पुणे : एक सुसंस्कृत व्यक्तीमत्व खासदार राजीव सातव यांनी जगाचा निरोप घेतला. स्वपक्षीयांच्या भूमिकेला विरोध न करता इतरांच्या भूमिकांचे स्वागत करणारा दिलदार आणि धाडसी नेता, अशी ओळख त्यांनी आपल्या इतक्या वर्षांच्या राजकीय कारकिर्दीत कमावली. २०१६ ते २०१९ सलग चार वर्षे संसदरत्न पुरस्काराने गौरविण्यात येणारा उत्तम संसदपटू महाराष्ट्राने गमावला. सोबतच अनेकांच्या मदतीला धावून येणारा दिल्लीतील हक्काचा आपला माणूस, गेल्याची भावना राजकीय वर्तूळात व्यक्त केली जात आहे.
राज्यसभा खासदार आणि काँग्रेसचे नेते राजीव सातव यांचे दि.१५ मे रोजी पहाटेच्या सुमारास पुण्यातील जहांगीर रुग्णालयात निधन झाले. सातव गेल्या २३ एप्रिलपासून कोरोना संक्रमित होते. कोरोना संक्रमण झाल्यानंतर उपचाराअंती सातव यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा होत होती. त्यांची कोरोना चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. लवकरच त्यांना डिस्चार्ज देण्यात येईल, असेही सांगण्यात आले होते. मात्र, सातव यांना सायटोमॅजिलो विषाणूची लागण झाली होती. याला सीएमई न्यूमोनिया संसर्ग म्हणतात.
या संसर्गामुळे त्यांची प्रकृती पुन्हा खालावू लागली. त्यामुळे त्यांना पुन्हा एकदा व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. रविवारी पहाटे चार वाजताच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. ४५ वर्षीय राजीव सातव हे अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) गुजरातचे प्रभारी होते, तर काँग्रेसच्या कार्यकारी समितीचे निमंत्रक होते. राजीव सातव यांच्या मातोश्री रजनी सातव काँग्रेसच्या आमदार होत्या.
शिवसेनेचे माजी खासदार सुभाष वानखेडेंना पराभूत करुन राजीव सातव २०१४ मध्ये लोकसभा निवडणुकीत हिंगोलीतून खासदारपदी निवडून आले होते. राजीव सातव यांच्या नेतृत्वात काँग्रेसने २०१७ मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीत चांगले यश मिळवलं होते. फेब्रुवारी २०१० ते डिसेंबर २०१४ या काळात त्यांनी भारतीय युवा काँग्रेसचे अध्यक्षपदही भूषवले होते. काँग्रेस पक्ष आणि गांधी घराण्यावर असलेल्या निष्ठेमुळे त्यांचं पक्षात वजन होते. याशिवाय ते थेट राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्याशी कोणत्याही मुद्द्यांवर संपर्कात होते.
सातव यांचे पार्थिव रुग्णवाहिकेतून हिंगोली जिल्ह्याकडे रवाना करण्यात आले. यावेळी रुग्णालयाबाहेर सातव यांच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. राजीव सातव यांच्या निधनामुळे कार्यकर्त्यांना दुःख अनावर झाल्याचे दृश्य यावेळी रुग्णालयाबाहेर पाहायला मिळाले. राजीव सातव यांच्या पार्थिवावर त्यांच्या मुळगावी हिंगोली जिल्ह्यातील कंळमनुरी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. प्रत्येकाशी मैत्री ठेवत, पक्षीय चौकटीच्या पलीकडे जाऊन संबंध ठेवणारे एक उमदे आणि अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणजे श्री राजीव सातव.
संसदेतील एक चांगला मित्र गावल्याची भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सातव यांच्या निधनानंतर व्यक्त केली आहे. उभरते नेतृत्व आणि उत्तम क्षमता असलेले व्यक्तीमत्व सातव यांचे होते. त्यांच्या कुटूंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत, अशा भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केल्या आहेत.
युवा नेते आणि खासदार राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त ऐकून अतीव दुःख झाले. राजीवजी यांनी अतिशय कमी वयात देशाच्या राजकारणावर पाडलेली छाप कौतुकास्पद होती. त्यांच्या अकाली निधनाने महाराष्ट्राच्या राजकीय क्षेत्राची फार मोठी हानी झाली आहे. ईश्वर दिवंगत आत्म्यास शांती देवो आणि त्यांच्या परिवारास हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. ॐ शांती. --- नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री
काँग्रेसचे नेते आणि काँग्रेस कार्यकारी समितीचे निमंत्रक राजीव सातव यांच्या निधनाचे वृत्त धक्कादायक आहे. महाराष्ट्रातील तरुण, तडफदार आणि अभ्यासू नेतृत्व अशी त्यांची ओळख होती. गुजरातमधील निवडणुकांमध्ये काँग्रेस पक्षाने सोपवलेली प्रभारीपदाची जबाबदारी समर्थपणे सांभाळत पक्षाला चांगले यश मिळवून देण्याची भूमिका त्यांनी पार पाडली. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील एका उमद्या नेतृत्वाचा अकाली अस्त झाला आहे -
- शरद पवार, राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष
जनहिताच्या अनेक प्रश्नात आम्ही एकत्रित येऊन संघर्ष केला आहे. त्यांचे असे अकस्मात आपल्यातून निघून जाणे अतिशय वेदनादायी आहे. - देवेंद्र फडणवीस, विरोधी पक्षनेते
खासदार राजीव सातव यांच्या निधनाबद्दल महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. तरुण व तडफदार खासदार राजीव सातव यांच्या अकाली निधनाचे वृत्त समजून व्यथित झालो. श्री सातव करोनावर मात करून लवकरच बाहेर येतील असे वाटत असतानाच ही दुखद बातमी आली. श्री सातव यांचेकडे नेतृत्वगुण व संघटन कौशल्य होते. त्यांचा जनसंपर्कही व्यापक होता. दुर्दैवाने काळाने एक मोठी क्षमता असलेले नेते आपल्यातून हिरावून नेले आहे. त्यांच्या आत्म्यास प्रभुचरणांजवळ स्थान मिळो ही प्रार्थना करतो व आपल्या शोकसंवेदना त्यांच्या कुटुंबियांना व चाहत्यांना कळवतो असे राज्यपाल कोश्यारी यांनी आपल्या शोकसंदेशामध्ये म्हटले आहे.