‘जाणीव’ नेणीव

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2021   
Total Views |

Manoj Panchal_1 &nbs
 
‘आयुष्य खूप सुंदर आहे, फक्त जगता यायला हवं’ असा मोबाईलवर स्टेटस ठेवणार्‍या मनोज पांचाळ या अनाथ तरुणाची समाजाप्रति ‘जाणीव’ म्हणजे जणू आख्यायिकाच भासावी.
 
स्वतः भोवतालच्या परिस्थितीतील संबंध जाणण्याचा दृष्टिकोन, विचार तसेच आपले वेगळे अस्तित्व जाणण्याची क्षमता म्हणजेच जाणीव! १ जून, १९८७ रोजी जन्मलेल्या मनोज पांचाळ या अनाथ तरुणाच्या आयुष्याची चित्तरकथा हीदेखील एखाद्या चित्रपटात शोभून दिसावी अशीच आहे. अवघा सहा महिन्यांचा असताना मातृछत्र हरपल्याने मनोज नांदेड जिल्ह्यातील सगरोली गावातील आनंद बालग्राम अनाथाश्रमात वाढला. बारावीपर्यंतचे संपूर्ण शिक्षण ‘संस्कृती संवर्धन मंडळ’, शारदानगर व सगरोली येथे पूर्ण केले. परंतु सिनेमाचे, नाटकाचे वेड असल्याने त्याने थेट मायानगरी मुंबापुरी गाठली. मात्र, त्याला येथे अपेक्षित यश मिळाले नाही. रूपेरी पडद्यावरील हिरो होण्याचे त्याचे स्वप्न भंगले. परंतु, तो मनाने खचला नाही. समाजाविषयी असणारी सामाजिक ‘जाणीव’ त्याला काही केल्या स्वस्थ बसू देईना, एका अनाथ मुलाचे आयुष्य तो यापूर्वी जगला होता, त्यामुळे अनाथांबद्दल त्याला कळवळा होताच. रेल्वे स्टेशन, बस स्थानकाच्या आजूबाजूला भीक मागणारे अनेक वृद्ध आजी-आजोबा त्याला दिसायचे, कालांतराने या वृद्ध आजी-आजोबांसोबत त्याने मैत्री करून त्यांना स्वतःच्या घरी हक्काचा निवारा दिला. याच दरम्यान शिक्षणाचा वेलू चढण्याचा त्याचा प्रयत्न सुरूच होता. अथक प्रयत्नांती तृतीय वर्ष कला शाखेपर्यंत मनोजने मजल मारली. जीवनात ठसे-टोणपे खात अनुभव आणि शिक्षणातून समृद्ध होत असतानाच त्याच्या मनातील ‘जाणीव’ आणि नेणीव सातत्याने उफाळून येत होती. वेदनेच्या जाचात पिचणार्‍या वृद्ध आजी-आजोबांसाठी देवदूत ठरलेला कल्याण मलंगगडचा ‘मनोज पांचाळ’ हा युवा आज जरी रूपेरी पडद्यावरचा हिरो ठरला नसला, तरी समाजाच्या वास्तववादी पडद्यावरील खराखुरा हिरो म्हटल्यास वावगे ठरणार नाही!
 
 
 
सुरुवातीला काही वर्षे डोंबिवलीतल्या उंबर मानपाडा येथे सेवाधर्म जपणार्‍या मनोजने कल्याण पूर्वेकडील मलंगगड, आंबेगाव येथे ‘जाणीव’ आश्रम उभारला. हेच त्याचे घर बनले. दोनाचे चार हात झाल्यानंतर पत्नी सोनाली व दोन मुलींसह आश्रमाच्याच घरात राहणार्‍या मनोजने आपल्या सेवाकार्यात संसाराचा अडसर कधीही ठरू दिला नाही. आश्रमात आश्रयाला असलेल्या या आजी-आजोबांच्या अन्न, वस्त्र व निवारा या मूलभूत गरजा तो नित्यनेमाने पूर्ण करत आहे. मित्र परिवार, परदेशी व्यक्ती व संस्थांच्या माध्यमातून वस्तुरूपी मदत मिळवून ज्येष्ठांसाठी करता येतील त्या सगळ्या गोष्टी करण्याचा त्याचा प्रामाणिक प्रयत्न पाहून खरोखरच अवाक व्हायला होतं. रस्त्यावर भिकारी अवस्थेत जीणं जगत असलेल्या वृद्धांनाही त्याने माणसात आणण्याची केलेली किमया खरोखरच वाखाणण्याजोगी आहे. वृद्धत्व हे आयुष्यातील दुसरे बालपण असते, या काळात वृद्ध व्यक्तींना समाजाच्या, कुटुंबाच्या मायेची सर्वाधिक गरज असते. मात्र, वृद्धपणीच काहींना गृहस्थाश्रम सोडून वृद्धाश्रमाचा आधार घ्यावा लागतो. अशा वृद्धांची सेवा करण्यासाठीची जाणीव मनोजला झाली आणि या उद्देशाने त्याने वृद्धांची सेवा हेच धोरण अंगीकारले असून मागील काही वर्षांपासून वृद्धांची सेवा करण्यातच मनोजने आनंद शोधला आहे. आर्थिक स्वरूपातील मदतीपेक्षा वस्तू स्वरूपातील मदत या मंडळींसाठी अधिक उपयुक्त ठरते म्हणून त्याने वस्तूस्वरूपातील कोणत्याही प्रकारे मिळणारी मदत स्वीकारून ‘जाणीव’चा हा संसार साकारला आहे. आजच्या घडीला या आश्रमात अनेक आजी-आजोबा राहतात. विशेष म्हणजे, मनोजचे कुटुंबही त्यांच्यासोबतच राहत असून हेच त्याचं कुटुंब विश्व बनलं आहे.
 
 
त्याच्यासारख्या अनाथांना दिशा दाखवणारे बाबासाहेब देशमुख यांचे ऋण मनोज व्यक्त करतो. शिकताना हॉटेलमध्ये स्वीपर ते वेटरचे काम करताना रेल्वे स्टेशनवर झोपल्याची आठवणही मनोज सांगतो. मधल्या काही कालखंडात मनोजने खासगी बँकेत बड्या हुद्द्यावर नोकरी केली. परंतु, तिथे त्याचे मन रमले नाही. मग २०११ सालापासून ‘अचिव्हर्स संस्था’ स्थापन करून ‘मोटिव्हेशनल स्पीकर’ म्हणून तो महाराष्ट्रभर भ्रमंती करत आहे. ‘क्वालिटी लाईफ’सह विविध विषयांवर तो उपस्थितांशी संवाद साधतो. मनोजचे काम फक्त आजी- आजोबांपुरतेच मर्यादित नसून, अनेक दुर्गम वनवासी पाड्यांवरही त्याचे सामाजिक कार्य सुरू आहे. या पाड्यावर असणारा कुपोषणाचा प्रश्न कायमचा मार्गी लावण्यासाठी तो झटत आहे. वनवासी पाड्यांतील गरोदर स्त्रियांना तो महिनाभर पुरेल एवढे पौष्टिक खाद्यपदार्थ नियमित पुरवत असतो. तसेच त्या ठिकाणी त्याच्या अनेक सेवाभावी मित्रांच्या साहाय्याने वैद्यकीय सेवादेखील पुरवण्याचे कामदेखील मनोज अविरतपणे करत आहे. विशेष म्हणजे, मनोजचा हा उपक्रम यशस्वी झाला असून, काही वनवासी पाड्यांत आजघडीला एकही बाळ कुपोषणग्रस्त म्हणून जन्माला आलेले नाही. या कामाबरोबरच सध्या मनोज वीटभट्टी कामगार असलेल्या मुलांच्या शिक्षणासाठी कार्य करत आहे. हातावर पोट असलेल्या वीटभट्टी कामगारांना कामामुळे अनेकदा स्थलांतर करावे लागते. याचा थेट परिणाम वीटभट्टी कामगारांच्या मुलांच्या शिक्षणावर होत असतो. यासाठी मनोज या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल करून, त्यांना शैक्षणिक वस्तू पुरवण्याचे काम करत आहे. या जाणिवेची पोचपावती म्हणून आजवर २० विविध पुरस्कार मिळाल्याचे मनोज सांगतो. यात २०१९च्या डोंबिवली रोटरीच्या ‘एक्सलन्स’ पुरस्काराचाही समावेश आहे.
 
 
सतत विविध समाजशील उपक्रम राबवणार्‍या मनोजने भविष्यात भारतात जिथे-जिथे गरज असेल, तिथे-तिथे वृद्धांसाठी आश्रम उभारण्याची आकांक्षा मनी बाळगली आहे. त्याच्या या महत्त्वांकाक्षी जाणिवेला दै. ‘मुंबई तरुण भारत’च्या मन:पूर्वक शुभेच्छा.
 
 
 
@@AUTHORINFO_V1@@