ठाण्यात लसीकरणाचे खाजगीकरण

    14-May-2021
Total Views |

Thane _1  H x W
ठाणे : कोविडचा संसर्ग रोखण्यासाठी व्यापक लसीकरण मोहिम राबवण्याच्या नावाखाली लसीकरणाच्या खाजगीकरणाला सहमती मिळाली आहे.याद्वारे रूग्णालयांशी संलग्नता प्रस्थापित केलेल्या शहरातील विविध आस्थापना आणि गृहसंकुलांना लसीकरणाची परवानगी देणारे धोरण महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी शुक्रवारी जाहिर केले.

ठाणे शहरातील पात्र लाभार्थींचे लसीकरण वेगाने व्हावे आणि तिस-या लाटेच्या पार्श्वभूमीवर लसीकरणाची व्यापकता वाढविण्यासाठी ठाणे महापालिकेने हे धोरण निश्चित केले आहे.या धोरणांतर्गत विविध कार्यालये, गृहसंकुले यांना त्यांनी कोणत्याही रूग्णालयाशी संलग्नता प्रस्थापित केल्यानंतर लसीकरणासाठी महापालिकेच्या माध्यमातून कोविन प्लॅटफॉर्मवर नोंदणी आवश्यक आहे.लसीकरणाचे लाभार्थी हे शासनाच्या धोरणानुसार निश्चित करण्यात येणार आहेत.लसींचा अपव्यय टाळण्यासाठी लाभार्थ्यांची संख्या दहा आणि त्यापटीत असणे आवश्यक असुन लसीकरणाचा साठा उपलब्ध करुन घेण्याची जबाबदारी ही संपूर्णतः संबधित आस्थापनांचा राहणार आहे.तसेच,लसीसाठी किती शुल्क आकारायचे यावर बंधने नाहीत.

... तरच लसीकरणाची मूभा

खासगी कार्यालये,गृहसंकुलांना लसीकरणासाठी परवानगी देताना त्याठिकाणी प्रतिक्षाकक्ष,लसीकरण कक्ष आणि निरीक्षण कक्षाची सुविधा असणे आवश्यक आहे.तसेच त्याठिकाणी डॉक्टर्स, स्टाफ नर्स, डेटा एन्ट्री ॲापरेटर,इतर आरोग्य कर्मचारी,इंटरनेट,फर्निचर, रूग्णवाहिका,औषधे आदी सुविधा असल्याची खातरजमा महापालिकेच्या वैद्यकिय आरोग्य अधिकाऱ्यांमार्फत केल्यानंतरच लसीकरणासाठी मुभा देण्यात येणार आहे.शिवाय लाभार्थ्यांची नोंदणी कोविन ॲपवर करण्याची जबाबदारी संबंधित आस्थापनांची राहणार असून लसीकरणानंतर एखाद्यास काही लक्षणे आढळल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी 'त्या' आस्थापनांची,गृह संकुलांची राहणार आहे.