मोदीविरोधासाठी काँग्रेसचे प्रेतांवरही राजकारण – सुनील देवधर यांचा घणाघात
18-May-2021
Total Views | 198
261
‘सोनियासेना’ सरकारचे कोव्हिड फेल्युअर उघड झाल्याची टिकाही केली
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपला विरोध करण्यासाठी काँग्रेस आता विकृत थराला पोहोचली आहे. करोनाच्या नव्या प्रकारास 'मोदी स्ट्रेन' संबोधणे, जळत्या चितांची छायाचित्रे जगात सर्वत्र प्रसारित करणे, भारतविरोधी बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांना पुरविणे असे प्रकार काँग्रसने सुरू केले असून त्यांचे हे 'टूलकीट' काँग्रेसचा देशविरोधी चेहरा दाखवित आहे, असा घणाघात भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी मंगळवारी केला.
काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना केंद्र सरकार, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप यांच्यावर टिका करण्यासाठी मार्गदर्शन करणारे एक 'टूलकीट' उघडकीस आले आहे. त्यामध्ये केंद्र सरकारविरोधात काँग्रेस कार्यकर्त्यांनी कसा अजेंडा चालवावा, याचे मार्गदर्शन केले आहे. त्यावर भाजपचे राष्ट्रीय सचिव सुनील देवधर यांनी कठोर शब्दात टिका केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विरोध करताना काँग्रेस आता अतिशय विकृत थराला पोहोचली आहे. देशविरोधी कारवाया करण्यात आता ते पुढाकार घेत असून काँग्रेस कार्यकर्त्यांसाठी तयार करण्यात आलेल्या टूलकीटवरून ते स्पष्ट झाले आहे. करोनाच्या नव्या प्रकारास मोदी स्ट्रेन असे संबोधण्यात यावे, असे आदेश काँग्रेसने आपल्या कार्यकर्त्यांना दिल्याचे उघडकीस आले आहे. त्याचप्रमाणे जगभरात भारतविरोधी वातावरण निर्माण करून देशात मोदीविरोधी वातावरण निर्माण व्हावे, यासाठी भारतविरोधी बातम्या आंतरराष्ट्रीय माध्यमांना पुरविण्याचेही आदेश काँग्रेसने कार्यकर्त्यांना दिले आहेत. त्याचप्रमाणे जळणाऱ्या चितांची छायाचित्रे सर्वत्र प्रसारित करण्याचा आदेश देऊन रक्तपिपासू काँग्रेसने आता प्रेतांचे राजकारण सुरू केले आहे, असा घणाघात सुनील देवधर यांनी केला.
‘सोनियासेना’ सरकारचे कोव्हिड फेल्युअर उघड
सुनील देवधर यांनी महाविकास आघाडी सरकारवरदेखील कठोर शब्दात टिका केली. ते म्हणाले, देशात करोना रुग्णसंख्या आणि करोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येमध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. महाराष्ट्र सरकारला करोना व्यवस्थापनामध्ये पूर्णपणे अपयश आले आहे, ते अपयश झाकण्यासाठीच पीएम केअर्स फंडाविरोधात प्रचार केला जात आहे. मात्र, राज्यातील सत्ताधारी सोनियासेना ठाकरे सरकारने राज्यात व्हेंटिलेटर घोटाळा, लस घोटाळा करून सर्वसामान्य नागरिकांच्या जीवाशी खेळ मांडल्याचेही सुनील देवधर यावेळी म्हणाले.