अलिगढ विद्यापीठात तब्बल ४४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू

    12-May-2021
Total Views |

Aligarh_1  H x
 
 
अलिगढ : एकीकडे देशात कोरोनाची दुसरी लाट थैमान घालत आहे. तर, दुसरीकडे उत्तर प्रदेशमधील अलिगढ मुस्लीम विद्यापीठात गेल्या काही दिवसात ४४ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यामध्ये १९ प्राध्यापकांचा तर २५ शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या १८ दिवसांत २० कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला.
 
 
 
अचानक इतक्या मोठ्या प्रमानात झालेल्या मृत्यूनंतर कोरोनाचा नवा व्हेरिएंट आल्याची भीती व्यक्त केली जात आहे. यानंतर एएमयूचे व्हीसी तारिक मन्सूर यांनी नवी दिल्लीच्या सीएसआयआर इन्स्टिट्यूट ऑफ जेनोमिक्स अँड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी येथे काही नमुने पाठवले आहेत. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने निवडलेल्या जवाहरलाल नेहरू मेडिकल कॉलेजच्या मायक्रोबायोलॉजी विभागाच्या कोविड लॅबने हे नमुने एकत्र केले. या नमुन्यांसह प्राध्यापक मन्सूर यांनी आयसीएमआरचे डीजी डॉ. बलराम भार्गव यांनाही पत्र लिहिले आहे.
 
 
“विद्यापीठाची स्मशानभूमी आता पूर्ण भरली आहे. ही खूप मोठी शोकांतिका आहे. अनेक मोठे डॉक्टर, वरिष्ठ प्राध्यापकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये डीन, चेअरमन यांचाही समावेश होता. निरोगी आणि तंदुरुस्त असणाऱ्या अनेक तरुणांचाही मृत्यू झाला आहे. विद्यापीठालगतच्या सिव्हिल लाईन्स एरियामध्ये एका विशिष्ट प्रकारच्या विषाणूचा प्रसार होत असल्याची शंका आहे." असे प्राध्यापक मन्सूर यांनी पत्रात लिहिले आहे.