विकृतींचे प्रतिपालक

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-May-2021   
Total Views |

Jitendra Awhad_1 &nb
 
 
समाजमाध्यमातील विकृतीविलाप जेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या घटनात्मक सीमा ओलांडतात, तेव्हा कायद्याने भूमिका घेतलीच पाहिजे. परंतु, कायदेशीर कारवाईला सुरुवात होण्यापूर्वीच जितेंद्र आव्हाडांसारखे मंत्री जर उघडपणे अभय देत असतील, तर अशा विखारड्यांचा उत्साह कायम ठेवण्याची ती एक राजकीय कसरत आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
 
 
सोशल मीडियातून अमृता फडणवीस, देवेंद्र फडणवीस, नरेंद्र मोदी यांच्यावर पातळी सोडून टीका करणार्‍या एकूण ५४ व्यक्तींविरोधात प्रदीप गावडे यांनी तक्रार दिली. प्रत्येक व्यक्तीने प्रसारित केलेला सोशल मीडियातील मजकुराचा तपशील तसेच संबंधितांनी कोणत्या कलमाखाली गुन्हा केला, याविषयी आपली तक्रार आहे, हेदेखील गावडे यांनी लिहिले. पण, गावडे यांनी तक्रार देऊन २४ तास उलटण्यापूर्वीच राज्याचे मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवरून गावडेंची तक्रार व यादीचे फोटो टाकून ’Dnt Wry I have spoken to the concerned' असा मजकूर लिहून ट्विट केले. त्यानंतर गावडेंच्या यादीतील अनेक ‘ट्रोल’ आव्हाडांचे आभार मानू लागले. थोडक्यात, तुम्ही ‘सोशल मीडिया’वरून कोणतेही आणि कितीही गुन्हे केलेत तरी तुमच्या पाठीशी मी आहे, असे आव्हाड यांना या ट्रोलटोळीला सांगायचे होते का, हा प्रश्न आहे; अन्यथा सोशल मीडियावर भाजपविरोधात चालणार्‍या विकृतीवमनाशी मंत्र्यांचा काय संबंध? आव्हाड स्वतः ज्या भारतीय संविधानाची शपथ घेऊन मंत्री झाले, त्या संविधानानेच अभिव्यक्तीवर काही वाजवी निर्बंध लादले आहेत, याचे भान आव्हाडांना नाही का? तसेच कायदेशीरदृष्ट्या एखादी तक्रार दाखल झाल्यावर त्यात पोलिसांनी स्वतःचा तपास करेपर्यंत राजकीय हस्तक्षेप अपेक्षित नसतो. इथेतर जितेंद्र आव्हाड यांनी उघडपणे अभय दिले आहे.
 
 
 
जितेंद्र आव्हाड यांच्यावर व्यंगात्मक टिपणी करण्यात आली, तेव्हा तसे करणार्‍या अनंत करमुसे या तरुणाला आव्हाडांच्या बंगल्यावर मारहाण झाली होती. उद्धव ठाकरेंवर टीका केली म्हणून वडाळ्यात हिरामण तिवारी याचे मुंडन करण्यात आले. लोकसभा निवडणुकीपूर्वी मनसेवाले असेच भाजप समर्थकांना मारझोड करीत फिरत होते. नौदल अधिकारी मदन शर्मा या वयोवृद्ध व्यक्तीला शिवसैनिकांनी अमानवीय पद्धतीने मारहाण केली. मदन शर्मा यांचा दोष काय, तर त्यांनी उद्धव ठाकरे यांचे कार्टून सोशल मीडियावर पोस्ट केले. विशेष म्हणजे, नौदल अधिकारी मदन शर्मा हे तर ज्येष्ठ नागरिक होते, त्यांचा डोळा काळानिळा झाला. पण, पोलिसांनी हल्ला करणार्‍या शिवसैनिकाला मोजून चार तासदेखील कोठडीची हवा खाऊ दिली नाही. त्याउलट सर्व आरोपींना टेबलजामीन देण्यात आले. आम्ही मदन शर्मा यांची मुलाखत घेण्यासाठी गेलो, तेव्हा त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्य शॉकमध्ये होते. पंढरपूरमध्ये एका भाजप कार्यकर्त्याला साडी नेसवून, मारझोड करून धिंड काढण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी ठाकरेंविरोधात व्यक्त होणार्‍यांवर गुन्हे दाखल करण्यास सुरुवात केली. सुनैना होले या महिलेवरही असाच गुन्हा दाखल करण्यात आला. सुनैना होले यांच्याविरोधात लिहिलेला गुन्हा वर्षभरानंतर उच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवला आहे. पण, त्यादरम्यान त्यांना सहन करावा लागलेला मनःस्ताप, झालेले नुकसान भरून निघेल का? सुनैना होले यांना सरकारवर टीका करण्याचा अधिकार नव्हता का? भाजप समर्थक समित ठक्कर यांची व्यथा वेगळी नाही. समित ठक्करविरोधात तर गुन्हे दाखल करण्याचे सत्रच महाविकास आघाडी सरकारने राबविले होते. कारण, गुन्हा दाखल केला की, आपल्याला जामीन देण्यासाठी न्यायालय आहे, आपण कोर्टात जाऊ, असा विश्वास सर्वसामान्य माणसाला असतो. समित ठक्करच्या बाबतीत सरकारने न्यायव्यवस्थेच्या मर्यादा उघडपणे दाखवून दिल्या. एका गुन्ह्यातून जामीन झाला की, दुसरा गुन्हा दाखल करून अटक करायची. म्हणजे जेलमध्ये ठेवण्याचा उद्देश साध्य होतो. तसेच हातात बेड्या घालून, तोंडावर काळे फडके बांधून त्याची एखाद्या अतिरेक्याप्रमाणे धिंड काढायची. ती दृश्ये सर्वत्र प्रसारित करायची. जेणेकरून सरकारविरोधात व्यक्त होणार्‍यांच्या मनात जरब बसवली जाते. उद्धव ठाकरेंनी हे प्रकार निलाजरेपणे केले. त्याउपरही उद्धव ठाकरे आपला सोज्वळ चेहरा घेऊन माध्यमांसमोर येतात. त्या चेहर्‍यामागे एक क्रूर प्रवृत्ती लपली आहे, हे विसरून चालणार नाही. परंतु, आजही सर्वसामान्य लोकांना उद्धव ठाकरेंचे क्रौर्य जाणवत नाही. कारण, ते दाखवून देणारे कुणीच नाही. तेच योगी आदित्यनाथ यांच्या उत्तर प्रदेशात पोलीस कोठडीत माशी जरी शिंकली, तरी त्याविषयी ‘हेडलाईन’ होतात. कारण, भाजपकडे ‘इकोसिस्टीम’ नाही; असेल तर ती अपयशी ठरते आहे. सत्तेचा लाभ घेणारा भाजपच्या तथाकथित ‘इकोसिस्टीम’मधील वकीलवर्ग न्यायालयात लढाई लढण्याऐवजी टूथपेस्ट वाटण्यात धन्यता मानतो आणि आत्मविश्वासाने डायरी घेऊन बैठकांना हजेरीही लावतो. प्रदीप गावडेंचे विशेषत्वाने अभिनंदन केले पाहिजे, ते त्यांनी दाखवलेल्या वेगळेपणाबद्दल!
 
 
 
महिलांविषयी वेडीवाकडी शेरेबाजी करणे, इतरांची श्रद्धास्थाने खिजवणे, अशा विकृती अल्पप्रमाणात तरी समाजात असतातच. कमी-अधिक प्रमाणात या विकृत मानसिकतेचे प्रदर्शन अलीकडे सर्वच क्षेत्रात उघडपणे मांडलेले असते. सोशल मीडियामुळे सर्वांनाच व्यक्त होण्याची संधी मिळाली आहे. त्यातून प्रत्यक्ष जीवनातील वैफल्य आणि मनातील मळमळ समाजमाध्यमातील विकृतीवमनातून व्यक्त होत असते. परंतु, संघ, भाजपविरोधात चालणार्‍या गलिच्छ प्रकारांना हल्ली महाराष्ट्रात पेव फुटल्याचे प्रकर्षाने जाणवेल. कारण, संघ-भाजप समर्थकांनी जर काही अशोभनीय प्रकार सोशल मीडियावर केले, तर त्यावेळी मुख्य प्रवाहातील पत्रकारितेला मानवजातीच्या अस्तित्वावर मोठे संकट ओढावल्याचा भास होतो. पण, अशा ट्रोलटोळ्या संघ-भाजपवर घसरताना नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडतात, त्याविषयी कोणतेही मुख्य प्रवाहातील माध्यम चकार शब्द काढीत नाही. सोशल मीडियातील हे विकृतीविलाप जेव्हा अभिव्यक्तिस्वातंत्र्याच्या घटनात्मक सीमा ओलांडतात, तेव्हा कायद्याचा संबंध येतो. परंतु, कायदेशीर कारवाईला सुरुवात होण्यापूर्वीच जितेंद्र आव्हाडांसारखे मंत्री जर उघडपणे राजकीय अभय देत असतील, तर तो अशा विखारड्यांचा उत्साह कायम ठेवण्याची एक राजकीय कसरत आहे, हे आपण लक्षात घेतले पाहिजे.
 
 
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे महाविकास आघाडी सरकार सत्तेत आल्यापासून चेवाचेवाने महाराष्ट्रातील राष्ट्रीय विचारांचे खच्चीकरण सुरू आहे. खरंतर भाजप सरकार सत्तेत असतानाच असे लोक सक्रिय झाले होते. त्यावेळी संघविचारांवर विद्वेषमूलक टीका करणार्‍यांविरोधात कायदेशीर कारवाई करण्याची इच्छा बाळगणार्‍यालाच पोलीस ठाण्याचे आरोपीपेक्षा जास्त खेटे घालावे लागत. मी, स्वतः याचा अनुभव घेतल्यामुळे याविषयी खात्रिपूर्वक लिहू शकतो. भाजप हा पक्ष जनकार्यकर्त्यांनी घडवलेला पक्ष आहे. प्रत्यक्ष संघटनेपेक्षा जनतेतील समर्थक, स्वयंसेवक भाजपच्या यशाचे शिल्पकार आहेत. तसेच भाजपचे समर्थक हे इतर पक्षातील चार टोळक्यांसारखे रिकामे गुंड नसतात, तर सर्वसाधारण, मध्यमवर्गीय नोकरी-उद्योग करणारे असतात. त्यामुळे मारहाण, पोलीस ठाणे, अटक याचा निश्चित परिणाम त्यांच्यावर होतो. जर भाजपचा समर्थक मागे रेटला, तर भाजपविरोधात खोटा प्रचार सर्वसामान्य जनतेच्या गळी उतरवणे सोपे आहे, हे महाविकास आघाडीने अचूक ताडले आहे. म्हणून कोणतेही कारण नसताना ‘रेमडेसिवीर’प्रकरणी देवेंद्र फडणवीसांना आरोपीच्या पिंजर्‍यात उभे करण्यात महाविकास आघाडीचे लोक यशस्वी झाले. कारण, भाजपकडे ‘प्रोफेशनल प्रपोगंडा’ करायला जुलिओ रिबेरो नसतात. असले तरी त्यांना जागा द्यायला एखादे वृत्तपत्र तयार असेल का, हा प्रश्नच असतो. सोशल मीडियावर ‘रेमडेसिवीर’प्रकरणी जोरदार खोटा प्रचार झाला. अशा वातावरणात कायदेशीर कारवाईदेखील होत नाही. प्रदीप गावडेंसारखे कुणी पुढे आले, तर तेव्हा थेट मंत्री त्यांच्याविरोधात उतरतात. काँग्रेससमर्थक साकेत गोखलेच्या घराखाली हिंदुत्ववाद्यांनी ‘जय श्री राम’ घोषणा दिल्या आणि गोखलेने त्याविषयी ट्विट केले, तर त्याची दखल तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुखांनी घेतली होती. मंत्र्यांनी उघडपणे असे करण्यामागे काही हेतू असतात. भाजप दुबळा आणि हतबल आहे, असे चित्र आघाडीला रंगवायचे आहे. कायदा, न्यायव्यवस्था काहीही असेल; तरी आम्ही सत्ता राबवू शकतो, हेच महाविकास आघाडी सरकारला दाखवून द्यायचे आहे. तसेच भाजपला झोडपण्याचे कार्यक्रम कशाचीही तमा न बाळगता सुरू राहतील, याची काळजी महाविकास आघाडीचे मंत्री घेत असतात. आव्हाडांनी केलेले ट्विटदेखील त्याच प्रयत्नांचा एक भाग असावा.
 
 
@@AUTHORINFO_V1@@