मुंबई : देशात कोरोनाचे संकट आहे. हे कारण देऊन काँग्रेस अध्यक्षपदाची निवड सलग तिसऱ्यांदा टाळण्यात आली. त्यामुळेसोनिया गांधी याच पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत राहतील. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यापासून ते रिकामेच आहेत, असे विधान सामना मधील अग्रलेखात करण्यात आलंय. या विधानाचा हवाला देत भाजप नेते निलेश राणेंनी काँग्रेसला खोचक टोला लगावला आहे.
ट्विट करत निलेश राणे म्हणतात, "इतक्या शेलक्या शब्दात काँग्रेसच्या विरोधकांनी सुद्धा राहुल गांधी बद्दल असे शब्द काढले नसतील जे सत्तेमध्ये सोबत राहून शिवसेनेने वापरले. संजय राऊत व उद्धव ठाकरे कोणाचेच नाही. तोंडावर गोड पण आतून महा कपटी त्यांचा मूळ स्वभाव आहे. काँग्रेसचा सत्तेत राहून काय फायदा, इज्जत कुठे आहे?" असा सवाल राणेंनी उपस्थित केला.
शिवसेनेनं अग्रलेखात काय म्हटलंय? “विधानसभा निवडणुकीत झालेल्या काँग्रेसच्या दारुण पराभवाची गंभीर दखल घ्यावी लागेल आणि त्यातून योग्य तो धडा घेऊन पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी वस्तुस्थितीला सामोरे जावे लागेल, असे त्या म्हणाल्या. सोनिया गांधी यांनी पुढे जे सांगितले ते महत्त्वाचे. ‘पक्षात आवश्यक त्या सुधारणा कराव्या लागतील.’ श्रीमती गांधी या आजही काँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या वक्तव्याची दखल घ्यायलाच हवी. देशात कोरोनाचे संकट आहे. हे कारण देऊन काँग्रेस अध्यक्षपदाची निवड सलग तिसऱ्यांदा टाळण्यात आली. त्यामुळे सोनिया गांधी याच पक्षाच्या हंगामी अध्यक्षा म्हणून काम पाहत राहतील. राहुल गांधी यांनी अध्यक्षपद सोडल्यापासून ते रिकामेच आहेत. पक्षाला पूर्णवेळ अध्यक्षाची गरज असल्याचे मत काँग्रेसमधील ‘जी-२३’ गटाने वारंवार मांडले. पक्षाला अध्यक्ष नसल्याने लोकांसमोर कसे जायचे, हा मुद्दा या बंडखोर गटाने उपस्थित केला, पण अध्यक्ष असला नसला तरी पक्ष हा चालतच असतो. जमिनीवरचे कार्यकर्ते पक्षाचा झेंडा पुढे नेत असतात. एक काळ असा होता की, काँग्रेसने निवडणुकीत दगड उभा केला, तरी लोक त्या दगडास निवडून देत होते. आज चित्र तसे नाही. ” असे शिवसेनेने म्हटले आहे.