच्या दोन डोसमधील अंतराची आणि कोरोनाबाधितांनी नक्की कधी लस घ्यावी, याबाबतच्या संभ्रमाची. तेव्हा, केंद्र सरकारने आणि वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी नवी नियमावली जारी करताना, त्यामुळे फक्त या महामारीच्या काळात जनतेचा गोंधळ उडणार नाही, त्यांच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे.
 
 

केजरीवालांचा मूर्खपणा

 
 
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल सतत या ना त्या कारणाने आपल्या मूर्खपणामुळे कायम चर्चेत असतात. पण, यंदा त्यांनी केलेल्या फुकटच्या टिवटिवाटामुळे भारत आणि सिंगापूर दरम्यानचे संबंध ताणले जाण्याची शक्यताच अधिक होती. पण, परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांच्या समयसूचकतेमुळे हे प्रकरण फार ताणले गेले नाही, एवढेच. त्याचे झाले असे की, केजरीवालांनी आपल्या ट्विटमध्ये सिंगापूरमध्ये आढळून आलेला कोरोनाचा नवीन ‘स्ट्रेन’ लहान मुलांसाठी खूप घातक असल्याचे म्हटले. आता केजरीवाल हे नेमके कुठल्या शास्त्रीय आधारावर बोलले त्यांचे त्यांनाच ठाऊक. पण, आपल्या ट्विटचा असाही परिणाम होऊ शकतो, याची त्यांना पुसटशी कल्पनाही नव्हती. केजरीवालांच्या ट्विटवर सिंगापूर आरोग्य विभागाकडून आणि सिंगापूर दूतावासाकडून यासंबंधी त्वरित स्पष्टीकरण जारी करण्यात आले. त्यानंतर भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी भारताची भूमिका ट्विट करत म्हटले की, “ज्यांना पुरेशी माहिती असायला हवी होती, त्यांच्याकडून आलेली बेजबाबदार वक्तव्य दीर्घकाळ चालत आलेले सिंगापूरसोबतचे द्विपक्षीय संबंध बिघडवू शकतात. त्यामुळे मी हे स्पष्ट करतो की, केजरीवाल दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत. त्यांचे मत हे भारताचे मत नाही,” अशा कडक शब्दांत जयशंकर यांनी केजरीवालांचा चांगलाच समाचार घेतला. केजरीवाल यांना याचाही विसर पडला की, सिंगापूर आणि भारताचे चांगले संबंध आहेत. शिवाय कोरोनाविरुद्धच्या लढाईत सिंगापूरने भारताला मदतही केली होती. पण, केजरीवाल यांच्या ट्विटवर सिंगापूर दूतावासाकडून तीव्र नाराजीही व्यक्त करण्यात आली. कारण, सिंगापूरमध्ये ‘कोविड’चा नवीन ‘स्ट्रेन’ आढळून आल्याच्या दाव्यात कोणतेही तथ्य नसल्याचे सिंगापूरचे म्हणणे आहे. ही बाब चाचण्यांमधून सिद्धही झाली आहे. म्हणूनच सिंगापूर सरकारने आपल्या उच्चायुक्तांशी संपर्क साधून अरविंद केजरीवाल यांच्या चुकीच्या ट्विटबद्दल आक्षेपही नोंदवला आहे. पण, जयशंकर यांनीच केजरीवालांचे मत भारताचे प्रतिनिधित्व करत नाही, म्हणत त्यांना त्यांची जागा दाखवून दिली. त्यामुळे यापुढे तरी केजरीवाल भारताला मान खाली घालावी लागेल, असा मूर्खपणा करणार नाहीत, हीच आशा.
 
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@