प्रशिक्षक आणि खेळाडू यांच्यातील वाद काही क्रिकेटविश्वात नवे नाहीत. क्रिकेट खेळणार्या प्रत्येक देशात खेळाडू आणि प्रशिक्षक यांच्यातील अनेक वादाचे प्रसंग आत्तापर्यंत ऐकिवात आहेत. क्रिकेटवेड्या भारतातही वेळोवेळी असे अनेक प्रसंग समोर आले आहेत. भारताचे माजी फिरकीपटू रमेश पोवार यांची भारतीय महिला संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी पुन्हा एकदा नियुक्ती झाली आणि गेल्या काही दिवसांपूर्वी शमलेला वाद आता पुन्हा एकदा पेटण्यास सुरुवात झाली. पोवार यांची नियुक्ती होताच काही खेळाडूंनी या नियुक्तीला उघडपणे विरोध करण्यास सुरुवात केली. इतकेच नव्हे, तर रमेश पोवार यांची नियुक्ती करण्यात आल्यानंतर माजी प्रशिक्षक डब्ल्यू. व्ही. रामन यांनी तर भारतीय महिला क्रिकेटचे भवितव्य अंधारात असून यासाठी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष सौरव गांगुली यांना याबाबत पत्रदेखील लिहिले. प्रशिकपदाच्या नियुक्तीपदावरून सुरु झालेला हा वाद आता विकोपाला पोहोचल्यानंतर संपूर्ण क्रिकेटविश्वात सध्या याच वादाची चर्चा रंगली आहे. मात्र, हा वाद विकोपाला जाण्याआधीच शमवणे गरजेचे असल्याचे मत क्रिकेट समीक्षक नोंदवतात. समीक्षकांच्या मते, भारतासारख्या देशात क्रिकेट प्रशिक्षकांची कमी नाही. अनेक नामवंत आणि प्रतिभाशाली प्रशिक्षक या देशात उपलब्ध आहेत. अनेक प्रशिक्षक संधी मिळण्याच्या प्रतीक्षेत असतात. काही जणांना भारताकडून संधी न मिळाल्यामुळे अनेकांनी परदेशातही जाऊन तेथील खेळाडूंना प्रशिक्षण दिले आहे. त्यामुळे क्रिकेटवेड्या भारतात काही प्रशिक्षकांची कमी नाही. राहिला प्रश्न रमेश पोवार यांची या पदी पुर्ननियुक्ती करण्याचा, तर याआधीही महिला क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती झाली होती. मात्र, भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राजसोबत काही मुद्द्यावरून मतभेद झाल्यामुळे रमेश पोवार यांना मुदतवाढ देण्यात आली नव्हती. तेव्हादेखील कर्णधार मिताली राज होती अन् आताही. क्रिकेट जगतातील जाणकारांच्या मते रमेश पोवार आणि मिताली राज यांच्यातील जुना वाद काही शमलेला नाही. त्यांच्यातील मतभेद कायम आहेत. त्यामुळे आगामी काळातही येथे खटके उडण्याची शक्यता कायम आहे. नियुक्तीपदावरून सुरु झालेला हा वाद म्हणजे फक्त ‘ट्रेलर’ आहे. संपूर्ण पिक्चर अद्याप बाकी असल्याचे मत क्रिकेट समीक्षक नोंदवतात.
‘पिक्चर’ अभी बाकी हैं...!
केवळ भारतीय महिला क्रिकेट संघातच प्रशिक्षकपदाच्या नियुक्तीवरून वाद उद्भवला असे नाही. भारतीय पुरुष संघातही आत्तापर्यंत अनेकदा वाद उद्भवल्याचा इतिहास आहे. आजही भारतीय संघास महत्त्वाच्या सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागल्यानंतर अनेकदा आधी प्रशिक्षक बदलण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जाते. भारतीय पुरुष संघाचे विद्यमान प्रशिक्षक रवी शास्त्री यांची प्रशिक्षकपदी नियुक्ती केल्यानंतरही वाद उद्भवला होता. रवी शास्त्री यांना प्रशिक्षकपदावर मुदतवाढ देण्यात आल्यानंतर अनेकांनी याबाबत आपला आक्षेप नोंदवला होता. त्यांच्या जागी अन्य व्यक्तींना प्रशिक्षकपदी संधी मिळण्याची गरज असल्याचे मत अनेक समीक्षकांनी नोंदवले होते. रवी शास्त्री यांच्याआधी भारतीय कसोटी संघाचे माजी कर्णधार आणि अनुभवी फिरकीपटू अनिल कुंबळे यांची या पदासाठी नियुक्ती करण्यात आली होती. अनिल कुंबळे आणि भारतीय संघाचा विद्यमान कर्णधार विराट कोहली यांच्यात काही कारणांमुळे बिनसल्याची चर्चा क्रिकेटविश्वात होती. त्यामुळे कुंबळे यांची भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदावरून गच्छंती झाल्याचे बोलले जाते. कुंबळे यांच्यानंतर प्रशिक्षकपदासाठी अनेक नावे चर्चेत होती. मात्र, याजागी कुणाच्याही नावाची निवड न करता रवी शास्त्री यांच्याच नावाची पुन्हा एकदा वर्णी लागली. विशेष म्हणजे, कुंबळे यांच्या आधी रवी शास्त्रीच भारतीय मुख्य संघाच्या प्रशिक्षकपदी विराजमान होते, हे विशेष. मात्र, परदेशांमधील मालिकांमध्ये भारताला वारंवार पराभवाचा सामना करावा लागल्यानंतर त्यांना या पदावरून हटविण्यात आले होते. त्यानंतर त्यांच्याजागी कुंबळे यांची नियुक्ती करण्यात आली होती. परंतु, कुंबळे यांच्यानंतर पुन्हा एकदा रवी शास्त्री यांनाच या पदासाठी निवडण्यात आले. कर्णधार विराट कोहली आणि रवी शास्त्री यांच्यात चांगला ताळमेळ असल्यामुळे रवी शास्त्री यांना पुन्हा एकदा भारतीय संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्त करण्यात आल्याचे बोलले जाते. या दोघांचे चांगले जमत असल्यामुळेच रवी शास्त्री यांना प्रशिक्षकपदासाठी मुदतवाढही मिळाल्याचे सांगण्यात येते. मात्र, महिला संघाच्या बाबतीत नेमके उलटे आहे. कर्णधार मिताली राज आणि रमेश पोवार यांच्यात मतभेद असल्यामुळे ही नियुक्ती कितपद योग्य ठरेल, याबाबत साशंकता असल्याचे मत क्रिकेट समीक्षकांचे आहे. कर्णधार आणि प्रशिक्षक यांच्यातच समतोल ताळमेळ नसेल, तर याचा परिणाम संपूर्ण संघाच्या कामगिरीवर होतो. त्यामुळे या दोघांमधील मतभेद दूर करणे गरजेचे असल्याच्या मुद्द्याकडे क्रिकेट समीक्षक लक्ष वेधतात.
- रामचंद्र नाईक