नवी दिल्ली : धैर्य आणि साहस हे भारतीय समाजाचे वैशिष्ट्य असून त्याद्वारेच करोनाविरोधी लढ्यात भारतीय समाज विजयी होईल, अशी आशा शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती यांनी ‘हम जितेंगे-पॉझिटीव्हीटी अनलिमिटेड’ या ऑनलाईन व्याख्यानमालेच्या तिसऱ्या सत्रात गुरूवारी केले. दरम्यान, व्याख्यानमालेच्या आजच्या सत्रात (शुक्रवार) पंचायती आखाडा-निर्मलचे पीठाधीश महंत ज्ञानदेवसिंग आणि साध्वी ऋतंभरादेवी संबोधित करणार आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रेरणेने कोव्हिड रिस्पॉन्स टीम, धार्मिक आणि सामाजिक संघटना व सर्वसामान्य नागरिकांनी हम जितेंगे-पॉझिटीव्हीटी अनलिमिटेड या विशेष ऑनलाईन व्याख्यानमालेचे आयोजन केले आहे. करोना काळात मनातील नकारात्मकता दूर व्हावी, या हेतूने ही व्याख्यानमाला आहे. व्याख्यानमालेच्या तिसऱ्या दिवशी कांची कामकोटी पीठाचे शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती आणि ज्येष्ठ कलाकार, पद्मविभूषण सोनल मानसिंह यांनी संबोधित केले. व्याख्यानमालेचा समारोप १५ मे रोजी रा. स्व. संघाचे सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत यांच्या संबोधनाने होणार आहे.
शंकराचार्य विजयेंद्र सरस्वती म्हणाले, संपूर्ण जगात करोना महामारीमुळे संकटाची स्थिती निर्माण झाली आहे. भारतातही वर्षभरानंतर पुन्हा एकदा हे संकट आले आहे. मात्र, या काळात देशातील नागरिकांनी संकटमोचक हनुमंतांचे एक वाक्य नेहमी लक्षात ठेवावे. ते म्हणजे ज्यावेळी संकट येते त्यावेळी आपले मनोधैर्य आणि हिंमत कधीही सोडू नये, कारण त्यातूनच विजयाचा मार्ग प्रशस्त होत असतो. त्याचप्रमाणे भारतीय समाजाने आपले आचरण ठेवण्याची गरज आहे. त्याचप्रमाणे या संकटाचा सामना करण्याचे दोन प्रमुख मार्ग आहेत, पहिला मार्ग म्हणजे योग्य ते उपचार घेणे आणि दुसरा म्हणजे आपले मनोबल कायम ठेवणे. त्यासाठी प्रार्थना, मंत्र अथवा हनुमाल चालिसा यासारखी स्तोत्रे प्रभावी ठरतील, असेही शंकराचार्यांनी नमूद केले.
ख्यातनाम कलाकार सोनल मानसिंह यांनी यावेळी स्वत: अनुभव सांगितला. त्या म्हणाल्या, मलादेखील करोना संसर्ग झाला होता. त्यावेळी आपण उपचारांसह सकारात्मक विचार, धैर्य आत्मबल आणि प्रार्थनेद्वारे नैराश्यास आसपास फिरकू दिले नसल्याचे त्यांनी नमूद केले. त्याचप्रमाणे नैराश्यामध्ये न अडकता रचनामत्क कार्यांमध्ये स्वत: गुंतवून ठेवणे अत्यंत गरजेचे असल्याचेही मानसिंह यांनी यावेळी सांगितले.