नवी दिल्ली : भारताचा माजी फिरकीपटू रमेश पोवार याची भारतीय क्रिकेट महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली . त्यांच्या या नियुक्तीनंतर सध्या चांगलाच वाद पेटला होता. अनेकांनी यावर नाराजी व्यक्त केली होती. भारतीय क्रिकेट महिला संघाचे मावळते प्रशिक्षक डब्ल्यू वी रमन यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना पत्र लिहून त्यांची बाजू मांडली होती. त्यानंतर आता माजी प्रशिक्षक पौर्णिमा राव यांनी बीसीसीआय प्रशासनावर आरोप केला आहे.
पौर्णिमा राव या भारतीय महिला क्रिकेट संघाच्या शेवटच्या महिला प्रशिक्षक आहेत. त्याच्यानंतर महिला संघासाठी महिला प्रशिक्षक नियुक्त करण्यात आल्या नाही. त्यांच्यानंतर तुषार आरोठे, रमेश पोवार, वी रमन आणि पुन्हा एकदा रमेश पोवार यांना ही जबाबदारी देण्यात आली. "पल्याला २०१५-१६ साली पदावरुन का काढण्यात आले, याचे कोणतेही कारण सांगण्यात आले नाही," असा आरोप पौर्णिमा राव यांनी केला आहे. माजी प्रशिक्षक पौर्णिमा राव यांनी १९९३ ते २००० या कालावधीमध्ये ५ कसोटी आणि ३३ एकदिवसीय सामन्यांमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी भारतीय महिला प्रशिक्षकपदी महत्वाची भूमिका साकारली होती.
" त्यावर्षी संघाने विश्वचषक अंतिम सामन्यात प्रवेश केला. त्यानंतर त्यांना पैसा, करार आणि सर्व काही मिळाले. खेळाडू यामधून सावरु शकले नाहीत. आता मी सेंद्रीय भाजी आणि फळांची शेती करते. यामध्ये मिळालेले उत्पन्न परिवार आणि मित्रमंडळींमध्ये वाटते. मी या क्षणाचा आनंद घेत आहे. भारतीय महिला क्रिकेटमधून मला जे काही मिळाले, त्यापेक्षा हे खूप चांगले आहे," अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.