चीनचा ‘उघूर’संहार

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    18-May-2021   
Total Views |

China_1  H x W:
 
चीनच्या शिनजियांग प्रांतातील लाखो उघुरांच्या अत्याचारावरून पाश्चिमात्य देशांकडून वारंवार चीनला खडे बोल सुनावले गेले. अमेरिकेने तर चीनवर व्यापारी निर्बंधही कडक केले. परंतु, चीनने आपल्या उघूर मुस्लिमांविरोधी मोहिमेत तिळमात्रही माघार घेतलेली नाही. अमेरिकेने उघुरांवरील या अमानवीय अत्याचारांना ‘नरसंहार’ म्हणून घोषितही केले. परंतु, अडेलतट्टू चीन उघुरांवर कोणत्याही प्रकारचा अन्याय-अत्याचार होत असल्याचे मुळी मान्यच करायला तयार नाही. अखेरीस संयुक्त राष्ट्रसंघाच्या व्यासपीठावरून गेल्याच आठवड्यात अमेरिका, ब्रिटन, जर्मनी यांनी एकत्रितपणे चीनला पुन्हा एकदा कडक शब्दांत उघुरांवरील मानवाधिकारांचे संरक्षण करण्याचा इशारा दिला. पण, त्यावेळीही चीनविरोधी अजेंड्याची ही ऑनलाईन बैठक घेतलीच जाऊ नये म्हणून चीनने अगदी थयथयाट केला. परंतु, संयुक्त राष्ट्रसंघाने चीनच्या या मागणीला भीक न घालता, ही बैठक पार पडली आणि पुन्हा एकदा कठोर शब्दांत चीनची कानउघाडणी करण्यात आली. खरंतर अशा कितीही बैठका, इशारे वा निर्बंध लादून चीन आपल्या उघुरांप्रतिच्या धोरणांत बदल करेल, याची सुतराम शक्यता नाहीच. त्यामुळे केवळ अमेरिकेलाच नाही, तर आंतरराष्ट्रीय समुदायाला, जागतिक व्यापार संघटनेलाही चीनविरोधी ठोस भूमिका घेऊन हे व्यापारी निर्बंध अधिकाधिक कडक करावे लागतील, ज्याची मोठी किंमत चीनला चुकवावीच लागेल. त्याचबरोबर ज्या ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ अर्थात ‘ओआयसी’ला पॅलेस्टिनींच्या जीवांची इतकी चिंता सतावते, त्यांनीही आता चीनला केवळ इशारे न देता, चीनची आर्थिक कोंडी करून दाखवावी. कारण, ‘ओआयसी’मध्ये एक-दोन नव्हे, तर तब्बल ५६ मुस्लीम राष्ट्रे आहेत. यापैकी खरंच किती राष्ट्रे उघुरांवरील अत्याचारांच्या मुद्द्यावरून, ‘उम्मा’ची दुहाई देत चीनविरोधी आज उभी राहतील? तर उत्तर आहे, एकही नाही!
 
 
एका अहवालानुसार, आजवर तब्बल दहा लाख उघूर आणि अन्य मुसलमानांना चीनने ताब्यात घेतले आहे. उद्देश हाच की, त्यांनी इस्लामचा त्याग करावा; अन्यथा त्यांना चीनमध्ये जगण्याचा अधिकार नाही. चीन या शिबिरांना प्रशिक्षण शिबिराचे गोंडस नाव देत असला तरी ते तुरुंगापेक्षा किंवा एखाद्या छळछावणीपेक्षा नक्कीच कमी नाही. यासंबंधी कित्येक उघुरांचे अनुभवही आंतरराष्ट्रीय माध्यमांमधून वेळोवेळी प्रकाशझोतात आले, जे अंगावर काटा आणणारे आहेत. याचाच एक भाग म्हणजे ‘उघूर राईट्स ग्रुप’चा समोर आलेला एक नवीन धक्कादायक अहवाल. या अहवालानुसार, २०१४पासून आजपर्यंत ६३० मौलवी आणि अन्य इस्लाम धर्मप्रसारकांना चीनने तुरुंगात डामले आहे. त्यातच यापैकी १८ मौलवींचा त्यानंतर मृत्यू झाल्याचेही हा अहवाल अधोरेखित करतो. ‘उघूर मानवाधिकार प्रोजेक्ट’ अर्थात ‘युएचआरपी’ने अशा १,०४६ मौलवींची विविध माध्यमातून माहिती काढली. त्यातून एक बाब समोर आली की, या सर्व मौलवींना कधी ना कधी चिनी सरकारने ताब्यात घेतले होते. त्यातल्या त्यात ३०४ मौलवींना कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली. शिक्षा काही एक-दोन महिन्यांची नाही, तर किमान पाच वर्षांपासून ते आजन्म कारावासाची. आता या मौलवींचा गुन्हा काय? गुन्हा हाच की, त्यांनी इस्लामचा प्रचार-प्रसार केला, निकाह लावून दिले आणि धर्माचे शिक्षण दिले. यावरून अंदाज बांधता येतो की, चीनला मुळात त्यांच्या धर्म आणि संस्कृतीव्यतिरिक्त अन्य धर्म, चालीरीती कदापि मंजूर नाहीत, म्हणूनच मोठ्या संख्येने उघूर मुसलमानांना तुरुंगात टाकण्याबरोबरच इस्लामच्या प्रचार-प्रसारकांवरच चीनने आपले लक्ष्य केंद्रित केलेले दिसते. जेणेकरून इस्लामची शिकवण उघुरांना मिळू नये व त्यांनी इस्लामपासून परावृत्त व्हावे. यावरूनच चीनची धार्मिक असहिष्णुता आणि इस्लामद्वेष प्रकर्षाने अधोरेखित होतो.
 
 
याव्यतिरिक्त मुसलमान महिलांचे बलात्कार, अपहरण, उघुरांच्या मशिदी-वस्त्या जमीनदोस्त करणे, त्यांना सरकारी सवलती-मदत नाकारणे यांसारख्या अनेक मार्गांचा वापर करून चीन उघुरांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. अशा या बंदिस्त लालशाहीच्या देशात विरोधाला मुळी स्थानच नाही आणि जे विरोध करतात, त्यांची कत्तल ही ठरलेली. तेव्हा, चीनच्या या अमानवीय जुलुमांवर कायमस्वरूपी निर्बंध लावायचे असतील तर संयुक्त राष्ट्रांसकट सर्व देशांना जात-धर्म सोडून खर्‍या अर्थाने मानवाधिकारांसाठी एकत्र यावे लागेल आणि मोठा दबाव निर्माण करून चीनच्या या कुकृत्यांना पूर्णविराम लावावा लागेल. तसे झाले नाही तर पुढील काही वर्षांत उघुरांचे चीनमध्ये नामोनिशाण उरणार नाही, हे वेगळे सांगण्याची गरज नाहीच!
@@AUTHORINFO_V1@@