'जयंत पाटील शांत उलट मीच तापट स्वभावाचा' : अजित पवार

    14-May-2021
Total Views |

ajit pawar_1  H


पुणे :
"जयंत पाटील शांत स्वभावाचे आहेत, मीच उलट तापट स्वभावाचा आहे. त्यामुळे मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील राज्याच्या मुख्य सचिवांवर संतापले या बातम्यांमध्ये तथ्य नाही. काही वेळा महत्वाच्या विषयांवरुन लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी असे केले जाते." असे स्पष्टीकरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर संतापल्याच्या वृत्तावर दिले आहे.



पुण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले,"मी नाराजी स्पष्टपणे तोंडावर सांगतो. मला कोणत्या अधिकाऱ्याला बोलायचे झालेच तर त्याला बाजूला घेऊन नाराजी सांगेन. जर विषय माझ्या पक्षाच्या नेत्याबद्दल तर तेच उत्तर देतील. परंतु जयंत पाटील सीनियर नेते आहेत. जयंत पाटील यांनी अनेक खात्यांची जबाबदारी सांभाळली आहे. जयंत पाटील हे अधिकाऱ्यांशी सौजन्याने वागतात. ते गृहमंत्री, ग्रामविकास मंत्री होते. त्यांना अधिकाऱ्यांशी कसे वागायचे हे चांगले माहीत आहे. त्यामुळे पाटील आणि कुंटे यांच्यातील वादात काही तथ्य नाही. मीच उलट तापट स्वभावाचा आहे, कडक बोलणारा. ते माझ्या उलट स्वभावाचे आहेत. ज्या बातम्या आल्या आहेत त्यामध्ये तथ्य नाही, असे स्पष्टीकरण अजित पवारांनी दिले.


प्रकरण नेमके काय ?


राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत जलसंपदा मंत्री जयंत पाटील राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्यावर संतापले असल्याचे वृत्त होते. मंत्रिमंडळ बैठकीत मंजूर झालेल्या जलसंपदा विभागाची कामांची फाईल मुख्य सचिवांनी पुन्हा वित्त विभागाकडे पाठवल्यामुळे जयंत पाटील नाराज झाल्याचं म्हटलं जात होतं. मंत्रिमंडळ बैठकीत जलसंपदा विभागाचा प्रस्ताव मंजूर झालेली असताना ती फाईल वित्त विभागाकडे पाठवल्याने जयंत पाटील यांनी जाहीरपणे मुख्य सचिवांबद्दल नाराजी केली. इतकंच नाही तर नाराज जयंत पाटील यांनी 'असं असेल तर जलसंपदा विभागचं बंद करुन टाका', असे संतप्त वक्तव्यही केले. याशिवाय मंत्रिमंडळाच्या बैठकीत मंजूर केलेल्या कामांबद्दल असे होत असेल तर मंत्रिमंडळाच्या वर कोण आहे का? असा सवालही जयंत पाटील विचारला.