काँग्रेस हवी!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2021   
Total Views |

congress_1  H x


काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधींच्या पदरी पडल्यानंतर पवारसाहेबांच्या ‘जाणतेपणा’ला ठेच लागेल, त्याचे काय? म्हणून नावापुरती, उरल्यासुरल्या ताकदीपुरती आणि महत्त्वाचे म्हणजे राज्यातला शिवसेनेचा मुख्यमंत्री टिकवण्यासाठी काँग्रेस हवीच. म्हणून कधी तिसर्‍या आघाडीच्या गप्पा करायच्या, तर कधी गुपचूप काँग्रेस नेतृत्वाची तारीफ करायची, असा हा प्रकार. तेव्हा, यांना काँग्रेस हवी ती केवळ राजकीय स्वार्थासाठी. काँग्रेस हवी ती त्यांच्या मूक नेतृत्वासाठी. काँग्रेस हवी ती गांधींची पुण्याई वापरण्यासाठीच!


काँग्रेसमध्ये सध्या नेमके काय सुरू आहे, याचे कोडे अजून कुणालाच उलगडलेले नाही. ना धड सोनिया गांधींना, ना राहुलला आणि नाही प्रियांका वाड्राला. नेते तर कोसो दूरच! त्यात काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधींनी पाच राज्यांच्या निवडणुकांनंतर काँग्रेसच्या कामगिरीवर असमाधान व्यक्त करत चिंतन, आत्मपरीक्षण वगैरेची नेहमीचेच शाब्दिक खेळ केले. पण, याच गांधी परिवाराने निवडणुकांपूर्वीच नांगी का टाकली, हा प्रश्न अनुत्तरितच! त्यामुळे हा वरवरचा मुलामा काँग्रेसला पुन्हा बळ वगैरे देईल, ही आशा फोल ठरावी. त्यामुळे एकीकडे खुद्द काँग्रेसचे शीर्षस्थ नेतृत्व त्यांच्या पराभवाची कारणमीमांसा करण्याची भाषा करत असताना, शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांना तरीही काँग्रेसची केरळ, तामिळनाडूमधील निवडणुकांतील कामगिरी समाधानकारक वाटते. असे हे राऊतांचे वरकरणी, खोटेखोटे काँग्रेसप्रेम.



म्हणजे जी काँग्रेस राज्यात राऊतांना ‘कुरकुरणारी खाट’ वाटते, तीच काँग्रेस राष्ट्रीय पातळीवर त्यांच्या दृष्टीने आघाडीचा म्हणे आता ‘आत्मा’ ठरली आहे. म्हणजे देशपातळीवर काँग्रेस म्हणे आत्मा आणि राज्यात त्याच काँग्रेसचे ओझे? खरं म्हणजे राऊत हे उद्धव ठाकरेंपेक्षा शरद पवारांचेच शिष्य शोभावे इतके त्यांचे वागण्या-बोलण्यात साधर्म्य. एका वेळी दोन नाही, तर दहा दगडांवर पाय ठेवून चालण्याची यांची राजकीय सिद्धीच. त्याची पावलोपावली प्रचिती खासकरून गेल्या दीडएक वर्षांत महाराष्ट्राने अनुभवलीही. तर राऊतांना, पवारांना मोदींविरोधात आघाडी करण्यासाठी काँग्रेस का हवी? कारण, स्पष्ट आहे, काँग्रेस सोडल्यास ना राष्ट्रवादी आणि ना शिवसेना किंवा अन्य कुठलाही प्रादेशिक पक्ष राष्ट्रीय नेतृत्वाचे शिवधनुष्य पेलू शकतो. पण, त्यातही गोम अशी की, राऊतांना काँग्रेस हवी वगैरे ठीक. पण, त्या काँग्रेसचे नेतृत्व राहुल गांधींच्या पदरी पडल्यानंतर पवारसाहेबांच्या ‘जाणतेपणा’ला ठेच लागेल, त्याचे काय? म्हणून नावापुरती, उरल्यासुरल्या ताकदीपुरती आणि महत्त्वाचे म्हणजे राज्यातला शिवसेनेचा मुख्यमंत्री टिकवण्यासाठी काँग्रेस हवीच. म्हणून कधी तिसर्‍या आघाडीच्या गप्पा करायच्या, तर कधी गुपचूप काँग्रेस नेतृत्वाची तारीफ करायची, असा हा प्रकार. तेव्हा, यांना काँग्रेस हवी ती केवळ राजकीय स्वार्थासाठी. काँग्रेस हवी ती त्यांच्या मूक नेतृत्वासाठी. काँग्रेस हवी ती गांधींची पुण्याई वापरण्यासाठीच!


काँग्रेस नको!


अशी ही कधी एकाएकी एकदम हवीहवीशी वाटणारी काँग्रेस अधूनमधूून नावडतीही होते बरं का? ते म्हणतात ना, ‘तुझ्यावाचून जमेना अन् तुझ्यावाचून करमेना’, तशीच आज राऊत आणि पवारांची तर वर्षानुवर्षांची गत. खुद्द पवारसाहेब तर सोनियांचे परदेशी नेतृत्व धुडकावून काँग्रेसमधून बाहेर पडले. पण, आपल्या नवीन पक्षाच्या नावापुढचे ‘काँग्रेस’ काही त्यांनी मिटू दिले नाही. हेच पवार पुढे कसे केंद्रात त्याच परदेशी सोनियांच्या नेतृत्वात मंत्रिपदही ऐटीत भूषवित होते, ते वेगळे सांगायला नकोच. म्हणजे, काँग्रेस तर हवीच; पण आपली महानता, आपले नेतृत्व त्याच काँग्रेससमोर झाकोळले जाऊ नये म्हणून ही काँग्रेस नकोसुद्धा! म्हणूनच राजकारण्यांची रंग बदलणार्‍या सरड्याशी जी तुलना केली जाते, ती अनाठायी अजिबात ठरू नये.

देशात तिसर्‍या आघाडीचे राजकीय प्रयोग कसे अयशस्वी, फसवे आणि राष्ट्रहिताला अडसर ठरले, याची जाणीव स्वत:ला ‘तिसर्‍या आघाडीचे शिल्पकार’ म्हणून घडवू पाहणार्‍या राऊतांना आहेच. तरीही पवारांच्या मनातले राऊतांच्या ओठांवर येतेच. म्हणजे संजय राऊतांच्या माध्यमातून खुद्द पवारसाहेबांचीच आकाशवाणी होत असते. असो. तर काँग्रेसमधील नेतृत्वाची पोकळी आणि एकूणच दिशाहीनता २०१४, २०१९च्या पराभवानंतरही स्थिरावलेली नाही आणि भविष्यातही तसे काही होईल, याची शक्यताही कमीच. त्यामुळे हारणार्‍या घोड्यावर डाव लावून साध्य काहीच होणार नाही. दोन दशकांपूर्वी परिस्थिती अशी होती की, काँग्रेसच्या छत्रछायेखाली पक्ष संयुक्त पुरोगामी आघाडीमध्ये वाटेकरी होते. काँग्रेस नेतृत्वाच्या शब्दाला किंमत होती, मान होता. आज परिस्थिती नेमकी विरुद्ध. शिवसेना, राष्ट्रवादी, द्रमुक, तृणमूलसारखे प्रादेशिक पक्ष काँग्रेसला त्यांच्या गोटात सामील करायचे अथवा नाही, यावर खल करताना दिसतात. कोणाला काँग्रेसशिवाय भाजपविरोधी आघाडी मंजूर नाही, तर कुणाला काँग्रेसही नको, भाजपही नको आणि तिसरी आघाडी बळकट करायचे डोहाळे लागले आहेत. एकूणच काय तर काँग्रेस का नको, तर त्यांच्या नेतृत्वहीनतेमुळे. काँग्रेस नको ती त्यांनी गमावलेल्या जनाधारामुळे. काँग्रेस नको ती दिशाहीनतेमुळे. पण, शेवटी राजकारणात ‘हे हवे, हे नको’ ही निवड वाटते तितकी सोपी नाही. म्हणून काँग्रेस ही एक राजकीय अपरिहार्यता आहे. तिला धुडकावणेही सोपे नाही अन् डोक्यावर मिरवणेही!
@@AUTHORINFO_V1@@