मुंबई : राज्यातील कोरोना लसींच्या तुटवड्यामुळे लसीकरण मोहिमेवर परिणाम होताना दिसत आहे. यातच आता महाराष्ट्रासह अनेक राज्यांनी जागतिक निविदा काढण्याची तयारी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर भाजपचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकावर टीका केली आहे. जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का ? अशी प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर लसीकरणावर भर दिला जात आहे. लसीकरणाची गती वाढवण्याचा प्रयत्न राज्य सरकार आणि मुंबई महापालिकेकडून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेने कोरोना लसींसाठी ग्लोबल टेंडर काढले आहे. या टेंडरद्वारे सुमारे एक कोटी लसीच्या डोसची मागणी करण्यात येत आहे. यावरून भाजपचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. यासंदर्भात प्रवीण दरेकर यांनी एक ट्विट केले आहे. दरेकर म्हणतात,"महाविकास आघाडी सरकार ग्लोबल टेंडरकरता केंद्राकडे परवानगी मागते आहे आणि त्याचवेळी महापालिकेला स्वतः मंजुरी देतेय? यांचं गौडबंगाल काही कळत नाही! जनतेला दाखवण्याकरता टेंडरचा फक्त फार्स सुरू आहे का ?", अशी विचारणा प्रवीण दरेकर यांनी केली आहे. महाराष्ट्र, दिल्ली, कर्नाटक आणि तेलंगणा यांसह काही राज्यांनी कोरोना लसींसाठी जागतिक निविदा काढण्याचा पर्याय स्वीकारला आहे. कोरोना लसींच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
कोरोना लसीसाठी ग्लोबल टेंडर काढणारी मुंबई महापालिका पहिली आहे. १८ मे ही टेंडर भरण्याची शेवटची तारीख असेल. वर्क ऑर्डर पूर्ण झाल्यानंतर कंपन्यांना ३ आठवड्यात लसींचा साठा द्यावा लागेल. तसंच त्यांना ICMR आणि DGCI च्या नियमावलीचे पालनही करावे लागेल. गरज भासल्यास त्यांना कोल्ड स्टोरेजची व्यवस्था करावी लागेल. कोरोना लसींची परिणामकारकता टेंडरच्या नियम व अटीनुसार ६० टक्क्यांपेक्षा कमी असता कामा नये. तसेच आम्ही त्यांना कोणतेही आगाऊ पेमेंट करणार नाही. कंपन्या वेळेत लस देऊ शकल्या नाहीत तर आम्ही त्यांना दंड करू, अशी माहिती मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिली आहे.