जिज्ञासूवृत्तीचा ज्ञानप्रकाश

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2021   
Total Views |

Dr Omprakash Kulkarni_1&n
 
 
 
संशोधक वृत्तीने कार्य करणार्‍या व नवनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या नाशिक येथील डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांच्या कार्याविषयी...
विचार करणे आणि विचारपूर्वक कृती करणे, याचे वरदान हे केवळ मानवाला प्राप्त झाले आहे. आपल्या या अफाट विचारशक्तीच्या आणि क्रियाशक्तीच्या बळावर अनेक बाबी साध्य करता येऊ शकतात. याचे उत्तम उदाहरण म्हणजे नाशिक येथील डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी. ‘अभियांत्रिकी क्षेत्रातील बापमाणूस’ अशी ओळख असलेल्या डॉ. ओमप्रकाश यांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा हा लेख....
 
 
संत ज्ञानेश्वर यांच्या कुळाशी जवळचा संबंध असलेले डॉ. कुलकर्णी यांचे शिक्षण हे ‘बीई’ (इलेक्ट्रिकल), ‘एमटेक’ (अ‍ॅरोनोटिकल आणि डिजिटल इलेक्ट्रिकल), मिशिगन विद्यापीठातून विद्यावाचस्पती, ‘आंतरराष्ट्रीय व्यापार’ या विषयात ‘एमबीए’ असे जवळपास सर्वच क्षेत्रात झाले आहे. तसेच त्यांची संघ लोकसेवा आयोगाच्या परीक्षेमार्फत भारतीय प्रशासनसेवेसाठीही निवड झाली होती. आपल्या शैक्षणिक प्रवासात त्यांना डॉ. सतीश धवन, डॉ. यु. बी. आर. राव, डॉ. स्वामिनाथन यांचे मार्गदर्शन व सहवासही लाभला.
 
अगदी लहान वयातच आपल्याला पुढे संशोधक व्हायचे, हे डॉ. कुलकर्णी यांनी ठरविले होते. त्यांच्या आजवरच्या संपूर्ण जीवनाच्या फलिताचे श्रेय हे त्यांचे आई-वडील, गुरू, भाऊ यांना जाते, असे ते आवर्जून नमूद करतात. बालवयातच वाचनाची लागलेली गोडी, स्वामी विवेकानंद आणि रामकृष्ण परमहंस यांचे वाचलेले चरित्र, यामुळे डॉ. कुलकर्णी यांचे विचारविश्व समृद्ध होण्यास मदत झाली.
 
आपण इतर कोणासारखे होण्यापेक्षा, इतरांनी आपल्यासारखे व्हावे असे म्हणावे, असेच कार्य आपल्या हातून घडावे, हा डॉ. कुलकर्णी यांच्या वडिलांनी दिलेला गुरुमंत्र ते आजही जपत आहेत आणि त्यावर मार्गक्रमण करण्याचा यथोचित प्रयत्नही करत आहेत.
 
उषाताई जोगळेकर या त्यांना लाभलेल्या शिक्षिका. त्यांनी कुलकर्णी यांच्यातील इंग्रजी व शास्त्र या विषयातील गती लक्षात घेत, त्यांना प्रोत्साहन दिले. त्यामुळेच इयत्ता सहावीत असतानाच डॉ. कुलकर्णी हे इयत्ता अकरावी ‘मॅट्रिक’चे भौतिकशास्त्र व रसायनशास्त्र हे विषय सहजत हाताळत. या विषयात त्यांना १०० पैकी ७८ गुणदेखील प्राप्त झाले होते. म्हणूनच आपल्यातील संशोधक हा शिक्षकांनी फुलविला, हे ते आवर्जून नमूद करतात.
 
भारतात १९७३मध्ये संगणकात वापरात येणारे ‘इन्ट्रिगेटेड कॉम्प्युटर चीप’ उपलब्ध नव्हते. अशावेळी वर्कशॉपमधील ‘मिलिंग मशीन’ला ‘न्यूमेरिकल’ पद्धतीने नियंत्रित केले होते. त्यांच्या या प्रयोगाचे शंतनुराव किर्लोस्कर, लालचंद हिराचंद, पंडितराव कुलकर्णी यांनी भरभरून कौतुक केले.
 
१९७४ मध्ये डॉ. एम. एस. स्वामिनाथन यांच्यासमवेत ‘इंडियन कॉन्सिल ऑफ अ‍ॅग्रिकल्चर’मध्येदेखील काही काळ काम करण्याची संधी डॉ. कुलकर्णी यांनी मिळाली.
 
१९७५ मध्ये नाशिक व परिसरात फारसे उद्योगधंदे नव्हते. वैद्यकीय उपकरणे दुरुस्तीसाठी नाशिकमधील डॉक्टर्स पुणे, मुंबईवर अवलंबून असत. त्यामुळे वेळ वाया जाणे, सेवेत खंड येणे आदी समस्या प्रकर्षाने जाणवत होत्या. अशा वेळी असणारे अफाट ज्ञान, मात्र १९०० रुपये भांडवल, पक्कड, स्कू्रडायव्हर अशा मोजक्या साधनांनी डॉ. कुलकर्णी यांनी स्वतःचा उद्योग सुरू केला.
“नाशिककर आमचे पेशंट आहेत. मात्र, आम्ही सर्व डॉक्टर ओमप्रकाशचे पेशंट आहोत,” अशा शब्दांत तेव्हा नाशिकमधील डॉक्टर त्यांचा गौरव करत असत.
 
गुणवत्तापूर्ण कामामुळे डॉ. कुलकर्णी यांचा नावलौकिक नाशिक शहरात पसरला होताच. त्यामुळे त्यांना ऑर्डर मिळविण्याकामी कधीही प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागली नाही. इंडस्ट्री, वैद्यकीय व ऑटोमेशन अशा सर्वच क्षेत्राशी संबंधित उत्पादने डॉ. कुलकर्णी यांनी आजवर उत्पादित केली आहेत.
 
सदाशिवनगर जंक्शन (बंगळुरू) येथे भारतातील पहिले, तर नाशिक-औरंगाबाद मार्गावरील ‘दौलताबाद टी पॉईंट’ येथे राज्यातील पाहिले ‘सोलर ट्राफिक सिग्नल’ बनविण्याचे श्रेय डॉ. कुलकर्णी यांना जाते.
 
पुणे विद्यापीठाच्या ‘इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग’, ‘ईएनटीसी’, ‘इन्स्ट्युमेटेशन सायन्स’ या विषयांच्या अभ्यास मंडळाचे 25 वर्षे सदस्यपद त्यांनी भूषविले आहे. डॉ. वसंतराव गोवारीकर व डॉ. अशोक कोळस्कर हे कुलगुरू असताना त्यांचे प्रतिनिधी म्हणून देखील त्यांनी कार्य केले.
 
भारतीय क्षेपणास्त्र कार्यक्रमात घनइंधनाची समस्या होती. त्यावेळी अमेरिका योग्य ती मदत करत नव्हता. अशा वेळी स्मशानात वापरात येणारी राळ ही उपयुक्त ठरू शकते, असा विचार डॉ. कुलकर्णी यांनी मांडला. त्याला योग्य ती शास्त्रीय जोड देत, डॉ. गोवारीकर यांनी त्यात संशोधन केले. डॉ. गोवारीकर यांच्यामुळे भारत आज घनइंधनात स्वयंपूर्ण असल्याचे डॉ. कुलकर्णी आवर्जून नमूद करतात.
 
डॉ. कुलकर्णी यांनी आजवर १८ ‘पेटंट’ प्राप्त केली असून, पाण्यापासून ‘ऑक्सिजन’ तयार करण्याचे 19वे ‘पेटंट’ त्यांनी दाखल केले आहे. तसेच त्यांचे एक ‘पेटंट’ अमेरिकेतील ‘जनरल इलेक्ट्रिकल’, ‘यॉर्क’, ‘युनिटी ग्रुप ऑफ इंडिया’ आदी कंपन्यांना लायसेन्स करण्यास दिले आहे.
 
आपल्या अंगभूत बुद्धिमत्तेला योग्य दिशा देत व अविरत कार्याची साधना करत डॉ. कुलकर्णी यांनी आजवर हे यश संपादित केले आहे. त्यामुळे ते आजच्या तरुणांना विपरीत परिस्थितीत न डगमगता त्यातून संधी शोधत कार्य करण्याचा सल्ला देतात. तसेच ‘लोकल’ विचार न करता ‘ग्लोबल’ विचार करावा, असा तरुण उद्योजकांना उद्योगाचा कानमंत्र द्यायलाही ते विसरत नाहीत.
 
संशोधक वृत्तीने कार्य करणार्‍या आणि नावीन्यनिर्मितीचा ध्यास घेतलेल्या डॉ. ओमप्रकाश कुलकर्णी यांच्या कार्यास दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या शुभेच्छा!
 
 
@@AUTHORINFO_V1@@