नकारात्मकतेच्या वातावरणात प्रेरणादायी सकारात्मकता!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    17-May-2021   
Total Views |

RSS_1  H x W: 0
 
 
देशातील नकारात्मक वातावरणात सकारात्मकतेने अनुकरण करण्याचे जे आवाहन विविध मान्यवरांनी संपूर्ण समाजास केले आहे, ते लक्षात घेऊन जिंकेपर्यंत थांबायचे नाही असा निश्चय आणि त्याला अनुरूप अशी कृती सर्व देशबांधव करतील, अशी अपेक्षा...
कोरोना महामारीविरुद्ध संघर्ष करण्यासाठी संपूर्ण देश एकवटला असताना आणि केंद्र सरकार, राज्य सरकार आणि विविध सामाजिक संघटना प्रयत्न करीत असताना काही राजकीय नेते सरकारच्या प्रयत्नांमध्ये हेतुपुरस्सर बाधा आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. सरकार महामारीवर नियंत्रण प्रस्थापित करीत असताना केंद्र सरकारवर खोटेनाटे आरोप करून त्या सरकारची बदनामी कशी होईल, असा प्रयत्न या राजकीय नेत्यांकडून आणि त्यांच्या राजकीय पक्षांकडून केला जात आहे. अलीकडेच देशातील १२ राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अलीकडेच एक पत्र लिहून त्यांच्याकडे काही मागण्या गेल्या आहेत. या पत्रावर ज्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनी स्वाक्षर्‍या केल्या, त्या पाहता या नेत्यांचा राजकीय हेतू काही वेगळाच असल्याचे लगेचच दिसून आल्यावाचून राहत नाही. या राजकीय पक्षांना कोरोना महामारीचे उच्चाटन करण्यापेक्षा भारतीय जनता पक्षास सत्तेवरून कसे पायउतार करता येईल, यातच अधिक रस असल्याचे त्या पत्रावरून दिसून येत आहे. गेल्या मार्च महिन्यामध्ये कोरोना महामारीचे संकट कोसळल्यानंतर मोदी सरकारने ही महामारी रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना, जनतेची उपासमार होऊ नये म्हणून उचललेली पावले, अर्थचक्राची गती खंडित होऊ नये म्हणून केलेल्या उपाययोजना यापैकी कशाचेही कौतुक करावे, असे या राजकीय पक्षांना आतापर्यंत वाटलेले नाही. पुढेही वाटण्याची शक्यता नाही. ज्या १२ राजकीय पक्षांच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे, त्यावर काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी, माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बनर्जी, अलीकडेपर्यंत भाजपसमवेत सत्तेचा उपभोग घेणारे आणि आता त्या पक्षाशी उभा दावा मांडलेले शिवसेना पक्षप्रमुख आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टालिन, पंतप्रधांनांविरुद्ध असभ्य भाषा वापरणारे झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, समाजवादी पक्षाचे अखिलेश यादव, ‘नॅशनल कॉन्फरन्स’चे फारूख अब्दुला, साम्यवादी नेते डी. राजा आणि मार्क्सवादी नेते सीताराम येचुरी यांनी स्वाक्षर्‍या केल्या होत्या. ही नावे नुसती वाचली तरी या राजकीय नेत्यांचा हेतू शुद्ध नसल्याचे आणि मोदी सरकारची राजकीय कोंडी कशी करता येईल, असा त्यांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते.
 
 
या नेत्यांनी कोरोना महामारीचे उच्चाटन करण्यासाठी देशातील सर्व जनतेला लस पुरविण्याची मागणी केली आहे. ती मागणी गैर नाही. पण, सरकार जणू काही हातावर हात ठेवून गप्प बसल्याचे गृहीत धरून ही मागणी केल्याचा वास त्यास येत आहे. महामारीच्या संकटात सापडलेल्यांना विविध प्रकारची मदत करण्याची मागणीही या पत्रामध्ये केली आहे. पण, सरकार गेल्या वर्षीपासून जनतेला मदत करण्यासाठी सर्व ती पावले उचलत असल्याचे या राजकीय पक्षांच्या नेत्यांना माहीत नाही काय? विरोधकांनी जी एक मागणी केली आहे ती सरळ सरळ केंद्र सरकारला बदनाम कारण्याच्या हेतूने केली असल्याचे दिसून येत आहे. संसदेची विद्यमान इमारत जुनी झाल्याने नवीन संसद भवन उभारण्याची शिफारस काँग्रेसचे सरकार दिल्लीत सत्तेवर असताना करण्यात आली होती. मोदी सरकारने त्या दिशेने पावले टाकून नवीन आराखडा तयार केला आणि प्रत्यक्ष कामकाजाला प्रारंभही केला. या कामामध्ये संसद भवनासह पंतप्रधानांच्या नव्या निवासस्थानाचाही समावेश आहे. दिल्लीतील ‘सेंट्रल व्हिस्टा’चा हा परिसर विकसित करण्यासाठी आवश्यक ती तरतूद करण्यात येऊन हे सर्व काम सुरु करण्यात आले आहे. पण, तेच काम विरोधकांच्या डोळ्यांमध्ये सलत आहे. त्या कामाकडे जनतेचे लक्ष वेधून, पंतप्रधानांना ‘कोविड’ महामारीऐवजी आपल्या निवासस्थानाचीच चिंता जास्त असल्याचे भासविण्याचा विरोधकांचा प्रयत्न असल्याचे दिसून येते. ‘सेंट्रल व्हिस्टा’ विकसित करण्याचे काम थांबविण्यात यावे आणि त्यासाठीचा पैसा कोरोना महामारीचे निराकरण करण्यासाठी वापरण्यात यावा, अशी विरोधकांची मागणी आहे. खरे म्हणजे विरोधकांनी ही मागणी ओढूनताणून कोरोना महामारीशी जोडल्याचे दिसून येते. हे दोन्ही विषय पूर्णपणे वेगळे आहेत, हे विरोधकांनाही माहीत आहे. पण, या निमित्ताने मोदी सरकारची बदनामी करण्याची संधी मिळतेय तर ती का सोडा, असा हेतू त्यामागे असल्याचे दिसून येत आहे.
 
 
तसेच कोरोना महामारीच्या दुसर्‍या लाटेमध्ये जी काहीशी चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली, त्यातून बाहेर पडण्यासाठी शासनास मदत करण्याऐवजी ही स्थिती किती भयावह आहे, असे चित्र रंगविण्याचा प्रयत्न झाला. विदेशी प्रसार माध्यमांनीही त्यास हातभार लावला. ज्या भारताने कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जगातील अनेक देशांना लसपुरवठा केला, त्या भारताची बदनामी करण्यास या माध्यमांनी मागेपुढे पाहिले नाही. कोरोना महामारीचे जागतिक संकट दूर करण्यासाठी भारतास मदत करण्याऐवजी भारतात रात्रंदिवस चिता कशा धगधगत आहेत, याची छायाचित्रे आणि वृत्ते छापण्यात या माध्यमांनी धन्यता मानली! भारतातील प्रसिद्धी माध्यमेही त्यास अपवाद नव्हती. या भीषण संकटामध्ये लोकांना धीर द्यायचा की अधिक घाबरवून टाकायचे, याचे साधे तारतम्यही काही माध्यमांना राहिले नाही. आपल्या देशातील काही प्रसारमाध्यमे तर या महामारीचे निमित्त करून मोदी सरकारची बदनामी करण्याचा प्रयत्न करताना दिसून आली. मोदी विरोधकांकडून सुपारी घेतल्यासारखे त्या माध्यमांचे वर्तन असल्याचे दिसून आले आणि अजूनही दिसून येत आहे.
 
 
देशात अशी स्थिती असताना देशातील जनतेमध्ये सकारात्मकता निर्माण करण्याचा एक अत्यंत चांगला उपक्रम राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेतून हाती घेण्यात आला. या ‘पॉझिटिव्हिटी अनलिमिटेड’ उपक्रमांतर्गत राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, ‘कोविड रिस्पॉन्स टीम’ आणि राजधानी दिल्लीतील नागरी समूहांनी पाच दिवसांच्या व्याख्यानमालेचे आयोजन नुकतेच केले होते. या व्याख्यानमालेत सद्गुरू जग्गी वासुदेव, जैन मुनी मुनीश्री प्रमाणसागर, ‘आर्ट ऑफ लिव्हिंगचे श्री श्री रविशंकर, ‘विप्रो’चे अझीम प्रेमजी, विवेकानंद केंद्राच्या अ. भा. उपाध्यक्ष निवेदिता भिडे, शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती, प्रख्यात कलाकार सोनल मानसिंह, साध्वी ऋतंभरा, महंत ज्ञानदेव सिंह यांनी सकारात्मकता का महत्त्वाची आहे, याचे महत्व पटवून दिले. या पाच दिवसांच्या व्याख्यानमालेचा समारोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांनी केला. सध्याच्या नकारात्मक वातावरणात सकारात्मक राहणे, हाच रामबाण उपाय असल्याचे प्रतिपादन सरसंघचालकांनी केले. या संकटकाळात संघाचे स्वयंसेवक समाजाच्या गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न करीत असल्याचे डॉ. भागवत यांनी सांगितले. जोवर या संकटावर विजय मिळत नाही, तोपर्यंत लढायचे आहे, असे सर्वांना प्रेरणा देणारे विचार सरसंघचालकांनी व्यक्त केले. वर्तमान परिस्थिती काहीशी निराशाजनक असली, तरी त्या परिस्थितीमध्ये आपणास नकारात्मक होऊन चालणार नाही आणि मनातही नकारात्मक विचार येऊ द्यायचे नाहीत. वर्तमानकाळ निराश होण्याचा नाही तर लढण्याचा आहे, असे प्रेरणादायी विचार डॉ. भागवत यांनी व्यक्त केले. या कठीण काळामध्ये रिकामे बसू नका, काही तरी नवीन शिका, कुटुंबीयांशी संवाद कायम ठेवा, कोरोना रोखण्यासाठीच्या सर्व निर्बंधांचे पालन करा, असे आवाहनही सरसंघचालकांनी केले. या परिस्थितीत आघात सहन करून, धैर्याने सतत प्रयत्नरत राहून पुढे जाण्याचा संकल्प केल्यास आम्ही जिंकूच हे निश्चित आहे, असे प्रेरक प्रतिपादन सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केले. देशातील नकारात्मक वातावरणात सकारात्मकतेने अनुकरण करण्याचे जे आवाहन विविध मान्यवरांनी संपूर्ण समाजास केले आहे, ते लक्षात घेऊन जिंकेपर्यंत थांबायचे नाही असा निश्चय आणि त्याला अनुरूप अशी कृती सर्व देशबांधव करतील, अशी अपेक्षा करण्यास काहीच हरकत नाही!
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@