चिनी चक्रव्यूह

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    10-May-2021   
Total Views |

china_1  H x W:

चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट असल्याने लपवाछपवी करण्यात त्यांना विशेष प्रावीण्य प्राप्त आहेच. मात्र, तरीदेखील चीनमधील कथित सर्वसामान्य परिस्थितीमुळे चीनने प्रयोगशाळेत या विषाणूची निर्मिती केली आणि त्याची जगभरात निर्यात केली, असा सूर गतवर्षीपासूनच निघण्यास प्रारंभ झाला.


गतवर्षी कोरोना संसर्ग चीनद्वारे संपूर्ण जगात पसरला. सुरुवातीला सर्वच देश त्याविषयी अनभिज्ञ असल्याचे प्रचंड गोंधळ उडाला. अतिशय पुढारलेले आणि आधुनिक आणि श्रीमंत असणार्‍या युरोपीय देशांसह अमेरिकेनेही कोरोना संसर्गासमोर गुडघे टेकले होते. सध्या भारतासह इतर अनेक देश कोरोना संसर्गाच्या दुसर्‍या लाटेचा सामना करीत आहेत. गतवर्षीपेक्षा आता लस विकसित करण्यात यश आल्याने कोरोनाविरोधातील लढा जरा सोपा झाल्याचे चित्र आहे. मात्र, हे सर्व होत असताना चीनमधील ज्या वुहान शहरातून हा विषाणू जगभरात पसरला, अथवा निर्यात करण्यात आला, त्या शहरातील नागरिक सध्या संगीताच्या ‘लाईव्ह कॉन्सर्ट’चा आनंद घेत असल्याची छायाचित्रे नुकतीच बघण्यात आली होती. हे झाले २०२१ सालचे; मात्र ज्यावेळी संपूर्ण जगात गतवर्षी कोरोनाचे थैमान सुरू होते; त्यावेळीही वुहानसह चीनची राजधानी बीजिंगमध्येही अगदी हाताच्या बोटांवर मोजता येण्यासारखे कोरोनाचे रुग्ण होते.

अर्थात, चीनमध्ये कम्युनिस्ट राजवट असल्याने लपवाछपवी करण्यात त्यांना विशेष प्रावीण्य प्राप्त आहेच. मात्र, तरीदेखील चीनमधील कथित सर्वसामान्य परिस्थितीमुळे चीनने प्रयोगशाळेत या विषाणूची निर्मिती केली आणि त्याची जगभरात निर्यात केली, असा सूर गतवर्षीपासूनच निघण्यास प्रारंभ झाला.नेहमीप्रमाणे तो दावा काही काळ फिरत राहिला आणि अमेरिकेनेही विषाणू जाणीवपूर्वक जगभरात पसरविण्यात आल्याचा आरोप चीनवर केला होता. कालांतराने सर्वच देश संसर्गाविरोधात लढण्यात व्यस्त असल्याने या मुद्द्याकडे दुर्लक्ष झाले. मात्र, आता ऑस्ट्रेलियातील प्रसारमाध्यमांनी तो दावा पुन्हा एकदा केला आहे. ऑस्ट्रेलियातील news.com.au या संकेतस्थळावर ‘वीकेण्ड ऑस्ट्रेलियन’ या दैनिकाने एक शोधनिबंध प्रकाशित केला आहे. त्याचे शीर्षक आहे - ‘सार्स आणि जैविक हत्यारांच्या रूपात मानवनिर्मित अन्य विषाणूंची उत्पत्ती.’ यामध्ये एक महत्त्वाचा दावा करण्यात आला आहे, तो म्हणजे साधारणपणे २०१५ सालापासूनच चीन ‘सार्स’ विषाणूचा वापर करून जैविक शस्त्रे तयार करण्याचा प्रयत्न करीत आहे. त्याचप्रमाणे तिसरे महायुद्ध आता पारंपरिक शस्त्रास्त्रांनी लढले न जाता, अशाप्रकारच्या जैविक शस्त्रांनी लढले जाईल. अशाप्रकारची जैविक शस्त्रे ही पारंपरिक शस्त्रास्त्रांपेक्षा कित्येक पटींनी घातक आहेत.


‘ऑस्ट्रेलियन स्ट्रॅटेजिक पॉलिसी इन्स्टिट्यूट’ (एएसपीआय)च्या कार्यकारी संचालक पीटर जेनिंग्स यांनीही या शोधनिबंधाविषयी खात्रीने आपले मत व्यक्त केले आहे. ते म्हणाले, “या शोधनिबंधामध्ये अतिशय महत्त्वाच्या बाबींचा खुलासा झाला आहे. यामुळे चीनचा नेमका मनसुबा आता जगजाहीर झाला आहे.” या विषाणूची आणि त्याच्या विविध प्रकारांची निर्मिती करणे आणि जगभरात कशा विविध मार्गांनी त्याचा प्रसार करता येईल, यासाठी चीनमधील शास्त्रज्ञ गेल्या अनेक वर्षांपासून काम करीत आहेत. त्यामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग आज संपूर्ण जगभरात झालेला असतानाही चीनमध्ये त्यांचा अत्यंत नगण्य प्रभाव पडला आहे. त्यामुळेच गतवर्षी ज्यावेळी जगभरातून या विषाणूचा संसर्ग कसा झाला, याची तपासणी करण्यासाठी पथक पाठविण्याची मागणी पुढे आली, त्यावेळी चीनने त्यास प्रखर विरोध केला होता. कारण, तसे झाल्यास कदाचित चीनला आपले पितळ उघडे पडेल, याची भीती होती.
या सर्व प्रकारामध्ये ‘जागतिक आरोग्य संघटने’ची भूमिकादेखील अतिशय संशयास्पद राहिली आहे. कोरोना विषाणूच्या धोक्याची आणि त्याच्या संसर्गाची पूर्वसूचना देण्यात ‘जागतिक आरोग्य संघटने’स अपयश आले. संसर्ग सुरू झाल्यानंतरही बराच काळ गेल्यानंतर ‘जागतिक आरोग्य संघटने’ने त्याविषयी बोलण्यास प्रारंभ केला. मात्र, तोपर्यंत वेळ निघून गेली होती. त्याचप्रमाणे चीनमध्ये जाऊन वुहान येथे चौकशी करण्याविषयीदेखील दुर्लक्ष करण्यात आले. चीनला कसे वाचविता येईल, याकडे ‘जागतिक आरोग्य संघटने’चे प्राधान्य होते. म्हणूनच, अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिका ‘डब्ल्यूएचओ’मधून बाहेर पडत असल्याची घोषणा केली होती. त्यानंतरही सुरुवातीला कोरोना रुग्णांवर वापरण्यात येणार्‍या औषधांविषयीदेखील ‘डब्ल्यूएचओ’ने संभ्रम कसा निर्माण होईल, याकडेच जास्त लक्ष दिले होते. त्यामुळे चीनच्या कह्यात येऊन ‘डब्ल्यूएचओ’ने जगाची दिशाभूल केल्याचा आरोप केला जात आहे. मात्र, आता या नव्या शोधनिबंधाची दखल जग कसे घेणार, यावर चीनविषयक भूमिका ठरणार आहे.
@@AUTHORINFO_V1@@